तुकडोजी महाराज : (२९ एप्रिल १९०९–१० नोव्हेंबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. विदर्भात यावली (जि. अमरावती) येथे जन्म. ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि. अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले.
राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी १९३० सालच्या सत्याग्रहात भाग घेऊन केला. गांधीजींसारख्या राष्ट्रनेत्यांबरोबर त्यांचा संबंध आला. तुकडोजी महाराजांनी राष्ट्रकार्याकरिताच आपले जीवन समर्पित केले. १९३६ साली गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू, पं. नेहरू, मौलाना आझादप्रभृती राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला. भारत सेवक समाजात त्यांनी गुलझारीलाल नदाजींबरोबर काम केले. आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांची सु. चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. ४१ अध्यायांचे ४,६७५ ओवीसंख्या असलेले ग्रामग्रंथ हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी सुविचारस्मरणी हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन इ. कार्यांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले.
विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी १९५५ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्च्यात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करीत. ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तिविकास व समाजजागृती केली पाहिजे, असे ते म्हणत. धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. गुरुकुंज आश्रमात (मोझरी, जि. अमरावती) त्यांचे निधन झाले. तेथेच त्यांची समाधी आहे. गुरुकुंज आश्रमाच्या वतीने अनेक प्रकारचे समाजोपयोगी कार्य चालू आहे.
भिडे, वि. वि.
“