चितगाँग : बांगला देशाचे प्रमुख बंदर व जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ४,८८,३०० (१९७२ अंदाज). हे कर्णफुली नदीच्या उजव्या किनाऱ्यावर मुखापासून १९ किमी. आत आणि डाक्क्याच्या १९३ किमी. आग्नेयीस आहे. प्राचीन काळी त्रिपुराच्या हिंदू राज्यात समाविष्ट असलेले हे स्थळ नवव्या शतकात आराकानच्या ब्रह्मी राज्यात गेले. त्यामुळे येथे हिंदू आणि बौद्ध अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. सोळाव्या शतकात मोगल अंमलाखाली असता येथे चाच्यांचा मोठाच अड्डा होता. काही दिवस हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते त्यांनी याला पोर्तोग्रांदे हे नाव दिले होते. ब्रिटिश कारकीर्दीत हे प्रामुख्याने आसामच्या चहा निर्यातीचे केंद्र बनले. पाकिस्तान निर्मितीनंतर चितगाँगला खूपच महत्त्व आले. १९६६ साली येथे विद्यापीठ स्थापन झाले. कर्णफुली नदीप्रकल्पांच्या विजेमुळे चितगाँगला पोलाद, कापड, ताग, रसायन व नित्योपयोगी वस्तूंचे अनेक उद्योगधंदे निघाले. ताग, तांदूळ, तंबाखू, तेलबिया, चहा, खनिज तेल, यंत्रसाहित्य इत्यादींची ही बाजारपेठ बनली. बांगला देशाच्या स्वातंत्र्यनिर्मितीच्या काळी चितगाँगला विशेष महत्त्व आले. चितगाँगची युद्धात खूप हानी झाली. पाकिस्तानने येथे चिवट प्रतिकार केला. बांगला देशाच्या स्थापनेनंतर चितगाँगला ऊर्जितावस्था मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.
ओक, द. ह.