चर्मपूरण : प्राण्यांची कातडी (त्वचा), तिच्यावरील केस, लोकर, पिसे किंवा खवले यांच्यासहित टिकाऊ करण्याकरिता कमाविणे आणि अशा कमाविलेल्या कातडीत पेंढा किंवा तत्सम वस्तू भरून अथवा प्राण्याची कृत्रिम शरीराकृती तयार करून तिच्यावर कमाविलेली कातडी बसवून जिवंत प्राण्यासारखी प्रतिकृती तयार करणे या कलेला चर्मपूरण म्हणतात. कातडीप्रमाणेच प्राण्यांच्या कवट्या, शिंगे इ. चांगल्या स्थितीत सुरक्षित ठेवता येतात. चर्मपूरणाचा उपयोग मुख्यतः प्राणिविज्ञानाच्या अध्ययनासाठी आणि प्राणिसंग्रहालयातील प्रदर्शनासाठी करतात. यांशिवाय वास्तू सुशोभित करण्यासाठी सुद्धा या कलेचा उपयोग करतात.

इतिहास : चर्मपूरण हा शब्द आज ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने पाहिले असता चर्मपूरणाचा

इतिहास साधारणपणे ३००—३५० वर्षांपेक्षा जास्त जुना नाही. परंतु मानवाच्या इतिहासावरून असे दिसून येते की, रानटी अवस्थेतील मानवाला कातडे टिकाऊ करण्याची थोडीबहुत माहिती होती. कारण शरीरक्षणाकरिता वन्यपशूंची कातडी तो वापरीत होता. पण ती टिकाऊ करण्याची साधन-सामग्री काय होती याची माहिती आज उपलब्ध नाही.

ईजिप्तमधील लोकांना मृत माणसांची आणि इतर प्राण्यांची शरीरे मसाले, तेले वगैरे भरून टिकाऊ करण्याची कला साध्य झालेली होती. अशी मसाले भरलेली शरीरे बराच काळ टिकत. यांना ‘ममी’ म्हणतात. माणसांखेरीच कुत्री, मांजरे, माकडे, पक्षी वगैरेंच्या ‘ममी’ ईजिप्तमधील प्राचीन थडग्यांत आढळल्या आहेत. यावरून ईजिप्तमधील लोकांना चर्मपूरणाची माहिती असावी असे दिसते.

चर्मपूरण तंत्राच्या इतिहासाची खरी सुरुवात सोळाव्या शतकापासून झाली असे म्हणावयास हरकत नाही. शिकारीच्या छंदामुळे व प्राणी गोळा करण्याच्या हव्यासामुळे शिकाऱ्यांजवळ आणि प्राणिशास्त्रज्ञांजवळ पशुपक्ष्यांचा संग्रह वाढला. हा संग्रह सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे होते. हे पशुपक्षी आसवांतून किंवा इतर द्रव पदार्थांतून ठेवणे सोईचे नव्हते. परंतु रासायनिक क्रियांनी कातडी कमावून प्राणिसंग्रह व्यवस्थित ठेवणे शक्य झाले. कीटकनाशक रसायनांच्या शोधानंतर पशुपक्ष्यांच्या कातड्यांचा मोठ्या प्रमाणावर संग्रह करणे शक्य झाले. सुरुवातीस वाघ, सिंह, अस्वल, डुक्कर, हरिण वगैरे मोठ्या प्राण्यांची कातडी कमावून ती बैठकीच्या खोलीत किंवा संग्रहालयाच्या दालनात पसरून, भिंतीवर टांगून किंवा गुंडाळून ठेवीत. मोठ्या प्राण्यांची डोकी किंवा फक्त शिंगेच भिंतीवर लावून ठेवीत. लहान प्राण्यांच्या संस्कारित कातड्याची खोळ करून त्यात कापूस, पेंढा किंवा अन्य पदार्थ भरून ते कातडे शिवून टाकीत. असे तयार केलेले प्राणी फारच ओबडधोबड दिसत.

अठराव्या शतकापासून प्राणिविज्ञानाच्या अध्ययनास जोराची चालना मिळाली व प्राणिसंग्रहालयांना शिक्षणाचे माध्यम म्हणून महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे संग्रहालयातील पशुपक्षी जास्तीत जास्त नैसर्गिक दिसावे असे प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आणि या प्रयत्नांतूनच चर्मपूरण तंत्र विकास पावले. या सुमारास फ्रान्स, जर्मनी आणि इंग्लंड हे देश चर्मपूरणाच्या तंत्रात अग्रेसर होते.

चर्मपूरणाचा परमोच्च विकास एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत झाला. विल्यम टी. हॉर्नाडे, विल्यम क्रिचली व कार्ल ई. एक्‌ली या चर्मपूरणतंत्रज्ञांच्या परिश्रमामुळे या तंत्राला कलेची प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या चर्मपूरण कलेचे वैशिष्ट्य म्हणजे हुबेहूब जिवंत प्राणीच उभा करण्याची हातोटी. अशा प्राण्यांच्या मुद्रेवर भय, क्रोध वगैरे विकार दाखविण्याची किमयासुद्धा त्यांनी हस्तगत केली. त्यांच्या या कलेतील प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणजे एखादा प्राणी ज्याप्रमाणे निसर्गात राहतो त्याप्रमाणे तो प्राणिसंग्रहालयाच्या प्रदर्शनातून दाखविणे हे होय. हे नवे तंत्र त्यांनी निर्माण केले. अशा प्रदर्शनाला पारभासी चित्र म्हणतात. या तंत्रामुळे प्राणिसंग्रहालयांना जिवंतपणा आला व प्राणिसंग्रहालयातून प्राणिविषयक पारभासी चित्रे मांडण्याची प्रथा रूढ झाली. आता विद्युत्‌ उपकरणांच्या साहाय्याने चर्मपूरित प्राण्यांच्यात हालचाल निर्माण करता येऊ लागली आहे. त्यामुळे पारभासी चित्रे जास्तच चित्ताकर्षक होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रगत राष्ट्रांतील प्राणिसंग्रहालयांतून उत्कृष्ट पारभासी चित्रे मांडलेली आहेत. भारतात मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयातील निसर्ग परिचय विभागात गवा, काळवीट, वाघ, फ्लेमिंगो (हंसक) वगैरे प्राण्यांची उत्कृष्ट पारभासी चित्रे उभारलेली आहेत.

या आधुनिक पद्धतीमुळे चर्मपूरकाला आता फक्त चर्मपूरणासंबंधीची माहिती असून चालणार नाही, तर पशुपक्ष्यांच्या शरीररचनेची, उदा., कंकाल तंत्र (हाडांच्या सापळ्यांची संरचना), स्नायू तंत्र व रंगरूपासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याला सृष्टिनिरीक्षणाची आवड पाहिजे. त्यामुळे प्राण्यांचे वसतिस्थान, त्यांचा स्वभाव आणि विविध हालचाली यांसंबंधी आवश्यक माहिती संग्रहित करता येईल. अशी माहिती पारभासी चित्रांच्या मांडणीसाठी जरूरीची आहे. याशिवाय छायाचित्रण, सुतारकाम, मातकाम इत्यादींची सुद्धा माहिती असणे जरूरीचे आहे.


चर्मपूरणाची सर्वसामान्य प्रक्रिया : मृत प्राणी मिळाल्यावर त्यांच्या शरीराच्या निरनिराळ्या भागांची मापे

घेतली जातात. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी काप घेऊन सर्व कातडी, अगदी पायांच्या बोटांपर्यंत काळजीपूर्वक काढून घेतली जाते. कातडी काढताना विशेष लक्षात ठेवावयाची गोष्ट म्हणजे तिला मांसाचा अथवा चरबीचा थोडासुद्धा अंश चिकटून राहता कामा नये. कारण त्यामुळे कातडी लवकर खराब होते. कातडी काढीत असताना तिला आतून टाकणखाराची पूड चोळतात. कातडी काढल्यावर तिच्यावरील केस, पिसे किंवा खवले गळून पडू नयेत म्हणून आर्सेनिक साबण, तुरटी वगैरेंचा उपयोग करतात त्याचप्रमाणे तिचे कीटकांपासून रक्षण करण्याकरिता तिच्या आतल्या बाजूला कीटकनाशकद्रव्ये लावतात. याचबरोबर प्राण्याचे स्नायू, फासळ्या, शरीराचे खालीवर असलेले भाग यांचे चित्र तयार करतात. हे चित्र चर्मपूरकाला मार्गदर्शनाकरिता उपयोगी पडते. या चित्राच्या आणि घेतलेल्या मापांच्या मदतीने लाकडाचे तुकडे, तारा, जाळ्या, शाडूची माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा कागदाचा लगदा यांच्या साहाय्याने प्राण्याचा सांगाडा तयार करतात. अशा रीतीने तयार केलेल्या प्राण्याच्या प्रतिरूपाला ‘मॅनिकिन’ म्हणतात. मॅनिकिन तयार करण्यास बरेच कौशल्य लागते. कारण ते तयार करताना निरनिराळ्या स्नायूंची स्वाभाविक स्थिती, शरीराच्या निरनिराळ्या भागांचे आकार व इतर लहानमोठ्या संरचना यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. प्राण्यांची स्वाभाविक चेहरेपट्टी जशी असेल तशी हुबेहुब दिसणे आवश्यक असते. मॅनिकिन तयार झाल्यावर त्यावर चिकण मातीचा पातळ थर देतात व नंतर त्यावर रसायने वगैरे लावून तयार केलेले कातडे बसवितात. प्राण्याच्या शरीराचे वर आलेले व खाली दबलेले वगैरे जे भाग असतील त्यांवर कातडे व्यवस्थित बसवून नंतर कातडी काढताना ज्या ठिकाणी काप घेतलेले होते त्या जागी शिवून टाकतात. मुख, गुदद्वार यांच्या श्लेष्मकला (अस्तरत्वचा), टाळू, जीभ, ओठ वगैरे प्लॅस्टिक द्रव्याचे बनवितात. मूळ डोळ्यांसारखे असणारे कृत्रिम (काचेचे) डोळे बसवितात. काही मोठे मासे व पक्षी अशाच पद्धतीने तयार करतात.

निरनिराळ्या वर्गांतील प्राण्यांचे चर्मपूरित नमुने तयार करताना वरील सर्वसामान्य प्रक्रियेत थोडाफार बदल करावा लागतो. सरीसृप (सरपटणाऱ्या) आणि उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या) प्राण्यांच्या मॅनिकिनांवर कातडे चढवून तयार केलेले नमुने हुबेहूब जिवंत प्राण्यांसारखे दिसत नाहीत, असे पुष्कळांना वाटते. म्हणून साप, बेडूक अशा प्राण्यांचा प्लॅस्टरचा साचा तयार करून त्यांचा ठसा किंवा प्रतिकृती बनवितात व त्यावर रंगकाम करून जिवंतपणा आणतात. माशांचे नमुनेसुद्धा वर दिलेल्या पद्धतीनेच तयार करतात. ठसे घेताना माशांचे पर (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्या) काढून ठेवलेले असतात, ते नंतर त्यांच्या शरीराला जोडतात. हे पर प्लॅस्टिकचे बनवितात किंवा खरे पर वाळवून वापरतात.

चर्मपूरणाचा आणखी एक प्रकार आहे. त्याचा उपयोग प्राणिविज्ञानाच्या अध्ययनासाठी लागणारे नमुने तयार करण्याकरिता होतो. प्राण्याची कातडी व्यवस्थितपणे काढून ती टिकाऊ करतात. नंतर या कातडीत कापूस, गवत, भुसा वगैरे पदार्थ भरून तिला पक्ष्याचे वा सस्तन प्राण्याचे मूळ स्वरूप आणतात. ससा, बेडूक व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संस्कारित कातड्यात बारीक माती, भुसा वगैरे भरून प्राण्याचे मूळ स्वरूप आणतात. अशा प्रकारे तयार केलेल्या नमुन्याला ‘कॅबिनेट स्पेसिमेन’ म्हणतात.

एच्‌. टी. मेरिमन यांच्या नव्या पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरातील अस्थी व मांस काढण्याची जरूरी नसते. शीतपेटीचा व काही रसायनांचा उपयोग करून प्राण्याच्या शरीरातील पाण्याचा थेंब आणि थेंब शरीराबाहेर गोठविला जातो. यामुळे मांस सडण्याचा संभव नसतो. अजून ही क्रिया प्रयोगावस्थेत आहे. या पद्धतीनुसार उंदराच्या आकारमानाचे प्राणी संस्कारित करता येतात. अधिक संशोधनानंतर ही क्रिया इतर प्राण्यांसाठी सुद्धा वापरता येईल.                                                                                                                                                                        

                                                                                                                                                 केतकर, श. म.