त्र्यनीक :वाऱ्याच्या प्रवाहामुळे वाळूचे कण खडकांवर आपटून खडकाला त्रिकोणी अणकुचीदार आकार येतात, अशा खडकांना त्र्यनीक म्हणतात. वारा एकाच दिशेने वहात असेल, तर खडकांच्या एकाच बाजूची झीज होते. परंतु वाऱ्याची दिशा सारखी बदलत असेल, तर खडकाची सर्व बाजूंनी झीज होते. म्हणून खडकाचा पृष्ठभाग त्रिकोणी आकाराचा व अणकुचीदार होतो. या खडकाला तीन वक्राकार पृष्ठभाग असतात व ते तिन्ही पृष्ठभाग धारदार कडांमध्ये येऊन मिळालेले असतात. गोलाकार गोटे, दगड यांचे त्र्यनीकात लवकर रूपांतर होते. वाळूखाली पुरल्या गेलेल्या दगडाच्या वा खडकाच्या पृष्ठभागाची प्रथम झीज होते. नंतर जोरदार वाऱ्यामुळे हा दगड किंवा छोटासा खडक उलटवला जातो. व दुसऱ्या बाजूची झीज होते. याच पद्धतीने तिसऱ्या बाजूचीही झीज होते. कठीण, गोलाकार गोटे वा गारगोट्या अथवा लहान खडक जेथे असतील तेथे त्र्यनीकाची निर्मिती होते. राजस्थानच्या व सहारा वाळवंटात अनेक ठिकाणी त्र्यनीक आढळतात.
करमरकर, प्र. र. भागवत, अ. वि.