थाट: रागव्यवस्था लावण्यासाठी वापरण्यात येणारी वर्गीकरणाची एक पद्धती. ज्या रागांना लागणारे कोमल–तीव्र स्वर समान असतात, अशांचा एक वर्ग करून त्यास ‘थाट’ असे म्हणतात. रागांतील प्रमुख रागाचे नाव संबंधित थाटास देण्यात येते. थाटांतून अनेक राग निर्माण होत असल्याने त्यास जनक व निर्माण होणाऱ्या रागांना जन्य मानतात. क्वचित एकाच रागाचाही एक थाट असू शकतो.

थाटात क्रमाने सात स्वरी आरोहावरोह असावेत, एकाच स्वराची दोन रूपे त्यांत नसावीत इ. नियम बनवून ⇨ पं. विष्णु नारायण भातखंडे यांनी सु. १५० हिंदुस्थानी राग १० थाटांत बसविले. बिलावल, खमाज, भैरव, काफी, आसावरी, भैरवी, कल्याण, पूर्वी, मारवा व तोडी हे ते दहा थाट होत. या थाटांत सर्व हिंदुस्थानी राग बसत नाहीत.

मध्ययुगीन मेलपद्धती आणि ⇨ व्यंकटमखी (सतरावे शतक) या दाक्षिणात्य संगीतशास्त्रकाराची ७२ मेलांची गणितसिद्ध पद्धती यांच्या समन्वयाने पं. भातखंड्यांनी आपली पद्धती निश्चित केली असावी. रागांग पद्धती ही रागव्यवस्थेची दुसरी पद्धती होय. आज मेल व थाट या संज्ञा समानार्थी म्हणून वापरल्या जातात.

पहा : आसावरी थाटातील राग कल्याण थाटातील राग काफी थाटातील राग खमाज थाटातील राग तोडी थाटातील राग पूर्वी थाटातील राग बिलावल थाटातील राग भैरव थाटातील राग भैरवी थाटातील राग मारवा थाटातील राग.

संदर्भ : भातखंडे, वि. ना. भातखंडे – संगीतशास्त्र, भाग १, हाथरस, १९६४.

देसाई, चैतन्य