चहा, गवती : (पातीचा चहा हिं, गंधतृण गु. लिलिचा क. मज्जिगे हुळू सं. भूस्तृण, सुगंधी इं. वेस्ट इंडियन लेमन ग्रास लॅ. सिंबोपोगॉन सिट्रेटस कुल-ग्रॅमिनी). ही सु. १·५ मी. उंच व झुबक्यांनी वाढणारी सुगंधी व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) गवताची जाती मूळची भारतीय असावी, तथापि आता उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सर्वत्र आढळते. भारतात कोठेकोठे जंगली अवस्थेत आढळली, तरी बहुतेक सर्वत्र (महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ येथे) लागवड केली जाते. खोड (मूलक्षोड) आखूड व जमिनीत वाढते व काही भाग जमिनीवर (संधिक्षोड) येतो. पाने साधी, रेषाकृती, टोकास निमुळती (सु. ९० सेंमी. लांब), निळसर हिरवी व खरबरीत असतात. जिव्हिका (पानाच्या देठापाशी असणारी लहान वाढ) फार लहान व आवरक (खोडास वेढणारा पानाच्या देठाचा भाग) शूलाकृती असतो. फुले ३०–६० सेंमी. लांबीच्या महाछदयुक्त परिमंजरीवर येतात [→ फूल]. सामान्य शारीरिक लक्षणे ग्रॅमिनी  कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

पानांचा काढा (चहा) उत्तेजक, ज्वरनाशक व घाम आणणारा असल्याने सर्दीवर घेतात. ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून) पानांपासून सुगंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल (इंडियन मोलिसा तेल) काढतात. त्यात सिट्रॉल असते. तेलात सारक, उत्तेजक इ. गुणधर्म असून पटकीवर देतात. ते नायट्यावर लावतात, अत्तरे व सुगंधी द्रव्यांत आणि औषधांत वापरतात.

पहा : गवते.

जमदाडे, ज. वि.