चिंद्विन नदी : ब्रह्मदेशातील इरावती नदीची प्रमुख उपनदी. लांबी सुं. ८८५ किमी. तनाई व तवान हे शीर्षप्रवाह एकत्र होऊन पातकई डोंगरात ही उगम पावते आणि दक्षिणेकडे हूकाउन खोऱ्यातून वाहत जाते. खोऱ्याच्या दक्षिणेस द्रुतवाह व धबधबे आहेत. या पहाडी प्रदेशात दुर्गम अरण्ये आणि वन्य श्वापदे आहेत. यानंतर होमलिनच्या खाली ऊयू ही उपनदी तिला मिळते. कुबोखोऱ्यातून आलेली यू ही उपनदी मिळाल्यावर चिंद्विन किंदतवरून जाते. मग कलेवाजवळ तिला म्यिथ्था मिळते. या नद्यांच्या खोऱ्यांत मासेमारी, लाकूडतोड, शिकार, रेशीम पैदा करणे हे व्यवसाय चालतात. सागाचे सोट प्रथम हत्तींकडून व मग प्रवाहांतून वाहून नेतात. मिंगिनजवळ थोडे पूर्वेकडे व पुन्हा दक्षिणेकडे आल्यानंतर चिंद्विनचे खोरे रुंदावते, वस्ती वाढते आणि भात, तंबाखू व इतर पिके दिसू लागतात. पकोक्कू व मिंज्यान या दरम्यान चिंद्विन इरावतीला मिळते. संगमाच्यावर ३२० किमी. किंदतपर्यंत छोट्या आगबोटी चालतात आणि पावसाळ्यात आणखी २०० किमी. वर होमलिनपर्यंत त्या जातात. गावठी नावा द्रुतवाहांच्या वरच्या बाजूसही चालतात.
यार्दी, ह. व्यं.