चिंगहाई : चीनचा पश्चिमेकडील एक प्रांत. क्षेत्रफळ ७,२१,००० चौ.किमी. लोकसंख्या सु. २१ लाख (१९७०). चिंगहाई किंवा कोकोनॉर म्हणजे निळा समुद्र. या नावाने चीनचे सर्वांत मोठे खारे सरोवर या प्रांताच्या ईशान्य भागात आहे. चिंगहाईच्या पूर्वेस व उत्तरेस कान्सू, उत्तरेस व पश्चिमेस सिंक्यांग ऊईगुर स्वायत्त विभाग, पश्चिमेस व दक्षिणेस तिबेट आणि आग्नेयीस सेचवान प्रांत आहेत. आग्नेयीकडील ४,००० मी. उंचीच्या तिबेटच्या पठाराच्या भागातून चीनच्या पीत नदी, यांगत्से, मेकाँग इ. मोठ्या नद्या उगम पावतात. बाकीच्या ३,००० मी. उंचीच्या पठारी भागात कुनलुनचे फाटे आलेले आहेत. उत्तर मध्यभागातील त्साइदाम हा विस्तीर्ण खाऱ्या दलदलीचा प्रदेश कोकोनॉरप्रमाणेच आठ महिने गोठलेला असतो. चिंगहाईचा बहुतेक भाग ओसाडच असून फक्त ईशान्य भागातच गहू, बार्ली, बटाटे, मका इ. पिके थोडीशी होतात. बाकीच्या भागात गवत आहे. यामुळे येथील भटके पशुपाल दूधदुभत्याचे पदार्थ, मेंढरांची व याकची कातडी, लोकर यांचा व्यापार करतात. अलीकडे ग्वेर्मोया औद्योगिक केंद्राभोवती खनिज तेल, यंत्रे, रसायने इत्यादींचे उद्योग वाढत आहेत. कोळसा, जस्त, खनिज तेल, चांदी, सोने ही खनिजे मिळण्याजोगी आहेत. शीनिंग या राजधानीशिवाय मोठी शहरे नाहीत. लानजोल्हासा मोटाररस्ता, लानजो-शीनिंग लोहमार्ग यांशिवाय वाहतुकीच्या सोयी अद्याप फारशा नाहीत. येथील निम्म्याहून अधिक लोक चिनी असून बाकीचे मंगोल, तिबेटी, कझाक, हुई, तुर्कोमन, सालार इ. आहेत.
ओक, द. ह.