तुंग : तुंगनाथ. हिमालयातील एक तीर्थक्षेत्र. हे उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथाच्या मार्गावर ३,९४३ मी. उंचीवर उखीमठपासून सु. ३५ किमी. आहे. येथे श्रीतुंगनाथाचे प्राचीन दगडी मंदिर आहे. हे पाच केदारांपैकी एक असून ते शिवाच्या बाहूंच्या ठिकाणी कल्पिलेले आहे. मंदिरात लहान आकाराचे शिवलिंग व काही मूर्ती आहेत. मंदिराचे आवार प्रशस्त असून शिखर पॅगोडा पद्धतीने आहे. मंदिराजवळ पंड्यांची वस्ती आहे. येथून नंदादेवी, पंचशूली, गंगोत्री, जम्नोत्री, द्रोणाचल, केदारनाथ, बद्रीनाथ इ. हिमालयातील हिमाच्छादित शिखरांचे व पाताळगंगा (आकाशगंगा) यांचे ह्यदयंगम दर्शन घडते. येथे भृगुऋषीने तप केले होते, म्हणून यास भृगुतुंग असेही म्हणतात. महाभारत व ब्रह्मांडपुराणांतही याचा उल्लेख आढळतो.
कांबळे, य. रा.