चंद्रगुप्त, पहिला : (? — ३३५). गुप्त वंशातील पहिला प्रसिद्ध राजा. याच्या जन्मासंबंधी तसेच बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो ३१८ मध्ये मगधाच्या गादीवर आला असावा. त्याच्या पित्याचे नाव घटोत्कच. घटोत्कचाचा राज्यविस्तार फार नसावा कारण त्याच्या लेखात महाराज ही साधी पदवी लावली आहे.
चंद्रगुप्ताने लिच्छवींच्या कुनारदेवीनामक राज्यकन्येशी विवाह केल्यावर लिच्छवींचे राज्य त्याच्या राज्यात सामील झाले. तथापि त्या राज्याच्या कारभारात लिच्छवींनाही स्थान होते, हे चंद्रगुप्ताच्या सोन्याच्या नाण्यांवरून स्पष्ट होते. त्या नाण्यांच्या पुढील बाजूंवर चंद्रगुप्त आणि कुमारदेवी एकमेकांसमोर उभी असून चंद्रगुप्त कुमारदेवीला काही वस्तू (सिंदुरकरंडक) देत असलेला दाखविला आहे. त्यांच्या बाजूस त्यांची नावे आहेत. त्या नाण्यांच्या मागील बाजूंवर सिंहवाहिनी दुर्गेची आकृती असून लिच्छवयः असा लेख आहे. तेव्हा ही नाणी गुप्त आणि लिच्छवी यांचे संयुक्त राज्यशासन दाखवितात, असे दिसते. पुढे लिच्छवींचे शासनातील वर्चस्व नाहीसे झाले, तरी समुद्रगुप्ताला आपण त्यांचे वंशज आहो याचा अभिमान होता, म्हणून त्याच्या लेखांतही त्याचे वर्णन करताना त्याला ‘लिच्छविदौहित्र’ असे विशेषण लावले आहे.
विवाहानंतर लिच्छवींच्या साहाय्याने चंद्रगुप्ताने आपल्या राज्याचा पश्चिमेकडे विस्तार करण्यास आरंभ केला. पुराणांत गुप्त राजांचे राज्य मगध, गंगेच्या काठचा प्रयागपर्यंतचा प्रदेश आणि साकेत (अयोध्या) या प्रदेशांवर असल्याचे वर्णन आहे. ते पहिल्या चंद्रगुप्ताच्या राज्याला अनुलक्षून असावे.
चंद्रगुप्ताने नंतर महाराजाधिराज अशी सम्राटपदनिदर्शक पदवी धारण केली आणि पूर्वोक्त नाणी पाडली. तोपर्यंत नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असत. चंद्रगुप्ताने संस्कृत भाषेला महत्त्व देऊन तीत आपल्या नाण्यांवरचे लेख तयार केले आणि अशा रीतीने नव्या मनूची सुरुवात केली. तसेच त्याने आपल्या राज्यारोहणापासून सुरू होणारा संवत्ही चालू केला. गुप्तांच्या सर्व लेखांतील कालगणना या संवतास अनुसरून आहे. चंद्रगुप्ताने ३१८ ते ३३५ पर्यंत राज्य केले असावे.
चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीतील घटनांविषयी आपणास माहिती नाही, तरी एकंदरीत तो शूर, महत्त्वाकांक्षी, धोरणी आणि संस्कृतप्रेमी राजा होता, यात संशय नाही. आपण स्थापलेल्या साम्राज्याच्या स्थैर्याला आणि वृद्धीला कर्तबगार शासकाची अत्यंत जरूरी आहे, हे जाणून त्याने आपल्या अंतकाळी केवळ ज्येष्ठत्वाला मान न देता गुणानुरोधाने आपला पुत्र समुद्रगुप्त याची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड दरबार भरवून जाहीर केली व संभाव्य गृहकलह टाळला, यात त्याचा दूरदर्शीपणा व्यक्त होतो.
पहा : गुप्तकाल.
संदर्भ : Majumdar, R. C. Ed. Classical Age, Bombay, 1970.
मिराशी, वा. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..