चिखलदरा : अमरावती जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतक्षेत्रांतर्गत मेळघाट तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण, समुद्रसपाटीपासून उंची १,११५ मी. लोकसंख्या २,४८६ (१९७१). हे अचलपूरच्या आणि अमरावतीच्या वायव्येस अनुक्रमे २६ किमी. व १०० किमी. असून त्यांच्याशी उत्तम सडकांनी जोडलेले आहे. नयनरम्य वनश्रीने नटलेल्या या ठिकाणाचा शोध १८२३ साली लागला असला, तरी त्याचा विकास महाराष्ट्र शासनाने हे गिरिविहारस्थान बनविल्यापासूनच झाला. प्रवाशांसाठी येथे अनेक पॉइंट व बगीचे निर्माण करण्यात आले असून अनेक सोई केल्या आहेत. परिसरातील जंगल उत्पादनासाठी ही बाजारपेठ असून येथे कॉफी संशोधन केंद्र आहे. येथून २ किमी. वर गाविलगडचा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून चिखलदऱ्याच्या पश्चिमेस सु. ९ किमी. वर बैराट (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.

कुलकर्णी गो. श्री.