तारापोरवाला, इराच जहांगीर सोराबजी : (१८८४–१५ जानेवारी १९५६). भारतीय भाषाशास्त्रज्ञ. भाषा विषयात (इंग्लिश–संस्कृत) मुंबई विद्यापीठाचे पदवीधर झाल्यानंतर १९०४ मध्ये इंग्लंडला जाऊन १९०९ मध्ये बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण. यूरोपात जाऊन फ्रेंच व जर्मनचा अभ्यास. भारतात येऊन अध्यापन. १९१३ मध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र या विषयावर वुट्सबर्ग विद्यापीठाची पीएच्.डी. अवेस्ताचा अभ्यास. केंब्रिज येथे संस्कृत, तुलनात्मक व्याकरण, अरबी आणि इराणी यांचा अभ्यास. भारतात परत आल्यावर प्रथम कलकत्ता विद्यापीठात आणि नंतर मुंबईच्या ‘कामा इन्स्टिट्यूट’ मध्ये अध्यापन. त्यांच्या प्रयत्नामुळे अवेस्ताच्या अभ्यासाला जोराची चालना मिळाली. ते ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’ च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असून अनेकदा तिचे अध्यक्षही होते. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे ते बऱ्याच वेळा शाखाध्यक्षही होते. त्यांच्या ग्रंथांपैकी सिलेक्शन फ्रॉम अवेस्ता अँड ओल्ड पर्शियन (१९२२), द रिलिजन ऑफ जरथुश्त्र (१९२६), द गाथाज ऑफ जरथुश्त्र (१९४७), सिलेक्शन फ्रॉम क्लासिकल गुजराती लिटरेचर, एलिमेंटस ऑफ द सायन्स ऑफ लँग्वेज (१९५१) इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. ‘डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट’ ने त्यांना आदरांजली म्हणून, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तारापोरवाला मेमोरिअल व्हॉल्युम (जानेवारी ५८) हा खंड प्रकाशित केला. तसेच इंडियन लिंग्विस्टिक्सचाही तारापोरवाला मेमोरिअल व्हॉल्युम (जून १९५७) प्रसिद्ध झालेला आहे.
कालेलकर ना. गो.
“