तिरुक्कुरळ : शेवटच्या संघम् काळातील कवी तिरुवळ्ळुवर याचा नीतिबोधपर प्रख्यात काव्यग्रंथ. शिलप्पधिकारम् व मणिमेखले या तमिळ महाकाव्यांत तिरुक्कुरळमधील काही अवतरणे आहेत. त्यावरून हा ग्रंथ वरील दोन महाकाव्यांच्या आधीचा असावा हे निश्चित. त्याचा रचनाकाळ सु. पहिले शतक मानला जातो तथापि त्याबाबत विद्वानांत मतभेद आहेत. तमिळमधील पारंपारिक ‘पदिनेण्‌कीळ–कणवकु’ मधील म्हणजे अठरा नीतिपर ग्रंथांतील तिरुक्कुरळ हा विशेष महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. ‘तमिळवेद’ म्हणूनही त्याचा गौरवाने उल्लेख केला जातो. तसेच त्यात मुख्यत्वे धर्म, अर्थ व काम ह्या तीन पुरषार्थांबाबतचे सूत्रवचनात्मक चिंतन असल्यामुळे त्याला ‘मुप्पाल’ (त्रिवर्ग) असेही म्हटले जाते. ‘तिरु’ हा संस्कृतमधील ‘श्री’ सारखा आदरार्थी शब्द असून ‘कुरळ’ हे दोन ओळींच्या एका प्राचीन तमिळ छंदाचे नाव आहे. कुरळशैलीत तो लिहिलेला असल्यामुळे त्याला तिरुक्कुरळ नाव प्राप्त झाले.

या ग्रंथाचा कर्ता तिरुवळ्ळुवर याचा काल सर्वसाधारणपणे पहिले शतक मानला जातो. त्याच्या जीवनाबाबत निश्चित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. त्याच्या गूढ जीवनाभोवती अनेक आख्यायिकांचे जाळे विणले गेले. प्रसिद्ध तमिळ कवयित्री पहिली ⇨ अव्वैयार (औवैयार) हिचा तो भाऊ असल्याचे सांगितले जाते. तिरुवळ्ळुवरला नंतर देवतास्वरूप मानणाऱ्यांच्या कल्पनेतून ह्या आख्यायिका निर्माण झाल्या. ह्या महान ग्रंथातून त्याची संतवृत्ती, विशुद्ध हेतू आणि उदात्त तत्त्वे यांचा निश्चितपणे प्रत्यय येतो. सुरुवातीस तो एका विशिष्ट धर्माचा (बहुधा जैन धर्माचा) अनुयायी असला, तरी नंतर त्याचे उन्नयन होऊन तो सर्वधर्मांतीत होतो आणि वसुधैव कुटुंबकम् वृत्तीतून अखिल मानवजातीकडे पाहताना दिसतो. अधर्मास, दुष्टतेस, मग हा अधर्म वा ही दुष्टता राजसिंहासनाधिष्टित असली तरी तिलाही, शासन करणाऱ्या आणि सदाचरणाचा कैवार घेणाऱ्या ‘अरम्’च्या (धर्माच्या) शक्तीवर त्याची अढळ श्रद्धा आहे. संन्यस्त जीवनाइतकाच किंबहुना त्याहूनही अधिक आदर त्याला गृहस्थजीवनाबाबत आहे. राज्यतंत्र आणि नागरिकत्व यांबाबतची त्याची जाण कौतुकास्पद आहे.

तिरुवळ्ळुवरने आपल्या ह्या अभिजात ग्रंथात धर्म, राज्यतंत्र आणि आदर्श प्रेम हे विषय हाताळले आहेत. हा ग्रंथ रचताना कवीने विविध धार्मिक मते, विधी, रूढी तसेच सामाजिक व राजकीय जीवनातील बदलते प्रवाह यांच्याही पलीकडे जाऊन केवळ मानवी स्वभावाचे मर्म तसेच सामाजिक व वैयक्तिक जीवनातील नीतिमत्ता यांचेच चित्रण त्यात केले आहे. त्याने कुठल्याही विशिष्ट पंथास, वंशास वा धर्मास अनुलक्षून आपला ग्रंथ रचला नाही, तर अखिल मानवतेस अनुलक्षूनच त्याने त्याची रचना केली. म्हणूनच त्याच्या शब्दांना सर्वच धर्मांत आणि अखिल जगात मान्यता व प्रामाण्य लाभले.

तिरुक्कुरळमध्ये प्रत्येकी दोन ओळींची एकूण १,३३० पद्ये असून दहा दहा पद्यांची १३३ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात एकेक विषय हाताळला आहे. ही सर्वच पद्ये कमालीची अर्थसघन असून अभिव्यक्तिसौंदर्याने ओतप्रोत आहेत. ग्रंथाची विभागणी तीन मोठ्या विभागांत केलेली आहे. पहिल्या ‘अरत्तुप्पाल’ नावाच्या  विभागातील ३८० पद्यांत अरम् म्हणजे धर्म ह्या पुरुषार्थांबाबतचे, दुसऱ्या ‘पोरुट्‌पाल’ ह्या विभागातील ७०० पद्यांत ‘पोरुळ’ म्हणजे अर्थ ह्या पुरुषार्थाबाबतचे आणि तिसऱ्या ‘कामत्तुप्पाल’ विभागातील २५० पद्यात ‘इन्बम्’ म्हणजे काम ह्या पुरुषार्थाबाबतचे कवीचे काव्यरूप चिंतन आले आहे.

प्राचीन ऋषिमुनिप्रणीत जीवनातील पहिल्या तीन पुरुषार्थांचेच चिंतन यात आहे. मोक्ष ह्या चौथ्या पुरषार्थाची कवीला जाणीव आहे तथापि त्याने त्याला विशेष महत्त्व न देता त्याचे ओझरते उल्लेख केले आहेत. पहिल्या तीन पुरुषार्थांचेच जर नीट आकलन होऊन तसा आचार ठेवला, तर मोक्षाबाबत विशेष चिंता बाळगण्याचे कारण नाही, तो आपोआपच प्राप्त होतो, असे कदाचित त्याचे मत असावे.

पहिला भाग धर्मविषयक असून त्याची सुरूवात ईशस्तवनाच्या प्रकरणाने होते. दुसरा भाग अर्थशास्त्रविषयक (कौटिलीय अर्थशास्त्राच्या व्यापक अर्थाने) आहे. हा भाग मुख्यत्वे राज्यकर्त्यांना अनुलक्षून असला, तरी त्यातील शिकवण समाजातील सर्वच व्यक्तींना उपयुक्त ठरणारी आहे. विशिष्ट राज्य, काल व सामाजिक वर्ग यांच्या पलीकडे जाऊन सर्व राज्यांतील सर्व सामाजिक वर्गांना कुठल्याही काळात उपयुक्त ठरतील अशी नीतितत्त्वे तो व्यक्त करतो. मानवी जीवनाच्या मूलभूत प्रवृत्तींवर त्याचे हे चिंतन आधारलेले आहे.

तिसऱ्या भागाचा विषय काम वा उदात्त वैवाहिक प्रेम हा असून त्यात कवीच्या अलौकिक प्रतिभेचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो. तिरुक्कुरळच्या पहिल्या भागात उच्च नैतिक व आध्यात्मिक शिकवण देणारा कडवा नीत्युपदेशक म्हणून, दुसऱ्या भागात व्यावहारिक शहाणपण सांगणारा समर्थ राजनीतितज्ञ म्हणून आणि तिसऱ्या भागात वाचकाला आदर्श प्रेमाबाबतच्या कल्पनारम्य चित्रणाने स्फूर्ती देणारा एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून तिरुवळ्ळुवरचे दर्शन घडते.

या ग्रंथातील पद्ये केवळ उपदेशपरच आहेत असे नव्हे, तर ती कल्पकता आणि दिव्य दृष्टीचे वरदान लाभलेल्या महान आत्म्याचे सखोल अनुभूतीतून व चिंतनातून स्फुरलेले अभिजात काव्योद्‍गारही आहेत. नैतिक जीवनाचा उत्कृष्ट काव्याविष्कार म्हणून त्यांचे मोल विशेष आहे.


चाणक्य किंवा मॅकिआव्हेली यांच्या कुटिल राजनीतीचा त्याच्या अर्थविषयक भागात मागमूसही आढळत नाही. त्याच्या राजनीतीस मानवतावादाची आणि आदर्शाची डूब आहे. राज्याचे अस्तित्वच मुळी प्रजेचे हित आणि तिचा नैतिक अभ्युदय साधण्यासाठी असते, हा कवीचा दृष्टिकोन मोलाचा आहे.

दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या उपमांनाही त्याच्या रचनेत फार मोठा प्रतीकात्मक अर्थ सहज प्राप्त होतो. उदा., ‘ज्याची आधी उत्तम निगा राखली जात होती असा डोक्यातील केस जेव्हा आपोआप गळून पडतो, तेव्हा तो केरातच टाकला जातो.’ यातून कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्तीच्या पतनाचे व तिच्या नंतरच्या अवस्थेचे प्रतीक समर्थपणे साकार होते. ‘नीतीपासून विन्मुख होणे आणि दुष्कर्म करणे हे निःसंशय वाईट आहे परंतु तोंडावर गोड बोलून मागे एखाद्याची निंदा करणे, हे त्याहीपेक्षा वाईट आहे.’ ‘एखाद्या देशाची समृद्धी भूतकाळात कितीही असली आणि तो देश जर दुष्कीर्तिवान लोकांच्या ओझ्याने दबला गेला असेल, तर तो देश हळूहळू धुळीस मिळेल’. विविध विषयांवर अशा आशयाची मार्मिक पद्ये त्यात आलेली आहेत. ही पद्ये सुटीसुटी असली, तरी प्रत्येक पद्य तसे परिपूर्ण आहे. अशा सुट्या सुट्या पद्यांतून कवी आपल्या प्रतिभासामर्थ्याने नीतिमान माणसाचे व न्यायनिष्ठ राज्याचे एकसंघ चित्र साकार करतो. सूचकता, उपमा, सामर्थ्यसंपन्न लघुकाव्यशैली यांनी हा ग्रंथ भरलेला आहे.

तमिळ साहित्यावर व तमिळ भाषिकांवर तिरुक्कुरळचा प्रभाव अनन्यसाधारण आहे. आदर्श मानवाची लक्षणे सांगणारा ‘लक्षणग्रंथ’ म्हणून त्याचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे. यातील नीतिवचनांचा प्रभाव आजही तमिळनाडुच्या जनजीवनावर कायम आहे. अनेक तमिळेतर विद्वानांनीही त्याचा गौरव केला असून त्याची हिंदी, मराठी, इंग्रजी, रशियन इ. वीसबावीस भारतीय व यूरोपीय भाषांत भाषांतरेही झाली आहेत. डॉ. जी. यू. पोप यांना त्यात ख्रिस्ती धर्माचे प्रतिध्वनी ऐकू येतात. हिंदू, जैन, बौद्ध या धर्मांचे लोक तिरुवळ्ळुवर हा आपल्या धर्माचा अनुयायी असल्याचा दावा करतात. यावरून प्रस्तुत ग्रंथास असलेली वैश्विक मान्यताच विशेषत्वे जाणवते आणि ग्रंथाच्या महनीयतेचे रहस्यही प्रत्ययास येते. प्रख्यात तमिळ कवी ‘भारती’ यांनी म्हटले आहे, की तिरुक्‍कुरळसारखा अभिजात काव्यग्रंथ निर्माण करून तमिळनाडूने जगाच्या साहित्यात तिरुक्कुरळच्या तोडीचा उच्च प्रकारच्या शहाणपणाने भरलेल्या नीतिवचनांचा संग्रह क्वचितच असेल. तमिळ लोकांची पवित्र नीतिवचने असलेला ‘तमिळवेद’ म्हणून महात्मा गांधीनी त्याचा गौरव केला. एरिएल यांनी मानवी विचारांचा सर्वोच्च व विशुद्धतम अविष्कार म्हणून तो गौरविला आहे.

संदर्भ : 1. Tiruvalluvar Trans. Aiyar, V. V. S. The Kural or The Maxims of Tiruvalluvar, Tiruchirapalli, 1952.

   २. तिरुवळ्ळुवर अनु. पेशवे, ना. गो. तामिल–वेद :  महात्मा तिरुवल्लुवर यांच्या त्रिक्कुरलचे मराठी भाषांतर, खानापूर, जि. बेळगाव, १९३०.

वरदराजन, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)