त्रिपिटक : बौद्धांच्या पवित्र ग्रंथांना ‘त्रिपिटक’ अशी संज्ञा आहे. त्रिपिटक म्हणजे ⇨ विनयपिटक, ⇨ सुत्तपिटक आणि ⇨ अभिधम्मपिटक अशी तीन पिटके किंवा पेटारे. ह्या पिटकांपैकी प्रत्येक पिटकांतर्गत असे स्वतंत्र घटक ग्रंथ आहेत. त्रिपिटक ही संज्ञा बौद्धांच्या सर्व पंथ–संप्रदायांना मान्य असली, तरी उपयुक्त तीन पिटकांतील त्यांना अभिप्रेत असलेले घटक ग्रंथ मात्र एकसारखे नाहीत. पाली भाषेत, बौद्ध संस्कृतात, तसेच तिबेटी आणि चिनी भाषांत त्रिपिटक अस्तित्वात असले, तरी ह्या निरनिराळ्या त्रिपिटकांतील घटक ग्रंथ एकमेकांशी जुळत नाहीत. उदा., सर्वास्तिवादी पंथाच्या अभिधम्मपिटकातील ग्रंथ पालीतील अभिधम्मपिटकाइतकेच, म्हणजे सात असले, तरी त्यांची नावे आणि विषय परस्परांशी जुळत नाहीत.

गौतम बुद्धाने आपल्या अनुयायांकरिता घालून दिलेले नियम, त्याचा उपदेश आणि तत्त्वज्ञान, तसेच त्याच्या प्रमुख शिष्यांनी दिलेली शिकवणूक त्रिपिटकात अंतर्भूत आहे. आज उपलब्ध असलेल्या सर्व त्रिपिटकांत पाली त्रिपिटकच सर्वप्राचीन मानले जाते. बुद्धाच्या धर्मोपदेशाच्या काळापासून सम्राट अशोकाच्या काळापर्यंत म्हणजेच इ. स. पू. सहाव्या शतकापासून इ. स. पू. तिसऱ्‍या शतकाच्या मध्यापर्यंत पाली त्रिपिटकातील सर्व ग्रंथ जरी अस्तित्वात आलेले नसले, तरी त्यांतील ग्रंथसंग्रह व महत्त्वाच्या ग्रंथांचे तोंडावळे तरी ठोकळ मानाने निश्चित केले गेले असले पाहिजेत. अभिधम्मपिटकातील कथावत्थु नावाचा ग्रंथ सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत झालेल्या तिसऱ्‍या धम्मसंगीतीत अस्तित्वात आला. त्या काळी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या बौद्ध सांप्रदायिकांची पाखंडी मते ह्या ग्रंथात सांगितलेली आहेत कारण ती खोडून काढताना विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक ह्यांतील काही ग्रंथांतून उतारे घेतलेले आहेत किंवा त्यांचा वा त्यांतील विषयांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ह्यावरून हे दिसून येते. इ. स. पू. २४९ च्या सुमारास सम्राट अशोकाने बैरात किंवा भाब्रू येथे कोरविलेल्या एका शिलालेखात गौतम बुद्धाने सांगितलेल्या सात धर्मपर्यायांचा (उपदेशांचा) उल्लेख आहे. ह्या धर्मपर्यायांचे श्रवण करावे त्यांवर विचार करावा अशीही शिफारस ह्या शिलालेखात आहे. हे सात धर्मपर्याय म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या सुत्तपिटकापैकी कोणती सात सुत्ते ह्या बद्दल विद्वानांत जरी एकवाक्यता नसली, तरी ते सुत्तपिटकात अंतर्भूत आहेत, हे सर्वमान्य झालेले आहे. अशोकाने उल्लेखिलेल्या सात धर्मपर्यायांत मागधी भाषेची काही रूपे शिल्लक राहिलेली दिसतात. त्यांवरून विंटरनिट्झ, सिल्व्हँ लेव्ही ह्यांसारख्या काही पश्चिमी विद्वानांचा असा तर्क आहे, की त्रिपिटकाला हल्लीचे वाङ्‌मयीन पाली भाषेतील स्वरूप येण्यापूर्वी मगध देशापुरतेच मर्यादित असे मागधी स्वरूप असावे.

पाली त्रिपिटकातून निदर्शित झालेली गौतम बुद्धाची प्रतिमाही लक्षणीय आहे. गौतम बुद्ध हा मनुष्ययोनीतच जन्मलेला असून आपल्या अंगच्या गुणांनी तो उच्च कोटीपर्यंत पोहोचला, असे पाली त्रिपिटकातून दिसते. मानवयोनीत दिसून येणाऱ्या त्रुटीही बुद्धाच्या ठायी होत्या, असेही त्यातून दिसते. ह्या त्रिपिटकात अंतर्भूत झालेली गौतम बुद्धाची शिकवणही साधी, सोपी आणि कोणत्याही सामान्य माणसाला समज पटून आचरणात आणण्याजोगी अशी आहे. गौतम बुद्धाच्या शिकवणीबरोबरच प्रसंगोपात्त तत्कालीन उत्तर भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीचे चित्रणही ह्या त्रिपिटकात आलेले आहे. इ. स. पू. सहाव्या अथवा पाचव्या शतकापासून इ. स. पू. तिसऱ्‍या शतकाच्या मध्यापर्यंत भारताच्या इतिहासाच्या ज्ञानात त्रिपिटकाच्या अध्ययनाने भरच पडलेली आहे. मगध देशाचे बिंबिसार व अजातशत्रू कोसल देशाचा प्रसेनजित वत्साचा राजा उदयन व उज्जैनीचा चंडप्रद्योत ह्यांच्या संबंधीच्या कथा त्रिपिटकात आहेत. उत्तरेकडील प्रदेशांतील शाक्य, वज्‍‍जी, मल्ल ह्यांची छोटी लोकराज्ये आणि त्यांचे व्यवहार ह्यांसंबंधीही माहिती मिळते. समाजात यज्ञसंस्थेच्या आणि वर्णभेदाच्या माजलेल्या बंडाविरूद्ध बुद्धाने आणि त्याच्या अनुयायांनी उठविलेला आवाज त्रिपिटकातून स्पष्टपणे प्रत्ययास येतो. तत्कालीन भारतात अस्तित्वात असलेले व्यापारमार्ग व आर्थिक व्यवहार समजण्यास त्रिपिटकाची मदत होते. त्या काळीही स्त्रियांना पुरुषांसारखे प्रव्रज्येचे आणि ध्येयप्राप्तीच्या संबंधीचे हक्क मिळावेत हा विचार, लोकतंत्राच्या तत्त्वावर चालविलेले भिक्षुसंघ, बहुजनांच्याच भाषेत केलेला बौद्ध धर्माचा प्रचार आणि त्यांच्या समान हक्कांबद्दल ठेवण्यात आलेली जागृती इत्यादींची प्रचीती आणि माहिती त्रिपिटक–ग्रंथ देतात म्हणून केवळ धार्मिक दृष्ट्याच नव्हे, तर समाजेतिहासाच्या दृष्टीनेही त्यांचे महत्त्व मोठे आहे.

त्रिपिटकातील दीघनिकायाचा मराठी अनुवाद चिं. वै. राजवाडे ह्यांनी केलेला आहे (२ भाग, १९१८ १९३२). धर्मानंद कोसंबी ह्यांनी केलेले सुत्तीनपाताचे मराठी भाषांतर विविधज्ञानविस्तारात क्रमशः प्रसिद्ध झाले होते. पुढे ते सुधारून पु. वि. बापट ह्यांनी संपादिले आणि स्वतंत्र पुस्तकरूपाने ‘धर्मानंद स्मारक ट्रस्ट’ मार्फत १९५५ मध्ये प्रकाशित केले. बौद्धसंघाचा परिचय ( १९२६) ह्या आपल्या ग्रंथात धर्मानंद कोसंबी ह्यांनी विनयपिटकातील पातिमोक्खाचे मराठी भाषांतर अंतर्भूत केलेले आहे.

बापट, पु. वि.