घेवडा, श्रावण : ( हिं. लोबा, फरसबी गु. फणशी क. टिगळावरे इं. फ्रेंच बीन, किडनी बीन, ड्वार्फ बीन लॅ. फॅसिओलस व्हल्गॅरिस कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही घेवड्याची एक जाती आहे. अर्धवट ताठ अथवा आधाराभोवती वेलीप्रमाणे वेटोळी देऊन वाढणारी ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती मूळची अमेरिकेच्या उष्ण हवामानातील असून सध्या जगाच्या सर्व उबदार हवामानाच्या प्रदेशात लागवडीत आहे. महाराष्ट्रात श्रावणाच्या सुमारास हे पीक बाजारात येत असल्यामुळे त्याला श्रावण घेवडा हे नाव पडले आहे. हे थोड्या दिवसांत तयार होणारे शेंग भाजीचे पीक आहे. पाने संयुक्त, त्रिदली फुले पांढरी अथवा जांभळ्या अंजिरी रंगाची. शिंबा (शेंगा) बारीक, १०—२५ सेंमी. लांब, हिरव्या अथवा पांढरट हिरव्या, सरळ अथवा थोड्याफार वक्राकृती, बाजू बहिर्गोल अगर गोलाकृती, पृष्ठभाग गुळगुळीत अगर मऊ लव असलेला, टोकाकडील चोचीसारखा भाग ठळकपणे पुढे आलेला बिया जवळजवळ वृक्काच्या (मूत्रपिंडाच्या) आकाराच्या, लांबट अथवा जवळजवळ गोल वा थोड्याफार चपट्या, पांढऱ्या, तांबड्या, जांभळट, काळसर अगर वाघ्या रंगाच्या. हिरव्या शेंगा भाजीसाठी आणि वाळलेल्या बिया उसळीसाठी वापरतात. सर्वच भाग गुरांना चंदी-वैरणीप्रमाणे खाऊ घालतात. उ. अर्जेंटिनातील फॅ. ॲब्ओरिजिनियस ही जंगली जाती व फॅ. व्हल्गॅरिस याच्या संकराने असे आढळून आले की, श्रावण घेवडा (फ्रेंच बीन) फॅ. ॲब्ओरिजिनियस पासून प्रथम निघाला आहे पुढे हा व याचे अनेक प्रकार उत्परिवर्तनाने (आनुवंशिक लक्षणांत होणाऱ्या एकाएकी बदलाने) निघाले असून त्यांपैकी अनेक भिन्न देशांत लागवडीत आहेत.
परांडेकर, शं. आ.
प्रकार : सामान्यपणे लागवड केले जाणारे प्रकार पांढऱ्या अगर काळ्या बियांचे असतात. केन्टकी वन्डर, जायंट स्ट्रिंगलेस, क्रमांक ३४ ए, पेन्सिल पॉड ५८ आणि क्रमांक ४ ओपन ही सुधारलेली वाणे आहेत. क्रमांक ३४ ए हे वाण आधारावर वेलीप्रमाणे वाढते आणि ६ ते ७ आठवड्यांत तयार होते. हेक्टरी उत्पन्न सु. ७,००० किग्रॅ. हिरव्या (लांब आणि चपट्या) शेंगा मिळतात. बिया पांढऱ्या असतात. पुणे, अहमदनगर आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी योग्य. पेन्सिल पॉड ५८ हे वाण मध्यम उंच वाढणारे असून शेंगा फिकट हिरव्या, लांब, वाटोळ्या, मांसल, कोवळ्या व खाण्यास गोड असतात. बिया तपकिरी रंगाच्या असतात. हे वाण सहा आठवड्यांत तयार होते. दर हेक्टरी उत्पन्न सु. ५,००० किग्रॅ. हिरव्या शेंगा मिळतात. बेळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी योग्य. क्रमांक ४ ओपन हे वाण झुडपाप्रमाणे वाढणारे असून शेंगा पिवळ्या, मध्यम लांब, कोवळ्या आणि फार गोड असतात. हे वाण फक्त ५ आठवड्यांत तयार होते आणि हेक्टरी उत्पन्न २,२०० किग्रॅ. मिळते. अहमदनगर आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी योग्य.
हवामान व जमीन : सु. ७५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि उबदार हवामानात हे पीक येते. प्रामुख्याने ते पावसाळी हंगामात घेतात. उन्हाळ्यात लागवडीसाठी डोंगराळ भागांतील हवामान योग्य असते. कारण सपाट प्रदेशातील ह्या हंगामातील तापमान या पिकाला मानवत नाही. उत्तम निचऱ्याच्या मध्यम काळ्या किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले वाढते.
मशागत व लागण : जमीन १२ ते १५ सेंमी. खोल नांगरून कुळवाच्या दोन अगर तीन पाळ्या देऊन सपाट व भुसभुशीत करतात. शेवटची कुळव पाळी देण्यापूर्वी जमिनीत हेक्टरी १२ टनांपर्यंत चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालतात व शेवटच्या कुळवपाळीने जमिनीत मिसळून घेतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाभरीने हेक्टरी ४०–५० किग्रॅ. बी दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी. ठेवून पेरतात. उन्हाळी पीक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात सरीतील वरंब्यावर बी टोकून लावतात. उन्हाळ्यात आले, हळद, सुरण इ. पिकांतून मिश्र पीक म्हणूनही लावतात.
काढणी व उत्पन्न : लागणीनंतर प्रकाराप्रमाणे पाच ते सात आठवड्यांनी कोवळ्या लुसलुशीत शेंगा भाजीसाठी तोडतात. आठवड्यातून दोनतीन वेळा याप्रमाणे सु. पाच ते सहा तोडे दोनतीन आठवड्यांच्या मुदतीत मिळतात. शेंगा तोडावयास एक दिवसाचाही उशीर झाला तरी त्या निबर होतात. तोडण्यासाठी शेंगा अशा असाव्या की, बोटात धरून मुडपल्यास त्यांचे दोन तुकडे व्हावे. हेक्टरी ५,०००—७,००० किग्रॅ. शेंगा मिळतात. बियांसाठी पिके घेतल्यास हेक्टरी ५००—७०० किग्रॅ. बी मिळते.
वाळलेल्या बिया ‘राजमा’ या नावाने बाजारात विकल्या जातात. त्यांमध्ये २३% प्रथिने, ६१% कार्बोहायड्रेटे असतात. पौष्टिक खाद्य या दृष्टीने राजमाला फार महत्त्व आहे. त्यांतील प्रथिने प्राणीज प्रथिनांच्या जवळजवळ बरोबरीने आहेत. शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी हे उपयुक्त खाद्य आहे.
रोग : श्रावण घेवड्यावर मुख्यत्वेकरून करपा (अँथ्रॅक्नोज) नावाचा रोग पडतो. पाने, खोड, शेंगा व बियांवर काळे डाग पडतात. शेंगांवर हे डाग गोलसर अथवा वेडेवाकडे असून त्यांचा मध्यभाग खोलगट असतो. रोगाचे प्रमाण फार असल्यास बीजधारणा होत नाही. रोग पडलेल्या शेंगा कुजतात. पावसाळी हवेत या रोगाचे प्रमाण वाढते. उपाय म्हणून रोगमुक्त बियाणे वापरतात अथवा रोग प्रतिकारक जातींचे बी पेरतात. रोग दिसू लागताच रोगट झाडे उपटून टाकतात व बोर्डो मिश्रण अथवा तत्सम कवकनाशकाची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याची) फवारणी करतात. या पिकावर पडणारे तांबेरा आणि केवडा हे रोग कमी महत्त्वाचे आहेत.
किडी : दोन प्रकारचे भुंगेरे (ठिपके भुंगेरा आणि फ्ली बीटल) आणि माव यांपासून श्रावण घेवड्याचे बरेच नुकसान होते. ठिपके भुंगेऱ्यांचे डिंभक (अळीसारखी अवस्था) पानांची बाह्यत्वचा खातात त्यामुळे पाने वाळतात. या किडीच्या नियंत्रणासाठी पॅराथिऑन वा मॅलॅथिऑन फवारतात. फ्ली बीटल हे पिसूच्या आकाराचे भुंगेरे असून ते बी उगवून आल्याबरोबर कोवळी पाने खातात त्यामुळे पानांना छिद्रे पडतात. पेरणीपूर्वी सिस्टॉक्स या कीटकनाशकामध्ये बी भिजत घालतात आणि वाळवून पेरतात. माव्याची कीड पाने, फुले आणि शेंगांमधून अन्नरस शोषून घेते त्यामुळे झाडाची वाढ खुरटते. या किडीसाठी पायरेथ्रमची भुकटी (०·२ ते ०·५%) उडवतात. एक प्रकारच्या माशीमुळेही श्रावण घेवड्याचे फार नुकसान होते. ही माशी पानांतून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पाने वाळतात आणि शेवटी झाडही वाळते. निकोटीन सल्फेट आणि डीडीटीचा वापर केल्याने या किडीला आळा बसतो.
पहा : लेग्युमिनोजी.
भोसले, रा. जि.