चंपूकाव्य : संस्कृत भाषेतील ‘चंपू’ हे गद्यपद्यमय श्राव्य काव्य असून त्याचे स्वरूप बिरूदे, करंभक, दृश्य काव्याचे किंवा नाटकाचे विविध प्रकार इ. मिश्र काव्यप्रकारांहून निराळे आहे. चंपूकाव्य काहीसे महाकाव्यासारखे असते. त्याचा चतुरोदात्त, विवेकी नायक पराक्रमी व प्रबळ शत्रूशी दोन हात करून विजय मिळवितो. रस व भाव यांनी ओथंबलेली आणि शब्दार्थवैचित्र्यामुळे चमत्कृतिपूर्ण वाटणारी अलंकारप्रचुर शैली, कथोपकथा व संविधानकातील विविध प्रसंग यांची सुसूत्र मांडणी, नानाविध छंदांची योजना आणि नगरे, उद्याने, आश्रम, शिबिरे, भिन्न ऋतू, सरोवरे, नद्या, चंद्रसूर्यांचे अस्तोदय इत्यादींची विपुल चित्रदर्शी वर्णने ही त्याची व्यवच्छेदक लक्षणे होत. त्याची विभागणी उच्छ्‌वासांत केलेली असते. प्रारंभी प्रार्थना, नमन व विषयनिर्देश करून उच्छ्‌वासान्ती इष्टदेवतेचे व कवीचे नाव, पुढील कथाभाग, कवीचा उद्देश इत्यादींचा निर्देश केलेला असतो. मुख, प्रतिमुख, गर्भ, विमर्श व निर्वहण हे पाच संधी त्याच्या कथेच्या विकासात स्पष्ट दिसायला हवेत. दहाव्या शतकातील त्रिविक्रमभट्टाचा नळचंपू  हा सर्वात प्राचीन चंपू दिसतो. बरीचशी चंपूकाव्ये रामायण, महाभारत  व भागवत  या ग्रंथांवर वा त्यांतील एखाद्या आख्यानावर आधारलेली दिसतात. अण्णरायांच्या तत्त्वगुणादर्शासारखी वेदान्तपर, नीलकण्ठ दीक्षितांच्या नीलकण्ठविजयासारखी नीतिपर व सोमदेवाच्या यशस्तिलकासारखी जैन परंपरेतील चंपूकाव्येही थोडीफार आढळतात. गद्यपद्यांच्या मिश्रणामुळे शैली वस्तुतः अधिक सखोल व अर्थवाही व्हावयास हवी परंतु कथानिवेदनासाठी गद्य आणि कल्पनाविलास व रसपरिपोष यांसाठी पद्य अशी मार्मिक विभागणी करण्याचा फारसा प्रयत्न केलेला आढळून येत नाही. त्यामुळे चंपूकाव्य बहुदा कृत्रिम व बोजडच भासते. दहाव्या शतकानंतर हा काव्यप्रकार दक्षिणेत विशेष लोकप्रिय झालेला दिसतो.

करंदीकर, शैलजा केळकर, गोविंदशास्त्री