चर्ट : गूढस्फटिकी (अगदी सूक्ष्मस्फटिकांचा) सिलिकामय घट्ट खडक. चर्टाच्या उत्पत्तीविषयी वेगवेगळी मते आहेत. मूळच्या कॅल्शियमयुक्त द्रव्याच्या जागी सिलिका येऊन चर्ट बनतात. उदा., स्पिट्सबर्गेन येथील २६० मी. जाडीचा चर्टाचा थर चुनखडकाचे असे प्रतिष्ठापन होऊन तयार झालेला आहे. विद्रावातील सिलिक अवक्षेपित होऊन (साका खाली बसून) तसेच जलतापीय (उच्च तापमानाच्या जलीय विद्रावांच्या) क्रियांनी विभंग व संधी यांसारख्या भेगांजवळ निक्षेपित होऊन (साचून) चर्ट बनतो, असेही मत आहे. पाण्यात सिलिका अत्यल्प असल्याने जीवांच्या क्रिया अथवा सिलिकामय वनस्पतींचे अवशेष साचणे यांसारख्या प्रक्रियांनी मुख्यतः चर्ट तयार होत असावेत, असेही मानतात. ज्वालामुखीची क्रिया आणि चर्टाचे निक्षेपण यांच्यातील संबंध अजून नीट समजलेले नाहीत. चर्ट फ्लिंटापेक्षा भरड व ठिसूळ असतो. तो अच्छिद्र असून काचेपेक्षा कठीण आणि त्याचे वि.गु. २·६५ असते. चर्टातील पाणी व वायू यांच्या समाविष्टांमुळे तो अपारदर्शक आणि फिकट रंगाचा असतो. त्याला मलद्रव्यांनुसार विविध रंगांच्या छटा येतात. त्याचे भंजन (फुटणे) शंखाभ असून सूक्ष्मकणी संरचनेमुळे चमक मेणासारखी असते. चर्ट मुख्यतः सिलिकेचा बनलेला असतो. परंतु ॲल्युमिनियम, लोह, मॅंगनीज, कॅल्शियम, पोटॅशियम इ. त्यात अल्प प्रमाणात असतात. मात्र काळानुसार त्याचे रासायनिक संघटन बदलत जाते. क्षारात (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थात, अल्कलीत) आणि हायड्रोफ्ल्युओरिक अम्लात तो हळूहळू विरघळतो. चर्टापासून वातावरणक्रियेमुळे (वातावरणाचा परिणाम होऊन) ट्रिपोली हे पांढरे चूर्ण तयार होते.
चुनखडकांमध्ये व डोलोमाइटात स्तरित (थरांच्या) राशींच्या व संधितांच्या स्वरूपात चर्ट आढळतो. हे स्तर काही मीटर जाड व शेकडो चौ. किमी. पसरलेले आढळतात. त्यांच्यात सामान्यतः अंदुके (लहान गोलसर कण) समाविष्ट असतात. वेड्यावाकड्या चपट्या ग्रंथी, वडीसारखे पुंजके, भिंगे आणि बारीक शिरा, डबरी कण व गोटे यांच्या स्वरूपातही चर्ट आढळतो. चर्टात स्पंज, रेडिओलॅरिया यांसारख्या सिलिकामय जीवांचे अवशेष व जीवाश्म सापडतात. भारतातील पूर्व कडप्पा कालीन शैलसमूहांत चांगले चर्ट आहेत.
चर्टालाच सिलेक्साइट वा प्थॅनाइटही म्हणतात. ⇨फ्लिंट (काळसर, अपारदर्शक), हॉर्नस्टोन (भरडकणी), नोव्हॅक्युलाइट (स्तरित), ⇨जॅस्पर (लोह जादा), पोर्सलिनाइट (इतर द्रव्ये जादा), ⇨ कॅल्सेडोनी (मेणचट चमक), ⇨ अकीक (पट्टेदार) इ. प्रकारही चर्ट या सर्वसामान्य संज्ञेत येतात.
फुटलेल्या चर्टाच्या कडा तीक्ष्ण असल्याने आदिमानवाने हत्यारांसाठी त्याचा उपयोग केला. भांड्यांसाठीही चर्ट वापरीत. हल्ली रंग, मृत्तिका उद्योग, रस्ते वगैरेंसाठी चर्ट वापरतात.
ठाकूर, अ. ना.