चॅड : अफ्रिकेच्या मध्यभागातील एक गणराज्य. क्षेत्रफळ सु. १२,८४,००० चौ. किमी. लोकसंख्या ३७,०६,००० (१९७० अंदाज). हा देश सहारा आणि सॅव्हाना प्रकारच्या प्रदेशांदरम्यान, ८° उ. ते २३° उ. व १४° पू. ते २४° पू. यांमध्ये असून याच्या पूर्वेस सूदान, दक्षिणेस मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, पश्चिमेस कॅमेरून, नायजेरिया व नायजर आणि उत्तरेस लिबिया हे देश आहेत. फॉर्लामी ही राजधानी आहे. पश्चिमेकडील चॅड सरोवर नायजेरिया, नायजर, कॅमेरून व चॅड यांत विभागलेले आहे.

भूवर्णन : समुद्रापासून किमान १,४५० किमी. दूर असलेल्या या देशात, तिबेस्ती पर्वतप्रदेशातील मौंट एमीकूसी (३,४१५ मी.) सारखी उंच शिखरे व ६०० ते १,२०० मी. उंचीचे उत्तट सोडले, तर प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्य चॅड सरोवर हे आहे. चॅडचा अंतर्गत जलवाहनाचा द्रोणीप्रदेश, आफ्रिकेतील अशा प्रदेशांपैकी सर्वांत मोठा असून त्यातील शारी नदी, समुद्राला न मिळणाऱ्या आफ्रिकेतील नद्यांपैकी सर्वांत मोठी आहे. तिला मिळणारी लोगोन नदी पुराचे वेळी चॅड सरोवराचे पाणी बेन्वे नदीत वाहून नेते.

हवामानाच्या दृष्टीने चॅडचे तीन भाग पडतात : (१) उत्तरेकडील मरुप्रदेश. हा देशाचा जवळजवळ निम्मा भाग व्यापतो आणि तेथील हवामान सहारासदृश अतिउष्ण व शुष्क आहे. येथे सहारावरून येणाऱ्या हरमॅटन वाऱ्यांमुळे वाळूच्या टेकड्या निर्माण झालेल्या असून त्यांमधून चॅड सरोवराचा बाहर एल् गझल फाटा जातो. या भागात क्वचित पडणारा पाऊस एकूण २० सेमीं.पर्यंत असतो. (२) त्याच्या दक्षिणेस साहेल हवामान भागात हवामान उष्ण असून वार्षिक सरासरी पाऊस ७० सेंमी पेक्षा कमी पडतो. हा निमओसाड प्रदेश आहे. (३) दक्षिणेकडील सूदानी हवामानाचा सॅव्हाना प्रदेश. तुलनेने कमी उष्ण व अधिक पावसाचा आहे. येथे सरासरी तापमान ३५° से. असते. मे महिन्यात दुपारी तपमान ५०° से. पेक्षाही वर जाते. हिवाळ्यातील सरासरी तपमान १०° से. असून हरमॅटन वारे शुष्कता वाढवितात. या वेळेला सापेक्ष आर्द्रता २५% पेक्षाही कमी असते व रात्री धुकेही पडते. जुलै ते ऑक्टोबर पावसाळा असून पावसाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे १०१ सेंमी. पासून २० सेंमी.पर्यंत कमी होत जाते. दक्षिणेकडील काही ठिकाणी ४९० सेंमी.पर्यंत पाऊस पडतो. फॉर्लामी येथील वार्षिक सरासरी पर्जन्य २५ सेंमी. असून नद्यांचे पूर ही नेहमीचीच गोष्ट आहे.

चॅडमध्ये जंगले नाहीत. जलाभावसहिष्णू नैसर्गिक वनस्पती, काटेरी झुडपे, जाड गवत व बाभळीच्या जातीची झाडे ही सर्वसाधारण वनस्पती आहे. सहारात मरुज वनस्पती सापडत असून, सहारा व सूदान दरम्यानच्या सु. ३२२ ते ४८३ किमी. रुंद प्रदेशात बाभूळ, मिमोसा, पाम इ. मिश्र वनस्पती सापडते. चॅड सरोवर व शारी नदीच्या परिसरात दलदली असून शेवाळसम वनस्पती आढळते. दक्षिणेकडे सॅव्हाना गवताचा प्रदेश आहे.

  

उत्तरेकडील मरुप्रदेशात उंट हा प्रमुख प्राणी आहे, तर दक्षिणेकडे उष्ण कटिबंधातील इतर प्राण्यांव्यतिरिक्त हत्ती, सिंह, गेंडा, चित्ते, जिराफ, शहामृग, म्हशी इ. महत्त्वाचे आहेत.


इतिहास : शारी व लोगोन यांमधील प्रदेशात प्राचीन संस्कृतीच्या खुणा सापडतात. सापडलेल्या खापरांवरून तेथील संस्कृती इसवी सनाच्या सुरुवातीची असावी व लोखंडी वस्तूंवरून चौथ्या शतकात तेथे भरभराटलेली व्यापारपेठ असावी, असा कयास आहे. सातव्या शतकात सेओ टोळ्या येऊन स्थायिक झाल्या. त्यांना नंतर बूलालांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. तेराव्या शतकात कानेम साम्राज्य वाढले होते. ते पुढे बूलालांनी जिंकले. परंतु चौदाव्या शतकात कानेम बोर्नू पुन्हा प्रबळ झाले. एकोणिसाव्या शतकापर्यंत कानेम बोर्नू बगिर्मी  व बूलालांना तोंड देत होते. १८०८ मध्ये हौसांविरुद्ध बोर्नूने अल्‌ कानेमांची मदत मागविली पण पुढे तेच सत्ताधीश झाले. १८४६ नंतर सूदानी आक्रमक झुबाइर सत्ता बळकावून बसला. येथील सत्ताधीशांचा उत्तर आफ्रिका व नाईल खोरे यांच्याशी गुलामांचा मोठा व्यापार चालत असे. फ्रेंच पुरातत्त्वज्ञांनी या भागात समन्वेषण करून जुन्या सेओ लोकांच्या सभ्यतेसंबंधी माहिती मिळविली आहे. यूरोपीयांना या प्रदेशाचे सर्वप्रथम ज्ञान १८२२-२३ साली तीन ब्रिटिश प्रवाशी क्लॅपर्टन, ऑडने व डेनम यांनी करून दिले. ही प्रवासी तुकडी ट्रिपोलीकडून सहारा मरुभूमी तुडवून चॅड भागात आली. यामुळेच येथील सोकोटो, बॉर्नू, अंडामाईवा, बार्गिमी आणि वाडाई या आफ्रिकी राज्यांची माहिती यूरोपला मिळाली. ही सर्व राज्ये सोळाव्या शतकाच्या पूर्वीच अस्तित्वात होती. या प्रदेशाचे सर्वांत पहिले भौगोलिक वर्णन जर्मन प्रवासी डॉ. बार्थ याने उपलब्ध करून दिले. १८५१–५५ या काळात त्याने चॅड सरोवर ते तिंबक्टू यांदरम्यानच्या विस्तीर्ण भागाचे समन्वेषण केले. फ्रान्सने १८३० पर्यंत या भागाकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यानंतर मात्र गुलामव्यापाराचा बीमोड करण्यासाठी ग्रेट ब्रिटनशी सहयोग करून फ्रान्सने गाबाँ नदीतटावर १८३६ मध्ये व मुखावर १८४८ मध्ये वसाहती स्थापन केल्या. १८७०-७१ साली जर्मनीने पराजित केल्यामुळे झालेली यूरोपमधील ॲल्सेस-लॉरेन या प्रदेशाची क्षती भरून काढण्यासाठी फ्रान्सने इकडे आक्रमणाची दिशा वळविली. फ्रेंचांनी चॅड सरोवराच्या पूर्वेस राजकीय नियंत्रणाचा विस्तार केला आणि १९०० साली आफ्रिकेतील शेवटच्या प्रमुखांपैकी फ्रेंच विरोधक झुबाइरचा बीमोड केला. येथील सुलतानांशी अनेक संधी करून १९१३ साली फ्रेंचांनी पूर्ण अधिसत्ता प्रस्थापित केली. पश्चिमेकडे सेनेगल व विषुववृत्ताकडे गाबाँ येथून अनुक्रमे पूर्व व उत्तरेकडे फ्रेंच सत्तेचा विस्तार झाल्यामुळे दोन्ही भागांना जोडणारा चॅड सरोवराच्या पूर्वेकडील भाग फ्रेंचांना आवश्यक होता. यासाठी फ्रेंचांनी १५ मार्च १८६४ रोजी जर्मनीशी व १४ जून १८६८ रोजी ब्रिटनशी तह करून या भागातील फ्रेंच साम्राज्याच्या सरहद्दी निश्चित केल्या. चॅड सरोवरातील नियंत्रणाचा प्रश्न फ्रान्स, जर्मनी व ब्रिटन या त्रिराष्ट्रांत त्यांची वाटणी करून निकालात काढण्यात आला. अशाप्रकारे आफ्रिकेतील सर्वात मोठे क्षेत्र १,०३,५९,९६० चौ.किमी. फ्रान्सच्या अधिसत्तेखाली आले १९०४ सालच्या फ्रान्स आणि ब्रिटन यांमधील समझोत्यानुसार उत्तर आफ्रिकेतील एकमेकांच्या आकांक्षांना अडथळा आणू नये असे ठरले. १९१० साली फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका असे या फ्रेंच वसाहतीचे नामकरण करून गाबाँ, मध्य काँगो, ऊबांगी शारी आणि चॅड असे चार शासकीय भाग पाडण्यात आले. १९११ साली फ्रान्स-जर्मन तहानुसार जर्मन कॅमेरून सरहद्दीपासून काँगो सरहद्दीपर्यंतचा सु. २,५८,९९९ चौ. किमी. भाग जर्मनीला देण्यात आला व मोबदल्यात मोरोक्कोत फ्रेंचांना स्वातंत्र्य असावे असे ठरले. पहिल्या महायुद्धापर्यंत उत्तर आफ्रिकेत गुंतल्यामुळे फ्रान्सचे या भागाकडे दुर्लक्ष झाले असले, तरी या युद्धात जर्मनीला दिलेल्या या सर्व भागाबरोबरच जर्मन कॅमेरून त्यांनी जिंकले व त्याची ब्रिटनबरोबर वाटणी केली. येथील जीवनाच्या सांस्कृतिक, सामाजिक, जातीय, धार्मिक व आर्थिक या सर्व बाजूंवर परिणाम होईल, असे धोरण आखण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव झाल्याबरोबर येथे स्वतंत्र फ्रेंच सैनिकांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यांनी १९४४ साली ब्रॅझाव्हिल येथील ठरावानुसार फ्रेंच शासकीय दृष्टिकोनाविरुद्ध धोरण आखले. ठरावानुसार वसाहत हा शब्द घालविण्यात येऊन समुद्रपार क्षेत्र असे म्हणू लागले. या भागासाठी क्षेत्रीय सभा स्थापण्यात आली व लोकांना मतदानाचा हक्क व समान नागरिकत्वाचे अधिकार देण्यात आले. क्षेत्रीय सभा, फ्रान्समधील फ्रेंच राष्ट्रीय सभा व सीनेट यांवर प्रतिनिधी नेमण्याची तरतूद करण्यात आली व अशाप्रकारे फ्रेंच अधिसत्ता मावळण्याची चिन्हे स्पष्ट झाली. १९४६ मध्ये गाबाँ, मध्य काँगो, ऊबांगी शारी व चॅड हे चार भाग वेगळे संघटित करण्यात आले पण यासाठी एकच राज्यपाल ब्रॅझाव्हिल येथे कायम करण्यात आला. १९५६ साली आणखी अधिकार मिळून, सर्वमताधिकार व स्वतंत्र मतदानाचे तत्त्व स्वीकारण्यात आले व त्याप्रमाणे १९५७ मधील मतदानानुसार प्रथमच जबाबदार सरकार स्थापन झाले. सरकारचे नेतृत्व एम्‌. गाब्रिएल लिसेटी या वेस्ट इंडियन माणसाकडे होते. १९५८ सालच्या जनमतसंग्रहात द गॉलच्या नवीन घटनेच्या बाजूने कौल मिळाल्यामुळे चॅड फ्रेंच परिवारातील स्वशासित सदस्य झाला. जानेवारी १९५६ मध्ये फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेच्या इतर तीन प्रदेशांचे एकमत होऊन आर्थिक आणि तांत्रिक विकासासाठी संघाची स्थापना झाली पण श्रीमंत गाबाँने अंग काढल्यामुळे ही संघटना संपुष्टात आली. ११ ऑगस्ट १९६० रोजी चॅडचे स्वातंत्र्य घोषीत झाले. अल्पावधीतच लिसेटीला सर्व पदांवरून कमी करण्यात येऊन देशाबाहेर घालवण्यात आले व चॅड देशात जन्मलेले टोंबलबाये राष्ट्रप्रमुख झाले. १९६१ साली राष्ट्रीय सभेतील ६ अचॅडवासी सदस्य पदच्युत करण्यात आले व त्यांची जागा भरण्यासाठी अध्यक्षाने उपनिर्वाचन नाकारले. नोव्हेंबर १९६६ मध्ये तीन मंत्र्यांना अध्यक्षाच्या खुनाच्या प्रयत्नांच्या आरोपाखाली बंदी करण्यात आले. १६ मे १९६० रोजी फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेच्या चारही राष्ट्रांनी संरक्षण जकात व विदेश धोरणाबाबत एकमताने संघ निर्माण केला. आर्थिक आधारावर स्थापलेली ही संघटना यशस्वी ठरत आहे. आफ्रिकेतील आपल्या सेना कमी करण्याच्या फ्रान्सच्या धोरणामुळे चॅडचा फायदा झाला आहे व त्यामुमेळे चॅडला जानेवारी १९६४ मध्ये ५०,००० लोकसंख्या असलेला सहारातील सु. ४,८०,००० चौ.किमी. प्रदेश मिळाला आहे. चॅड युरोपीय आर्थिक परिवार, मान्रोविया शक्तिगट, आफ्रिका व मॅलॅगॅसी राष्ट्र गटाचा सदस्य आहे. चॅडला २० सप्टेंबर १९६० रोजी संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले. जून १९७० मध्ये टोंबलबाये पुन्हा ७ वर्षांसाठी निवडून आला.

राजकीय स्थिती : चॅडची स्थिती उत्तरेकडे सहारा व दक्षिणेकडे विषुववृत्त व सॅव्हाना प्रदेशातील राष्ट्रांना जोडणाऱ्या दुव्याची आहे. १९६० साली संविधानानुसार अध्यक्षीय गणतंत्र पद्धती स्वीकारण्यात आली व त्याप्रमाणे चॅडचे हे एक अविभाज्य, धर्मनिरपेक्ष, लोकसत्ताक व समाजवादी गणतंत्र उद्‌घोषित करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष हाच मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे (१९७४). विधि व व्यवस्था पाहण्याबरोबरच शासकीय पदांवर नियुक्ती, शासनाची जबाबदारी व विनिमय संमत करण्याचे कार्य याच्या अधिकारकक्षेत मोडतात. ८५ सदस्य असलेली राष्ट्रीय सभा प्रत्यक्ष, गुप्त, सार्वत्रिक व प्रौढ मताधिकाराने, एकयादी पद्धतीच्या आधारावर, मतदानाने नेमण्यात येते. ही मतदानाने अध्यक्षाची नेमणूक करते. अध्यक्ष व मंत्रिमंडळ राष्ट्रीय सभेला जबाबदार असतात. अध्यक्ष व राष्ट्रीय सभेचा कार्यकाळ अनुक्रमे सात आणि पाच वर्षाचा आहे. अध्यक्ष अविश्वास प्रस्तावाच्या प्रसंगी राष्ट्रीय सभेचे विसर्जन करून फेर मतदानाची आज्ञा करू शकतो. १९५६ सालच्या मतदानात, दक्षिणेकडील लोकांच्या प्रगतिशील पक्षाला ६४, उत्तरेकडील मुस्लिमांच्या आफ्रिकी राष्ट्रीय पक्षाला १७ व चॅड समाजवादी पक्षाला ४ जागा मिळाल्या होत्या. १९६२ मध्ये सर्व विरोधी पक्ष विसर्जित करण्यात आले व चॅड प्रगतिशील पक्षाची एक पक्षीय राजवट सुरू झाली. १९६७ पासून अब्बासिरिक याचा फ्रंट  दे लिबरेशन नॅशनेल फ्रॉलिना पक्षामार्फत संघर्ष सुरू आहे. बंडखोरांना वठणीवर आणण्यासाठी १९६८ मध्ये अध्यक्षाने फ्रेंच सैन्याची मदत मिळविली. परकीय हस्तक्षेपांविरुद्ध लोकमत अधिकाधिक जागृत होत आहे. वारंवार सैनिक व गनिम यांच्या चकमकी होत असतात. फ्रेंचांवर साम्राज्यवादाचा व वसाहतवादाचा आरोप केला जातो. अलीकडे रशिया, चीन वगैरेंशी संपर्क वाढविला जात आहे. ऑगस्ट १९७१ मध्ये अध्यक्षाविरुद्ध झालेल्या व मग दडपलेल्या कटामागे लिबियाचा हात आहे, असा आरोप अध्यक्षाने केला व दोन्ही देशांत वितुष्ट आले. सप्टेंबरमध्ये नायजरच्या अध्यक्षाने मध्यस्थीचा प्रयत्न केला.


शासनाच्या दृष्टीने देशाचे १४ भाग व अनेक उपविभाग पाडण्यात आले असून प्रत्येक भागाचा प्रमुख अधिकारी केंद्राला जबाबदार असतो. लोकसमूहांचे नेतृत्व परंपरेप्रमाणे तेथील लोकांकडेच आहे, तरी पण शिक्षणप्रसारामुळे हा प्रभाव कमी होत आहे. मरुभूमीत रूढीने चालत आलेले जीवन तसेच असून दक्षिणेकडे स्थानिक मंडळे स्थापण्याचा अनेक प्रयत्नांना मर्यादित यश आले आहे. फॉर्लामी नगरमंडळाचा महापौर जनमताने निवडलेला असून इतर शहरांतील अधिकारी अंशतः निवडलेले असतात.

रूढीनुसार पाळण्यात येणारे कायदे देशात प्रचलित आहेत. प्रथम क्रमांकाची न्यायालये जिल्ह्याच्या ठिकाणी व प्रादेशिक केंद्रात आहेत. यांच्यामार्फत फॉर्लामी येथील अपील न्यायालयात अपील दाखल करता येते. देशात उच्च आणि संविधानक न्यायालय असून १९६१ साली अधिकारपदावरील लोकांच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायासन स्थापण्यात आले आहे.

संपूर्ण भूवेष्टित प्रदेश, भोवतीचा व देशातील बराच भाग मरुभूमी व चांगल्या मार्गाचा अभाव यांमुळे संरक्षणव्यवस्था अडचणींची ठरत आहे. या दृष्टीने फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेतील तीन राष्ट्रांशी तह करून संघ उभारण्यात आला आहे. देशात ७,००० सैनिक व अधिकारी यांची राष्ट्रीय सेना उभारण्यात आली असून मदतीला पोलीसदल व २०० सैनिक व अधिकारी यांची वायुसेना आहे. १८ वर्षे वयानंतर २ वर्षांकरिता पुरुषांना सेनेत भरती करण्यात येते.

आर्थिक स्थिती : चॅड एक गरीब देश आहे. ९६ टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसायांत आहेत. अविकसित दळणवळणव्यवस्थेमुळे आर्थिक विकासाला अडथळा येत आहे. देशाचा आर्थिक पाया पशुपालन उद्योगांवर आधारलेला आहे. अलीकडे कापूस उत्पादनामुळे आर्थिक उत्पन्न वाढत आहे. कापसाचे उत्पादन १९२९ साली सुरू झाले व त्यावर्षीच्या १७ टनांपासून, १९६१ साली १,००,००० टनांपर्यंत वाढले. देशातील ५ टक्के जमीन शेतीत मोडते. मुख्य रोखीची पिके कापूस व शेंगदाणा ही आहेत आणि अन्य पिके भरड धान्ये, मका, मॅनिऑक, याम, तीळ, वाटाणे, गहू, भात व खजूर ही आहेत. एकूण निर्यात उत्पन्नापैकी किंमतीने शेकडा ८० टक्के उत्पन्न कापसाच्या निर्यातीमुळे मिळते. धान्यांचा उपयोग अन्नाबरोबरच मोठ्या प्रमाणात मद्यउत्पादनासाठी होतो. भात व कापूस-शेतीच्या विस्ताराला बराच वाव आहे. पाटबंधारे विकास, भूमिसुधार इ. करून शेतीत विविधता आणण्याचा प्रयत्न चालू आहे. शेती व पशुपालनाच्या विस्ताराच्या आड येणारी मुख्य अडचण पाण्याचा अभाव ही आहे. देशातील शेकडा ३७% जमीन कुरणाखाली असून देशात १९७०-७१ मध्ये ४६,९०,००० गुरे ५२,००,००० शेळ्या-मेंढ्या ५,४३,००० घोडे आणि गाढवे ५,६०,००० उंट आहेत. दरवर्षी १,२०,००० टन मासे पकडले जातात. उत्तरकडे पाणी व चाऱ्याचा अभाव, तर दक्षिणेकडे विषुववृत्तीय प्रदेश शेजारी असल्यामुळे महामारी, विषारी किडे व पराश्रयी रोग यांमुळे उद्योगाच्या विकासाला मर्यादा पडते. पशुस्वास्थ्य प्रयोग शाळांतर्फे बऱ्याच रोगांवर नियंत्रण बसविले आहे. तसेच संकर करून अनुकूल व सहनशील जाती उत्पन्न करण्यात येत आहेत. तरी पण पशुजाती कमी प्रतीच्या आहेत. ऋतुमानानुसार स्थानांतरणामुळे, उत्तर व दक्षिणेकडील लोकसमूहांमध्ये पसरलेली वितुष्ट भावना ही एक मोठी समस्या आहे. याच्या निराकरणार्थ विहिरी काढणे, कुरणांभोवती कुंपणे घालणे व स्वास्थ्य-व्यवस्था उपलब्ध करणे यांसारख्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. देशात शक्तिसाधने व खनिजांचा अभाव आहे. हर्डिस भागात फ्रेंच साहाय्याने तेलाचा शोध सुरू आहे. वाडाई भागात स्फटिक व गौण सोन्याचे साठे सापडले आहेत. युरेनियम व थोरियमचे साठेही सापडले आहेत. वनस्पतींपैकी डिंकाचे व सर्पणाचे उत्पादन महत्त्वाचे आहे. औद्योगिक जळणाच्या अभावी विविध उद्योगांचा विकास फारसा झालेला नाही. देशात तेलघाण्या, तांदूळप्रक्रिया, गृहनिर्माणपदार्थ कारखाने, मद्य, मत्स्य व मांस संबंधीचे कारखाने तसेच साबण कारखाने, पीठचक्क्या व कापड गिरण्या आहेत. तसेच कातडी सामान, बीर, साखर, रेडिओ, सायकली, पादत्राणे इत्यादींचे उत्पादन होऊ लागले आहे. फ्रान्सशी संबंधित कामगार संघटनांनी स्वातंत्र्यानंतर स्वतंत्रपणे संघटनांची स्थापना केली. देशात अशा दोन संघटना व दोन सहकारी संस्था आहेत.

देशाचा परदेशी व्यापार प्रामुख्याने शेजारच्या राष्ट्रांवर अवलंबून आहे. बराच परदेशी व्यापार नायजेरियाच्या प्रदेशातून व बंदरांमधून चालतो. १९६० साली अणुस्फोटाच्या निषेधार्थ फ्रेंच जहाजांसाठी नायजेरियातील बंदरे बंद करण्यात आल्यामुळे चॅडच्या व्यापाराला धक्काच बसला. अंतर्गत भागात काही ठिकाणी व्यापाराचे स्वरूप वस्तुविनिमयाचे आहे. देशात एक निर्यात बॅंक असून फ्रान्समधील चार प्रमुख बॅंकांच्या शाखा आहेत. १९६३ मध्ये नवीन बॅंका उघडण्यात आल्या आहेत. १९६० साली चॅडमध्ये २८ फ्रेंच व १३ इतर देशांतील विमा कंपन्यांच्या शाखा होत्या पण फ्रेंच कंपन्यांच्या हातात शेकडा ८५ विमाउद्योग होता. देशातील चलन फ्रॅंक सी.एफ्.ए. असून विनिमय दर ६६१ फ्रॅंक सी.एफ्.ए. = १ पौंड स्टर्लिंग व २५४ फ्रॅंक सी. एफ्.ए. = १ डॉलर असा आहे.

चॅडचे १९७० चे अंदाजपत्रक १,३५० कोटी सी.एफ्‌.ए फ्रॅंक खर्चाचे व १,१८० कोटी सी.एफ्.ए. फ्रँक जमेचे होते. शासनाचे धोरण परदेशी खाजगी भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. लोकांचा फायदा व वस्तुंचे राष्ट्रातच संसाधन व्हावयास पाहिजे असा निर्बंध या भांडवल गुंतवणुकीसंबंधात घालण्यात आला आहे. १९७१ मधील आयात ९४९·४ कोटी सी.एफ्‌.ए. फ्रँकची व निर्यात ६८२·४ कोटींची झाली. आयातीच्या प्रमुख वस्तू ग्राहकोपयोगी माल, लोखंड, कापड, चहा, पादत्राणे, वाहने, यंत्रे, खनिज तेल, वस्तू, कागद, सिमेंट इ. व निर्यातीच्या कापूस, शेंगदाणा यांखेरीज गुरेही होती. आयात फ्रान्सकडून ४३%, नायजेरिया १०%, प. जर्मनी ९%, अमेरिका ९%, इटली ८% अशी होती, तर निर्यात फ्रान्सला ६४%, बेल्जियम ९%, झाईरे ५%, जपान ५% अशी होती. निर्यांतीत कापूस ८५% होता. कापूस उत्पादनासाठी यूरोपीय सामाईक बाजारपेठेच्या विकास निधीतून १९७१-७२  साली २६·४ कोटी सी.एफ्‌.ए फ्रॅंकचे अनुदान मंजूर झाले. परदेशी व्यापारात ब्रिटन, मोरोक्को, यूगोस्लाव्हिया, चीन, कॅमेरून यांचाही वाटा असतो.

आर्थिक विकासाच्या आड येणारी प्रमुख अडचण दळणवळणाचा अपुरेपणा आहे. पावसाळ्यात देशाचा सर्व जगाशी संबंध तुटतो व अंतर्गत भागात आर्थिक हालचाल जवळजवळ थांबतेच. देशात लोहमार्ग नाही. १९७२ मध्ये ३०,७२५ किमी. लांबीचे रस्ते व वाटा असून २,६८० किमी. प्रमुख व ३,४६२ किमी. दुय्यम रस्ते होते. यांपैकी थोड्यांचाच उपयोग पावसाळ्यात होऊ शकतो. चॅड सरोवर आणि राजधानीच्या दरम्यान वर्षभर दळणवळण चालते. फॉर्लामी हे बांगी, ब्रॅझाव्हिल व दूआला तसेच नायजेरिया व सूदानमधील लोहमार्गांशी रस्त्यांनी जोडले आहे. देशात १९७२ मध्ये ५,२५० प्रवासी वाहने व ६,१५२ व्यापारी वाहने होती. फॉर्लामी येथे मोठा विमानतळ असून अंतर्गत भागात वायुमार्गाचे जाळे पसरले आहे. मांस व पशू वायुमार्गाने परदेशात पाठविण्यात येतात. फॉर्लामी ते फॉर आर्शंबोपर्यंत शारी नदीतून ऑगस्ट ते डिसेंबर दळणवळणाची सोय आहे. लोगोन नदीतून लहान बोटी चालतात. पॅरिस व फॉर्लामी दूरध्वनीने संबंधित आहेत. अंतर्गत भागात तारव्यवस्थेचे जाळे पसरले आहे. १९६८ साली राजधानीत ३,९५३ दूरध्वनीयंत्रे होती. येथेच चॅड नभोवाणी केंद्र आहे. फॉर आर्शंबो व आबेशे येथे प्रक्षेपणकेंद्रे आहेत. १९७२ मध्ये ७०,००० रेडिओ परवानाधारक होते.


लोक व समाजजीवन : लोकसंख्येत देशी निग्रो बहुसंख्य आहेत. उत्तरेकडून अरब आक्रमणामुळे या जातींच्या स्वरूपात खूपच बदल झालेला आहे. वेगवेगळ्या भागांत संकरामुळे संमिश्र जाती समूह उद्‌भवले आहेत. या समूहाचे दोन ठळक भाग पाडता येतात. (१) इस्लामी धर्मात समावेश झालेले लोक सामान्यपणे उत्तरेकडे व प्रामुख्याने बागीर्मी व वाडाई क्षेत्रात आहेत. वर्षानुवर्षे आंतरजातीय लग्ने लावून काही समूहांचे पूर्ण अरबीकरण झाले आहे. उदा., सलामत व टुन्गुर समूह. फुलानी प्रामुख्याने पशुपालक आहेत. टुबू समूह चॅड सरोवराच्या उत्तर व पूर्वेकडे असून, बर्बर व निग्रोंच्या संकरामुळे उत्पन्न झाला आहे. सहारातील टूराग व टूबूंमध्ये बरेच साम्य आहे. (२) परंपरागत धर्माचे जडप्राणवादी किंवा किर्डी लोक प्रामुख्याने दक्षिणेकडे आहेत. शारी व लोगोन नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या सारा जातीचे प्रमाण चॅडमध्ये सर्वांत जास्त आहे. हे कुशल शेतकरी आहेत. इतर जडात्मवादी जातींपैकी मसा व मुंडांग अत्यंत मागासलेले आहेत. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ.किमी.ला २·६ असली, तरी दक्षिणेकडील भागात दर चौ.किमी.ला ६ आहे. मरुभूमीत बरेच भाग निर्जन आहेत. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे शेकडा प्रमाण अनुक्रमे ९३ व ७ आहे. फॉर्लामी या शहराची लोकसंख्या १९५२–६२ या दशकात दुपटीने वाढली. दुसऱ्या महायुद्धात स्वतंत्र फ्रेंच सेनेला पाठिंबा देणारे चॅड हे पहिले आफ्रिकी राष्ट्र आहे. येथील लोकांनी सेनेत दाखल होऊन फ्रेंचांना मदत केली. चॅडमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. (१९५७ मध्ये दर हजारांमागे १,०५१). १९५७ साली ४,८०० यूरोपीय प्रामुख्याने फ्रेंच होते. चॅड समाजाचे विभाजन जातीच्या आधारापेक्षा धर्माच्या निष्ठेमुळे अधिक झाले आहे. शारी नदीच्या पश्चिमेकडील अधिक नैसर्गिक वनस्पतीचा प्रदेश दाट लोकवस्तीचा आहे. या भागात ख्रिस्तीधर्मीय व जडप्राणवादी बहुसंख्येने आहेत. उरलेल्या भागापैकी मोठ्या अर्धशुष्क मरूभूमीत भटक्या राहणीच्या इस्लामधर्मीय लोकांचे आधिक्य आहे. फ्रेंचांचे दीर्घकालीन शासनसुद्धा चॅडचे हे विभाजन दूर करू शकले नाही. बहुसंख्य लोकांचे जीवन आजही शतकानुशतकांपासून रुळत आलेल्या रूढी व अंधश्रद्धेवर आधारलेले आहे. प्रॉटेस्टंट मिशनची या भागात स्थापना दोन शतकांपूर्वीची आणि कॅथलिक मिशनची १९४७ सालापासूनची आहे. १९६० साली देशात ५०,००० कॅथलिक व ५०,००० प्रॉटेस्टंट पंथातील लोक होते. १९६४ मध्ये देशात मुस्लिम ४१%, ख्रिस्ती २९% व जडप्राणवादी ३०% होते.

समाजकल्याण साधण्याच्या दृष्टीने शासनाकडून अनेक उपाय अंमलात आले आहेत. १९५६ सालापासून कामगारांना कुटुंबभत्ता देण्यात येतो. यासाठी कामगारांना मिळणाऱ्या मजुरीच्या ठरलेल्या प्रमाणात मालक अंशदान देतात. स्त्रियांना पहिल्या तीन बाळंतपणाच्या वेळी प्रसवपूर्व भत्ते आणि जर स्त्री नोकरीत असेल, तर प्रसूतिपश्चात १४ आठवड्यांपर्यंत स्वास्थ्य उपलब्धता भत्ता देण्यात येतो. गरजू महिलांना प्रसवपूर्व व प्रसूतिपश्चात परिचर्या मिळते. देशात दोन गृहनिर्माण संस्था आहेत. यांच्यामार्फत अल्प व्याजावर घरे बांधण्यासाठी आणि जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी कर्जे देण्यात येतात. सहकारी संस्थांना पाणीपुरवठा योजना, वीज वितरण कार्य, त्याचप्रमाणे फर्निचर, घरगुती आवश्यक उपकरणे व प्रशीतक, आलमाऱ्या इत्यादींसाठी कर्जे मिळतात. स्वास्थ्यरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघटना मदत करीत असतात. १९६६ मध्ये देशात १६१ रुग्णालये व दवाखाने असून ३,७१६ खाटांची सोय होती. ९ क्षय निवारण केंद्रे, ८ कुष्ठरोग निवारण केंद्रे, १ मानसोपचार केंद्र होते. १९६७ मध्ये ४८ डॉक्टर, ७ औषधी विशारद, २ दंतवैद्य, ५ सुइणी व २६६ परिचारिका होत्या. सामान्य असे आजार म्हणजे कुष्ठरोग, मलेरिया, क्षय, कण्याचा परिमस्तिष्क ज्वर, बिलहार्झ व यॉज हे आहेत. १९७१ मधील आफ्रिकेतील कॉलऱ्याच्या साथीत चॅडमध्ये सर्वांत जास्त (३,०००) बळी पडले.

भाषा व साहित्य : देशात निरनिराळ्या लोकसमूहात भिन्न भिन्न भाषा अस्तित्वात आहेत. जातींप्रमाणेच आफ्रिकी व आशियातील भाषांचे संमिश्रण या भागात झाले आहे. उत्तरेकडे मोठ्या भागात मध्य सहारातील टूरागांची भाषा वापरात आहे. दक्षिणेकडे ठिकठिकाणी प्राचीन सेमिटिक व ईजिप्शियन, चॅड, मध्य सूदान व इतर भाषा प्रचारात आहेत. तरी पण इस्लामच्या विस्तारामुळे अरबी भाषेचा उपयोग सर्वसामान्यात पसरला आहे. शाळांतील कुराणाच्या अध्ययनामुळे या भाषेच्या प्रचारास मदत मिळाली. संविधानाने फ्रेंच ही शासनाची अधिकृत भाषा जाहीर केली आहे. देशात प्रसिद्ध होणाऱ्या चार नियतकालिकांपैकी एक मासिक, एक पाक्षिक, एक साप्ताहिक आणि एक दैनिक आहे. १९७३ साली राजधानीच्या ठिकाणी एक ग्रंथालय स्थापण्यात आले असून येथे संयुक्त राष्ट्र संघातर्फे एक माहिती केंद्र उघडण्यात आले आहे.

शिक्षण, कला व क्रीडा : प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण शेकडा २ आहे. १९६८-६९ मध्ये प्राथमिक शाळांत १,७९,५४० विद्यार्थी आणि २,५९६ शिक्षक माध्यमिक शाळांत अनुक्रमे ८,७२४ व ३४१ व्यावसायिक शाळांत अनुक्रमे ८३२ व ३० शिक्षक प्रशिक्षण शाळांत ७०९ व ४३ होते. १९७१ पासून फॉर्लामी येथे एक विद्यापीठ सुरू झाले आहे. पूर्वीच्या मदरसांतून मुस्लिमांना धार्मिक शिक्षणाची तरतूद आहे. इस्लाम धर्माचा विस्तार आणि शिक्षण यांमुळे येथील मागासलेल्या जीवनावर विशेष परिणाम झाला नाही. उलट त्यामुळे पाश्चात्त्य संस्कृतीपासून प्रतिरक्षा करण्याचे सामर्थ्य मात्र वाढले आहे. १९६२ साली फॉर्लामी येथे चॅड राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय व त्याच्या शाखा वारा, फॉर आर्शंबो आणि इतर ठिकाणी स्थापन झाल्या. फॉर्लामी येथील धातुकलाकार तांब्याच्या लहान मूर्ती निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आफ्रिकी कला दोन प्रकारे व्यक्त झालेली दिसते. उपयोगी वस्तूंची सजावट आनंद मिळावा म्हणून केली जाते. त्याचप्रमाणे धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या प्राण्यांचे आकार चित्रित केले जातात. हा दुसरा कलाप्रकार आध्यात्मिक भावनांवर आधारलेला असून धार्मिक जीवनात महत्त्वाचा ठरला आहे. ह्या प्रकारची कला प्रामुख्याने शेतकरी लोकसमूहात प्रचलित आहे. शिल्पकला व्यक्त करण्यासाठी आफ्रिकेत लाकूड विशेषत्वाने वापरले जाते. जाकोमा राष्ट्रीय उपवन, मध्य आफ्रिकेतील उपवनांपैकी सर्वात संपन्न शिकारसंरक्षित क्षेत्र असून शिकार हे प्रवाशांचे आकर्षण आहे. शहरांतून अतिथिगृहे आहेत. फॉर्लामी या राजधानीची लोकसंख्या १,३२,५०२ (१९६८) आहे. तेथे मत्स्यसंशोधन केंद्र, कापूस व कापड अभ्यासकेंद्र आणि जवळच लार्झो (फाया) येथे जनावरांसाठी लस तयार करण्याचे केंद्र आहे. इतर महत्त्वाची शहरे मूंडू (२९,३८८), फॉर आर्शंबो (३६,०००) आणि आबेशे (१५,०००) ही आहेत.

खांडवे, म. अ.


चॅड

वाळवंटी प्रदेशातील नमुनेदार छोटी विहीर, केलो चॅड सरोवराकाठच्या पपायरसच्या होड्या