बेसिक इंग्लिश : आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी मुद्दाम ठरवलेले इंग्लिश भाषेचे एक सोपे रुप. आंतरराष्ट्रीय संपर्काचे प्रमाण आधुनिक युगात खूपच वाढल्यामुळे शिकायला व वापरायला सुटसुटीत आणि सोपे वाटेल असे भाषामाध्यम आवश्यक वाटू लागले. त्यासाठी यूरोपीय भाषांवर बेतलेल्या एस्पेरांटोसारख्या ⇨कृत्रिम भाषांची निर्मितीही कोणिसाव्या शतकापासून झाली, पण त्या मूळ धरेनात. मध्यंतरी इंग्लिशचे महत्त्व वाढतच राहिले आणि ती भाषा सोपी करण्यासाठी स्पेलिंगच्या सुधारणेसारखे प्रयत्न चालू झाले. त्यातला सगळ्यात मूलगामी प्रयत्न म्हणजे सी. के. ऑग्डेन (१८८९-१९५७) या ब्रिटिश शैक्षणिक मनोवैज्ञानिकाने, १९२६-३० या कलावधीत केलेली ‘बेसिक इंग्लिश’ची निर्मिती.

इंग्लिश भाषेतील केवळ ८५० शब्द मूलधन म्हणून ह्यामध्ये वापारायचे असतात : ६०० नामे (पैकी २०० चित्रांद्वारे स्पष्ट करण्यासारखी) १५० विशेषणे (पैकी ५० विरुद्ध अर्थांची), १०० तर शब्द (पैकी १८ क्रियापदे). ह्यांच्या जोडीला या शब्दांपासून झालेले सोपे समासिक शब्द आणि –ly,–er,–ing,–ed यांसारखे प्रत्यय लावून साधलेले शब्द, तसेच ‘रेडिओ’, ‘होटेल’ ‘क्लब’ यांसारखे ५० ‘आंतरराष्ट्रीय’ शब्द, जरूर ती विशेषनामे व आकडे, वजने–मापे, महिने–वार, नाणी एवढी भर घातली म्हणजे झाले. ब्रिटिश, अमेरिकन, सायंटिफिक, इंटरनॅशनल, कमर्शियल या शब्दांच्या आद्याक्षरांतून ‘बेसिक’ हा शब्द सूचित होतो, तसे बेसिक इग्लिशचे कार्यक्षेत्रही सूचित होते. नमुन्यादाखल हा बेसिक इंग्लिशमध्ये लिहिलेला उतारा

पहा :

‘An increase in brainpower may be possible on a scale which at present we have no idea of. For    this to come about, we will have to take control of evenrs which at present we have no control over at all’.

बेसिक इंग्लिश पद्धतशीरपणे शिकले, तर इंग्लिश जाणणाऱ्या माणसाला ते त्याच्यावर ३० ते ५० तास खर्च करून शिकता यावे, अशी कल्पना आहे. सामान्य शालेय पुस्तकांचे शब्दभांडार सु. २०,००० चे असते व सामान्य सुशिक्षितांचे ६०,००० च्या वर असते. हे लक्षात घेतले तर वेळाची किती आणि कशी बचत होईल ते समजेल.

विन्स्टल चर्चिल व फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी १९४३ साली युद्धोत्तर जगाची संपर्कभाषा म्हणून बेसिक इंग्लिशचा जोरदार पुरस्कार केला. ह्या अगोदरही त्यास शॉ. वेल्स, आय्. ए. रिचर्ड्स यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनीही पाठिंबा दिला होता. मात्र बा. सी. मर्ढेकर यांनी बेसिक इंग्लिशला नापंसती दर्शविणारी एक पुस्तिका लिहिली होती.

ऑग्डेनच्या व्यावहारिक पातळीवरच्या प्रयत्नाला क तात्त्विक स्वरुपाचे अधिष्ठान आहे. यूरोपात सतराव्या शतकात आधुनिक विज्ञानाची परंपरा स्थापन झाल्यावर लायप्निट्ससारख्या विज्ञान, गणित यांमध्ये रस घेणाऱ्या विचारवंताच्या मनात कल्पना आली, की मानवाला लागणाऱ्या मूलभूत संकल्पना किती? सामान्यतः भाषेत असणारा पसारा टाळून त्या व्यक्त कशा करता येतील?- शैक्षणिक पातळीवर हीच कल्पना अशी मांडता येईल : विद्यार्थ्याच्या हातात द्यावयाच्या शब्दकोशात प्रत्येक शब्दापुढे दिलेला अर्थ त्याला समजतील अशाच शब्दात द्यावयाचे ठरविले तर, अगोदर त्या विद्यार्थ्याचे शब्दभांडार कमीत कमी किती शब्दांचे लागेल आणि त्यात कोणते शब्द घालावे लागतील ? ऑग्डेन याने स्थापलेल्या ‘द ऑर्‌थॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ तर्फे बेसिक इंग्लिश प्रकाशने निघतात. त्यात अशा शालेय इंग्लिश शब्दकोशांचा समावेश आहे. बेसिक इंग्लिशच्या मर्यादा उघड आहेत. ज्या चर्चिलने तिचा पुरस्कार केला त्याची एक प्रसिद्ध उक्ती आणि तिचे बेसिक इंग्लिशमध्ये केलेले रूपांतर पडताळून पहावे. ‘–I have nothing to offer but blood, toil, tears and sweet’ (१९४० साली प्रधानमंत्री झाल्यानंतरचे पहिले भाषण) बेसिक इंग्लिशमध्ये ‘I have nothing to make an offer of other than blood, hard work, eye water and skin water.’ मर्ढेकरांसारख्या हाडाच्या कवीला बेसिक इंग्लिश का पसंत पडू नये, हे यावरून लक्षात यावे पण तयाचबरोबर दैनंदिन व्यवहार, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान या पातळ्यांवर, (जरूर त्या पारिभाषिक शब्दांची भर घालून) फक्त बेसिक इंग्लिश शिकलेली व्यक्ति आपले काम चालवू शकेल हेही कळेल.

संदर्भ : 1. Ogden, C. K. Basic English, London, 1944.

             2. Ogden, C.K. The ABC of Basic English, London, 1932.

दासवाणी, तिलोत्तमा.