तास : हे कालमापनाचे सुटसुटीत पण कृत्रिम एकक आहे. माध्य सौरदिनाच्या [→ कालमापन] चोविसाव्या भागास तास म्हणतात. यात ६० मिनिटे ३,६०० सेकंद व अडीच घटका असतात. तासाला होरा अशीही संज्ञा असून तिचा ‘अवर’ या इंग्रजी शब्दाशी संबंध असावा. पुष्कळ देशांमध्ये मध्यरात्रीपासून तास मोजण्यास सुरुवात करतात व १२–१२ तासांचे दोन गट पाडतात. तास मोजण्यास दुपारपासून प्रारंभ करण्याची टॉलेमी (इ. स. दुसरे शतक) यांची पद्धती १९२५ सालापर्यंत वापरात होती. त्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार मध्यरात्रीपासून तास मोजण्यास सुरुवात झाली आणि २४ तासांचा दिवस मानून घोटाळा टाळण्यासाठी चार अंकांनी वेळ दर्शविली जाऊ लागली. उदा., रात्रीचा एक = ०१·००, दुपारचा एक = १३·००, रात्रीचे बारा = २४·०० इत्यादी. काही ठिकाणी दशांश चिन्ह न वापरता केवळ चार अंकच देतात. ही पद्धत लष्करी खात्यात, रेल्वे व मोटारींची वेळापत्रके इ. ठिकाणी वापरतात. तथापि नेहमीच्या घड्याळांत आणि सर्वसामान्य व्यवहारात १२ तासांची पद्धतच वापरतात. या पद्धतीत मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंत (इंग्रजीत a.m., ante meridiem) १२ तासांचा एक गट आणि मध्यान्हापासून मध्यरात्रीपर्यंत (p.m., post meridiem) असा बारा तासांचा दुसरा गट मानण्यात येतो. दिवसाची ही कृत्रिम विभागणी आता औद्योगिक दृष्ट्या आवश्यक बनली आहे.
काळाची अशी विभागणी केव्हा व कोणी केली, हे ज्ञात नाही. प्राचीन रोमन दिवसातील काळ (उदा., सूर्यास्त, दुपार इ.) दर्शविण्यासाठी तास ही संज्ञा वापरीत. इ. स. च्या सुरुवातीस त्यांनी दिवसाचे असे पाच तास केले होते व ते ⇨ सूर्यछाया घड्याळावरही दाखवीत. चिनी व जपानी लोक १२० मिनिटांचे एकक वापरीत. ६०५ साली ख्रिश्चन चर्चने प्रार्थनांच्या वेळानुसार दिवसाचे सात तास पाडले होते. ते पहाटे सुरू होत व दिवसाचा काळ तेवढा सुचवीत असत. इ. स. १५०० पर्यंत यूरोपातील बऱ्याच ठिकाणी १२ तास दर्शविणाऱ्या तबकडीची घड्याळे लावण्यात आली. मात्र सूर्य सर्वांत वर आला असता ती लावीत असल्यामुळे त्यांच्या वेळा निश्चित नसत. यावरूनच a.m. व p.m. असे तासांचे गट पडले. अठराव्या शतकापर्यंत सूर्योदय ते सूर्यास्त किंवा सूर्यास्त ते सूर्योदय या काळाचा बारावा भाग म्हणजे तास मानला जाई. हे तास ऋतुमानानुसार बदलत. मात्र संपाताच्या वेळी तास समान असत. अशा प्रकारचा तास हिपार्कस यांनी प्रथम वापरून मध्यरात्रीपासून तास मोजण्यास प्रारंभ करावा, असेही सुचविले होते (इ. स. पू. सु. १२०). घड्याळे वापरात आल्यावर तासांमधील असमानता गैरसोयीची झाल्याने तासांच्या कालावधीत समानता आली. १२ या तासांच्या संख्येचा संबंध कदाचित १२ राशी, १२ महिने किंवा पूर्वी वापरात असलेली १२ या मूलांकावर आधारलेली अंक पद्धती यांच्याशी असावा.
ठाकूर, अ. ना.