घुर्ये, गोविंद सदाशिव : (१२ डिसेंबर १८९३—   ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय समाजशास्त्रज्ञ. जन्म मालवण (रत्नागिरी जिल्हा) येथे. शिक्षण मालवण, मुंबई, जुनागड या ठिकाणी. एम्.ए. झाल्यावर (१९१८) मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात काही काळ अध्यापन. पुढे इंग्लंडला प्रयाण व केंब्रिज विद्यापीठाची पीएच्. डी. ही पदवी (१९२३). १९५९ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत मुंबई विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक. त्यानंतर ते याच विद्यापीठात समाजशास्त्राचे गुणश्री प्राध्यापक.

डॉ. घुर्ये यांचे एकूण तेवीस ग्रंथ आणि अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. समाजशास्त्रीय व मानवशास्त्रीय विषयांतील त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : कास्ट अँड रेस इन इंडिया (१९३२), ॲबॉरिजिन्स सो कॉल्ड अँड देअर फ्यूचर (१९४३), इंडियन कॉस्च्यूम (१९५१), इंडियन साधूज (१९५३), फॅमिली अँड किन इन इंडो-यूरोपियन कल्चर (१९५५), रिलीजस कॉन्शसनेस (१९६५) आणि सोशल टेन्शन्स इन इंडिया (१९६८).

भारतीय जाती आणि जातिव्यवस्था, अनुसूचित जमाती, संस्कृती, नागरीकरण, ग्रामजीवनातील स्थित्यंतरे, भारतीय वेशभूषा, कुटुंब व नातेव्यवस्था, भारतीय साधुसंत, जनसांख्यिकीय समस्या आणि कुटुंबनियोजन, भारतातील सामाजिक तणाव यांसारखे अनेक विषय डॉ. घुर्ये यांनी आपल्या ग्रंथांतून हाताळलेले आहेत. मौलिक संशोधन, सांगोपांग व साधार माहिती, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, अष्टपैलू विद्वत्ता इ, गुणांमुळे त्यांचे शास्त्रीय लेखन अत्यंत मूलग्राही व विचारप्रवर्तक ठरले आहे.

डॉ. घुर्ये यांनी १९५१ मध्ये ‘इंडियन सोशिऑलॉजिकल सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संस्था व समित्या यांतूनही विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम्. ए. व पीएच्. डी. साठी अनेक अभ्यासकांनी आपले प्रबंध यशस्वीपणे सादर केले. भारतातील विद्यापीठीय स्तरावर समाजशास्त्राला एक महत्त्वाचा अभ्यास व संशोधनविषय म्हणून त्यांनी महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. अशा अभ्यासाचा आणि संशोधनाचा आदर्श त्यांनी स्वतःच्या लेखनातून व व्यासंगातून घालून दिला. म्हणूनच भारतातील समाजशास्त्रीय अभ्यासाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांचा उचित असा गौरव केला जातो.

कुलकर्णी, मा. गु.