चांगचुन : चीनमधील मॅंचुरियाच्या कीरिन प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. १५ लक्ष (१९७०). दक्षिण मॅंचुरियन लोहमार्गावरील हे महत्त्वाचे प्रस्थानक, मूकडेनच्या ईशान्येस २६४ किमी. सुंगारी नदीच्या सुपीक खोऱ्यात यीडून नदीवर आहे. येथे लाकूडकटाई, रेल्वे एंजिने व रूळ, मालमोटारी, विजेची उपकरणे, चिनी मातीच्या वस्तू, विविध अभियांत्रिकी उत्पादन व खाद्यपदार्थ प्रक्रिया यांचे कारखाने आहेत. सोयाबिनची ही मोठी बाजारपेठ आहे. येथे विद्यापीठ असून उच्च शिक्षणाच्या अनेक संस्था आहेत. १९३२ ते ४५ पर्यंत येथे जपानी आधिपत्याखालील मॅंचूक्को राज्याची राजधानी होती, तेव्हा योजनापूर्वक विकास होऊन चांगचुनला आधुनिक शहाराचे स्वरूप आले. १९४६-४७ च्या चिनी यादवी युद्धातील अनेक संघर्ष येथे झाले.
ओक, द. ह.