तोल्काप्पियम्‌ : तमिळमधील सध्या उपलब्ध असलेला एक साहित्यशास्त्राविषयक व व्याकरणविषयक प्राचीनतम ग्रंथ. तोल्काप्पियनर हा त्याचा कर्ता. त्याचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. पू. तिसरे शतक मानला जातो. तोल्काप्पियनर हा अगस्त्य (अगत्तियनर) ऋषीच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य मानला जातो. ‘काप्पियर’ नावाच्या एका वेल्लाळ कुटुंबात त्याचा जन्म झाला. नीलंतरू तिरुवीर ह्या पांड्य राजाने कपदपुरम्‌ येथे स्थापन केलेल्या दुसऱ्या ‘संघम्‌’ मधील तो एक मान्यवर व्याकरणकार व कवी होता. त्याच्याबाबत फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. हा ग्रंथ तीन भागांत विभागला असून प्रत्येक भागात नऊ प्रकरणे आहेत. ‘इलुत्तु’ नावाच्या पहिल्या भागात तमिळ भाषेचा ध्वनिविचार ‘सोल’ ह्या दुसऱ्या भागात रूपविचार व वाक्यविचार आणि ‘पोरुळ’ ह्या तिसऱ्या भागात वाङ्‌मयीन संकेत, छंदःशास्त्र व साहित्यशास्त्र यांचे विवेचन आलेले आहे. ह्या ग्रंथाच्या अनेक शतके आधी तमिळ वाङ्‌मयाचा विकास झालेला होता, हे उघडच आहे. कारण ग्रंथकार तमिळ साहित्यातील विविध प्रकारच्या रचनांचे आणि त्याच्या काळी प्रचलित असलेल्या वाङ्‌मयीन परंपरेचे नियम त्यात सांगतो. आधीच्या इतर व्याकरणकारांचाही उल्लेख त्याने आपल्या ग्रंथात केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथातील ध्वनिविचाराचे व रूपविचाराचे विवेचन हे भक्कम पुराव्यावर आधारित असल्याचे आधुनिक भाषावैज्ञानिक मान्य करतात. ह्या ग्रंथाचा तिसरा भाग हा तत्कालीन वाङ्‌मयीन सिद्धांताबाबतच्या माहितीचे भांडारच आहे. ‘पोरुळ’ भागातील विवेचनातून इतिहासपूर्व तमिळ जीवनावर व संस्कृतीवर चांगला प्रकाश पडतो.

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)