तुळु भाषा : तुळु ही द्राविड भाषासमूहातील एक भाषा असून ती कर्नाटक राज्याच्या द कॅनरा या सागरी भागात आणि केरळच्या उत्तरेला कासरगोड तालुक्यात बोलली जाते. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे तुळु भाषिकांची संख्या ९,३५,१०८ होती. त्यापैकी ८,५०,४७४ कर्नाटकात, ६८,१९० केरळात, ११,१९९ महाराष्ट्रात, ४,६७२ तमिळनाडू राज्यात आणि बाकीचे देशाच्या इतर भागांत होते.
पूर्वी तुळूच्या लेखनासाठी मलयाळम् लिपीतून उत्पन्न झालेल्या तुळू लिपीचा उपयोग होत असे. अलीकडे जवळजवळ शंभर वर्षांत मात्र ही जागा कन्नड लिपीने घेतली आहे.
ध्वनिविचार : स्वर : अ, आ, इ, ई, ए (ऱ्हस्व व दीर्घ), उ, ऊ, ओ (ऱ्हस्व व दीर्घ), ॲ (ऱ्हस्व व दीर्घ)
व्यंजने : क, ग, ङ् च, ज, ञ ट, ड, ण त, द, न प, ब, म य, र, ल, ळ, व, श, ष, स, ह.
व्याकरण :नाम : तीन लिंगे व दोन वचने आहेत. काही नामांचे अनेकवचन होत नाही. विभक्ती आठ आहेत. त्यांचे प्रत्यय पुढील प्रमाणे :
विभक्ती |
ए. व. |
अ. व. |
प्रथमा |
शून्य, अ, ऊ, ए |
रू, ळु, कुळु |
द्वितिया |
न, नु |
रे, ळेणु |
तृतीया |
टा, डा |
लेडा |
चतुर्थी |
ग, क, गु, कु |
रेग |
पंचमी |
डद, डदु |
ळेडदु |
षष्ठी |
आ, ता, दा |
रे, ळे |
सप्तमी |
ट, ड, टु, डु |
ळेडु |
संबोधन |
आ, ओ |
रे, ळे |
सर्वनाम : सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत :
ए. व. |
अ. व. |
|
प्र. पु |
एन ‘मी’ |
एंक्ळु ‘आम्ही’ नावु ‘आपण’ |
द्वि. पु. |
इ ‘तू’ ईर ‘तू’ (आदरार्थी) |
निंक्ळु ‘तुम्ही’ |
तृ. पु.(दुर) |
पु. आये स्त्री. आळ आदरार्थी आर |
आकळु |
न. आवु |
आय्कळु |
|
(निकट) |
पु. उंब्ये स्त्री. उंबाळ |
मूक्ळु (मानव) |
न. उंदु |
उंदेक्ळु (सचेतन) |
|
नेक्ळु (अचेतन) |
प्रश्नवाचक सर्वनामे एर (पु. स्त्री) व ओवु ए. व.–ओयक्ळु अ. व (न.) ही आहेत.
विशेषण : तुळूमध्ये सिद्ध विशेषणे कमी आहेत पण ही उणीव नामांना आपिनि व आदुप्पुनि हे प्रत्यय लागून भरून निघते. सिद्ध विशेषण : पोसा ‘नवा’ – पोसाकुंटु ‘नवे कापड’. साधित विशेषण : बेने ‘वेदना’ – बेनेउप्पु ‘वेदनाकारक’. पंचमीनंतर येणारे विशेषण तुलना आणि सप्तमीनंतर येणारे श्रेष्ठत्व दाखवते.
क्रियापद : धातूचे रूप जसेच्या तसेच वापरून किंवा त्याला ला हा प्रत्यय लावून आज्ञार्थाचे एकवचन मिळते. अनेकवचनी ले हा प्रत्यय लागतो : पो ‘जा’- पोला ! ‘जा !’ – पोले – ‘जा !’
वर्तमान व भविष्य हा एकच काळ आहे. काट ‘बांध –’ या धातूची या काळाची रूपे अशी :
ए. व. |
अ. व. |
||
प्र. पु |
काट्वे |
काट्वो |
|
द्वि. पु. |
काट्वा |
काट्वार |
|
तृ. पु. |
पु. |
काट्वे |
काट्वेर |
स्त्री. |
काट्वाळ |
||
न. |
काट्टुणु |
काट्वो |
भूतकाळ, पूर्णभूतकाळ इ. काळ अशाच प्रकारे प्रत्यय लागून होतात. नकारवाचक रूपे विशिष्ट प्रत्यय लागून होतात.
अव्यय : अव्ययातही विशेषणाप्रमाणे सिद्ध व साधित असे प्रकार आहेत : कोडे ‘काल’ इनि ‘आज’ पेट्टिगे ‘लगेच’ कुडा ‘पुन्हा’. क्रियापदांना व नामांना अद, दाते हे प्रत्यय लावून साधित अव्यये मिळतात : गुट्टु ‘गुपित’ – गुट्टुअद ‘गुपचूप’ पोर्लु ‘सुंदर’–पोर्लुअद ‘सुंदर प्रकारे’.
वाक्यरचना : वाक्यरचना साधारणपणे मराठीप्रमाणेच आहे.
काही शब्द व वाक्ये : सोन्ने ‘शून्य’ ओंजि ‘एक’ एराड ‘दोन’ मूजि ‘तीन’ नाल ‘चार’ आय्न ‘पाच’ आजि ‘सहा’ एळ ‘सात’ एण्मा ‘आठ’ ओर्म्बा ‘नऊ’ पात्तोंजि ‘दहा’.
पोतु बहळ पोल्टु गोब्येर ‘जाऊन बराच वेळ ते खेळले’. ओंजि उरूडू ओरि संपन्ने इत्ते ‘एका गावात एक श्रींमत माणूस होता’. आयरा एळ जेवु बारुळित्ते ‘त्याला सात मुली होत्या’. ओंजि, दिन जेवु एळ जेवु बरुळ्ळ ओट्टुगु केडक मीयारे न्ति पंडत पोयेर ‘एके दिवशी सातही मुली मिळून तळ्यावर आंघोळीला गेल्या’.
संदर्भ : 1. Bhat, D. N. S. Descriptive Analysis of Tulu, Poona, 1967.
2. Brigel, Rev, J. Grammar of the Tulu Language, Mangalore, 1812.
कालेलकर, ना. गो.
“