त्रिपुर : त्रिपुरी. सध्याचे तेवर. हे नर्मदेच्या काठी, मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरच्या पश्चिमेस पूर्वी कलचुरी राजांच्या राजधानीचे ठिकाण होते (इ. स. २४९). महाभारत, तैत्तिरीय आणि काठक संहिता आदी ग्रंथांत असूरांची शिल्पी ‘मय’ किंवा मयासुर याने बाण राजा म्हणजे त्रिपुरासुर याच्यासाठी उभारलेली सोने, रूपे व लोखंड यांची अनुक्रमे अवकाश, हवा व भूमीवरील तीन नगरे म्हणजे त्रिपूर असा उल्लेख सापडतो. ही नगरे मयाने ताराक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली या बाणाच्या तीन मुलांना दिली पण त्यांनी देवांना त्रास दिल्याने शंकराने ती नष्ट केली, अशी कथा आहे. प्राचीन त्रिपुरी नगरीचा विनाश हा शैवांनी बौद्धांच्या केलेल्या हकालपट्टीचा निदर्शक असल्याचा उल्लेख लिंगपुराणात आढळतो. काँग्रेसचे १९३९ मधील त्रिपुरी येथील अधिवेशन प्रसिद्ध आहे.

खरे, ग. ह.