चॉक : क्रिटेशस म्हणजे सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील सूक्ष्मकणी, हलका व सापेक्षतः मऊ चुनखडक. तो सच्छिद्र, पांढऱ्या ते करड्या रंगाचा असून त्याचा सहज भुगा होतो. तो जवळजवळ पूर्णपणे फोरॅमिनीफेरांच्या, विशेषतः ग्लोबिजेरिनांच्या कवचांचा बनलेला असतो. तरंगती शैवले, टेरोपॉड, डायाटम, रेडिओलॅरिया इत्यादींचे अवशेष, तसेच स्पंजाच्या कंटिका (सूक्ष्म टोकदार वाढ), कोकोलिथ, रॅब्डोलिथ (कॅल्शियम कार्बोनेटाच्या लहान पट्ट्या व दंड) आणि कधीकधी क्वॉर्ट्झ, ग्लॉकोनाइट वगैरेंचे कण त्यामध्ये असतात. चॉकचा आधारक (ज्यात मोठे स्फटिक जडविले गेलेले असतात तो भाग) सैलसर व संरचनाहीन कॅल्साइटाचा असतो. चॉकच्या जाड थरांमध्ये फ्लिंट, चर्ट आणि मृदू खनिजे आढळतात. त्याच्यातील जीवाश्मांवरून (सजीवांच्या शिळारूप अवशेषांवरून) तो मध्यम खोलीच्या (२०० ते ४०० मी.) समुद्रात तयार झाल्याचे दिसून येते. कॅल्शियमयुक्त ⇨ऊझ घट्ट होऊन किंवा महासागरातील तरंगणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या कवचांच्या चूर्णापासून चॉक तयार होत असावा. जीवाश्म नसलेला चॉक रासायनिक अथवा जीवरासायनिक अवक्षेपणाने (साका खाली बसून) निर्माण होत असावा.
अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ) व शोषक द्रव्य म्हणून तसेच रंगद्रव्ये, सिमेंट, कागद, मृत्तिका उद्योग, चुना, खते, खडू, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमध्ये चॉक वापरतात. पांढऱ्या रंगामुळे याला पूर्वी अल्बिनो म्हणत. कृत्रिम रीतीनेही चॉक बनवितात.
पहा : चुनखडक.
ठाकूर, अ. ना.