घायपात : (हिं. बास केवडा राकस पत्ता गु. जंगली कुवार क. कट्टाले इं. अगेव्ह कुल-ॲमारिलिडेसी). अनेक मोठ्या, लांब, जाडजूड व काटेरी पानांची गुच्छासारखी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी मूळची मेक्सिकोतील आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील संस्थानांतील असून दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडीज, ईस्ट इंडीज, मध्य अमेरिका, हवाई, भारत, श्रीलंका या देशांत तिचा प्रसार झाला आहे. पोर्तुगीज लोकांनी घायपाताच्या जाती प्रथम भारतात पंधराव्या शतकात आणल्या व आता भारताच्या बहुतेक सर्व भागांत ही वनस्पती चांगली वाढते.
सर्वसाधारण वर्णन : घायपात ही वनस्पती एकदलिकित वनस्पतींपैकी ⇨ लिलिएलीझ गणातील, ॲमारिलिडेसी कुलातील व अगेव्ह वंशातील आहे. या वंशातील वनस्पती इंग्रजी भाषेत ‘अगेव्ह’ या सर्वसामान्य नावाने ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ही वनस्पती घायपात अगर घायाळ या नावाने ओळखली जाते. अगेव्ह वंशातील वनस्पती लघुस्तंभीय, अर्धकाष्ठमय असून जमिनीवरील खोडाचा भाग पानांच्या तळांनी गुच्छाप्रमाणे व्यापलेला असतो. पाने लांब, टोकदार,साधी, बिनदेठाची, मांसल, चिवट, किंचित करडी हिरवी, मेणचट असून ती तळाच्या थोडे वर संकुचित आणि मध्यावर अथवा मध्याच्या किंचित वर जास्त रुंद असतात. पानांच्या दोन्ही कडांवर तीक्ष्ण, लहान काटे असतात (काही जातींत कडांवर काटे नसतात). पानाच्या टोकाला तीक्ष्ण,जाड, बळकट काटा असतो. वनस्पतीच्या आयुष्यात (७–८ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत) एकदाच फुलोरा (परिमंजरी) येतो. फुलोऱ्याचा दांडा तळाशी सु. १५ सेंमी. जाड असून ६ ते १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून वर येतो. फुलात ६ परिदलांची आखूड नलिका व त्यांत सहा केसरदले आणि तीन किंजदलांचा अधःस्थ किंजपुट असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) द्वयावृत प्रकारचे व बीजे अनेक, चपटी, काळी व पातळ असतात. फुलोरा आल्यावर घायपाताची झाडे मरतात. फुलोऱ्यावरील लहान कंदिकांपासून (लहान कंदांपासून) तसेच मूलक्षोडापासून (जमिनीत वाढणाऱ्या आडव्या खोडापासून) आलेल्या अनेक अधश्चरांपासून (मुनव्यांपासून) नवीन वनस्पती येतात.
उपयोग : लोहमार्गाच्या दुतर्फा, रस्त्याच्या दुतर्फा तसेच शेताच्या कडेने कुंपणासाठी आणि उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी घायपाताची लागवड केली जाते. ही फार रुक्षता विरोधक वनस्पती असल्याने या (ॲमारिलिडेसी) कुलातील इतर जाती जेथे वाढू शकत नाहीत अशा मुरमाड व कोरड्या जमिनीत ही वाढू शकते.
पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. हा धागा लांब (१ ते १·७५ मी.), भरभरीत आणि मजबूत असतो आणि दोर व दोरखंडे तयार करण्यासाठी त्याचा मुख्यत्वेकरून उपयोग करतात. घायपातापासून तयार केलेला दोर काथ्या अगर कापसाच्या सुतापासून तयार केलेला दोरापेक्षा मजबूत असून तो जास्त दिवस टिकतो. यामुळे औतांसाठी, मोटेसाठी आणि जनावरे बांधण्यासाठी या दोराला फार मागणी असते. परंतु हा दोर पाण्यात फुगत असल्याने पाण्यात (विशेषतः खाऱ्या पाण्यात) फार दिवस टिकत नाही. घायपाताचा वाख हा महत्त्वाचा कठीण धागा (हार्ड फायबर) आहे व अमेरिकेत व्यापारी दृष्ट्या त्याला कापसाच्या खालोखाल महत्त्व आहे. दोर आणि दोरखंड यांखेरीज पुढील वस्तूंच्या उत्पादनासाठी घायपाताच्या वाखाचा उपयोग होतो. यंत्राच्या साहाय्याने कापणी केलेल्या पिकाचे गठ्ठे बांधण्यासाठी दोर (बाइंडर ट्वाइन), कटाचा दोरा, मासे पकडण्यासाठी, रेल्वेच्या उघड्या वाघिणींवर (मालावर) घालण्यासाठी, बैलगाडीतून कापूस बाजारात नेण्यासाठी वगैरे कामांसाठी उपयोगी पडणाऱ्या जाळ्या, चटया, पायपोस, झुले, गालिचे, भरभरीत कापड, कागद, कागदी पुठ्ठा, खुर्च्यांसाठी गाद्या, स्वस्त प्रतीचे ब्रश वगैरेंसाठी होतो.
मोठी, ओली व मांसल पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, मूत्रल (लघवी साफ करणारा), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) व रक्तपित्तनाशक असून मुळे मूत्रल, स्वेदकारी आणि उपदंशनाशक (गरमीनाशक) असतात. मुळे शिजवून खाण्यासाठी उपयोग करतात. पानांचे तळभाग व फुलोऱ्याचा दांडा दुष्काळात अन्न म्हणून उपयोगी येतो. दांड्यांतील भेंडाच्या फाक्या वाळवून वस्तऱ्यासाठी पलाटणी करतात. दांड्यातील रसापासून ॲगोव्हेज ही दुर्मिळ साखर आणि शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. पानांतील रसाचा साबणाच्या ऐवजी उपयोग होतो. घराच्या भिंतींना गिलावा करताना गिलाव्यात पानांचा रस मिसळल्यास वाळवीचा उपद्रव होत नाही. त्याचप्रमाणे पानांतील रस हाताला व पायाला चोळल्यास त्या भागांना विस्तवापासून इजा होत नाही असा समज आहे.
मेक्सिकन लोक घायपाताच्या फुलोऱ्याच्या दांड्यातील रसापासून ‘पुल्के’ नावाचे पेय तयार करतात. ते त्यांचे राष्ट्रीय पेय आहे. त्यातून अन्नांशही मिळतो. यासाठी अगेव्ह अट्रोव्हायरेन्स या जातीची मेक्सिकोमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. या जातीची पाने २·५ मी. लांब असतात व फुलोऱ्याचा दांडा मनुष्याच्या शरीराएवढा जाड आणि १० मी. उंच असतो. तसेच घायपाताच्या अनेक जातींचे फुलोऱ्यावर दांडे आणि पानांचे तळ यांचे बारीक तुकडे आंबवून ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून पदार्थ अलग करण्याच्या क्रियेने) ‘मेस्कल’ नावाची दारू त्या देशात तयार करण्यात येते.
महत्त्वाच्या जाती : घायपाताच्या (अगेव्ह वंशाच्या) सु. ३०० जाती आहेत. त्यांपैकी वाखासाठी पुढील जाती महत्त्वाच्या आहेत. (१) अगेव्ह फोर्क्रॉयिडीस : याची लागवड मेक्सिकोमध्ये विशेषतः चकटन प्रांतात, मोठ्या प्रमाणावर होते. या जातीपासून ‘हेनेक्वेन’ किंवा ‘युकॅटन सिसाल’ नावाचा प्रसिद्ध वाख तयार होतो. (२) अगेव्ह सिसालाना : याची लागवड पूर्व आफ्रिका, मॉरिशस, वेस्ट इंडीज, फिलिपीन्स, डच ईस्ट इंडीज या देशांत मोठ्या प्रमाणावर होते. या जातीपासून ‘सिसाल हेंप’ नावाचा प्रसिद्ध वाख मिळतो. (३) अगेव्ह कँटाला : याची लागवड मलाया, जावा, फिलिपीन्समध्ये मोठ्या प्रमाणावर करतात. भारतामध्ये रेल्वेमार्गाच्या दुतर्फा आणि शेतकुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर ही जात लावलेली आढळते. भारतात या जातीपासून तयार केलेला वाख ‘बाँबे हेंप’ वा ‘बाँबे ॲलो फायबर’ या नावाने ओळखला जातो. हा वाख सिसाल हेंपपेक्षा बारीक, मऊ परंतु कमी मजबूत असतो.
घायपाताच्या जातींची भारतात आयात व लागवड : पोर्तुगीज लोकांनी पंधराव्या शतकात घायपाताच्या जाती प्रथम भारतात आणल्याचा उल्लेख वर आला आहेच. प्रथम ज्या जाती आणून लावल्या गेल्या त्यांचा उद्देश लढाईच्या काळात किल्ल्यांभोवती, कोठारांभोवती अथवा महत्त्वाच्या गावाभोवती संरक्षणासाठी कुंपण हा होता. पुढे शांततेच्या काळात रस्त्याच्या आणि रेल्वेमार्गाच्या दुतर्फा व शेताच्या कडेने कुंपण म्हणून निरनिराळ्या जातींची लागवड करण्यात आली. घायपातापासून वाख काढणे हा त्याकाळी मुख्य उद्देश नव्हता. त्यामुळे रुक्ष आणि खडकाळ जागेत ज्या जाती टिकून राहिल्या त्यांतील ज्यांची वाढ चांगली झालेली दिसून आली त्या जातींचीच लागवड विशेष प्रमाणावर वर दिलेल्या कारणांसाठी करण्यात आली. १८९० च्या सुमारास अगेव्ह सिसालाना या वाखासाठी प्रसिद्ध असलेल्या (सिसाल) जातीची आयात करण्यात आली.
वाखाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी कर्नाटक, तमिळनाडू, आसाम, केरळ, मुंबई उपनगर या भागांत घायपाताची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आणि यांत्रिक पद्धतीने वाखाचे उत्पादनही होत असे परंतु वाखाच्या किंमती घसरल्यामुळे ही लागवड बंद पडली. परंतु दोर आणि दोरखंड तयार करण्याचा धंदा हा जोडधंदा म्हणून टिकून आहे. रेल्वेमार्ग, रस्ते यांच्या दुतर्फा लावलेल्या व शेतांच्या बांधांवर कुंपणासाठी लावलेल्या असंख्य झाडांचा उपयोग या कामी होतो. याशिवाय भारताच्या निरनिराळ्या भागांत प्रयोगासाठी घायपाताची पद्धतशीर लागवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मुख्यतः ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांत घायपाताची लागवड केली जाते. यांपैकी फक्त अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंद्याजवळ घायपातवाडी येथे घायपाताची लागवड असल्याचा उल्लेख आहे.
हवामान आणि जमीन : सामान्य शेतपिकांची लागवड ज्या प्रकारच्या जमिनीत होऊ शकते अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये घायपाताची लागवड होऊ शकते. अगदी निकृष्ट प्रकारच्या जमिनीमध्येही ही वनस्पती वाढू शकते परंतु अशा जमिनीत फारसे उत्पन्न मिळत नाही. सर्वसाधारणपणे मुरमाड आणि कोरड्या जमिनीत घायपाताची लागवड केली जाते परंतु पाण्याचा चांगला निचरा असलेल्या लाल दुमट जमिनीत त्याची वाढ जोमदार होते. भारताच्या उष्ण भागांतील हवामानात आणि २,००० मी. उंचीपर्यंतच्या टेकड्यांतील हवामानातही ही वनस्पती वाढते. मात्र यासाठी जमीन कोरडी व खडकाळ असावी आणि हवामानात फार आर्द्रता नसावी (मूळची ही वनस्पती उष्ण कटिबंधातील आहे). त्याचप्रमाणे दक्षिण भारतात ५०० मिमी. पासून १,७५० मिमी. पर्यंत पाऊस पडणाऱ्या निरनिराळ्या भागांतही ही वनस्पती वाढू शकते. भारी जमिनीत घायपाताची लागवड केल्यास त्याची वाढ चांगली होते परंतु पानांतील वाखाचे प्रमाण कमी असते. अगेव्ह सिसालाना या जातीला कडाक्याची थंडी मानवत नाही.
लागण : घायपाताची लागण फुलोऱ्यावरील कंदिका वा अधश्चर यांपासून करतात. प्रथम रोपवाटिकेत कंदिका अथवा अधश्चर लावून एक वर्षानंतर कायम जागी लावतात. कुंपणासाठी लागण करताना मातीच्या वरंब्यावर अथवा शेताच्या बांधावर दोन झाडांमध्ये १ मी. अथवा त्याहीपेक्षा कमी अंतरावर कंदिका अगर अधश्चर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लावतात. पीक म्हणून लागण करावयाची असल्यास ३० सेंमी. × ३० सेंमी. × ३० सेंमी. खड्डे खणून लागण करतात. दोन ओळींमध्ये आणि दोन झाडांमध्ये ३ ते ४ मी. अंतर ठेवतात. पहिली दोन अगर तीन वर्षे चवळी, भुईमूग यासारखे एखादे पीक दोन ओळींमध्ये घेतात. झाडांना अधश्चर येतील तसतसे ते काढून टाकणे अवश्य असते. तण काढण्यापलीकडे घायपाताला मशागतीची जरूर नसते.
कापणी : लागणीपासून ३ ते ४ वर्षांनी पूर्ण वाढ झालेल्या झाडाच्या तळाच्या पानांची पहिली कापणी करतात. खोडाशी ७५ अंशांचा अगर त्यापेक्षा थोडा जास्त परंतु काटकोनापेक्षा कमी कोन असताना पाने कापणीस योग्य समजतात. पहिल्या कापणीनंतर दरसाल एक किंवा दोन कापण्या झाडाला फुलोरा येईपर्यंत करतात. प्रत्येक झाडाला दरवर्षी २० ते २५ कापणीयोग्य पाने मिळतात. दर झाडापासून एकूण २५० ते ३०० पाने मिळतात. घायपाताचे आयुष्य ७–८ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत असते. फुलोरा जेवढा उशीरा येईल तेवढे फायद्याचे असते. कारण फुलोरा आल्यावर झाडाचे आयुष्य संपते. अपेक्षेपेक्षा लवकर फुलोरा येण्याची निश्चित कारणे समजलेली नाहीत. पाने कोवळी असताना ती मोठ्या संख्येने कापल्यास झाड कमजोर होते त्यामुळे अथवा मूलक्षोडापासून निघालेले अधश्चर फार दिवसांपर्यंत न काढल्यामुळे झाडाला लवकर फुलोरा येण्याची शक्यता असते. तसेच विशिष्ट हवामानाचाही झाड लवकर फुलोऱ्यावर येण्याशी संबंध असावा असे दिसते.
वाख काढणे : घायपाताच्या पानापासून वाख काढण्याच्या दोन मुख्य पद्धती आहेत : (१) कोरडी पद्धत व (२) ओली (जुनी) पद्धत. कोरड्या पद्धतीमध्ये पानाच्या टोकाकडील काट्याचा भाग आणि काटे असलेला कडांचा भाग काढून पान लाकडी दांड्याने ठेचतात. नंतर ते लाकडी फळीवर ठेवून त्यावर बोथट सुऱ्याचे पाते दाबतात आणि पान सुरा व फळी यांमधून ओढून काढतात. पानांतील इतर पदार्थांपासून वाख (धागा) मोकळा होईपर्यंत ही क्रिया करावी लागते. नंतर वाख पाण्यात धुवून वाळत घालतात. कोरड्या पद्धतीचा दुसरा प्रकार म्हणजे पाने उभी चिरून प्रत्येक पानाच्या चार अगर पाच लांब पट्ट्या काढतात आणि त्या लाकडी फळीवर ठेवून त्यांतील मगज (गर) खरडून काढतात. मोठ्या प्रमाणावर कोरड्या पद्धतीने वाख काढण्यासाठी रास्पडोर नावाच्या यंत्राचा उपयोग करतात. वाख काढण्याच्या ओल्या पद्धतीमध्ये प्रथम पाने उभी चिरून त्यांपासून काढलेल्या पट्ट्यांचे गठ्ठे बांधतात. नंतर हे गठ्ठे पाण्यात ठेवून त्यांवर वजनासाठी दगड ठेवतात. सु. २० दिवसांनंतर हे गठ्ठे पाण्यातून काढून पाने दगडावर आपटून आतील मगज खरडून काढतात. अशा तऱ्हेने वाख इतर पदार्थांपासून मोकळा होतो. नंतर तो पुन्हा पाण्यात धुवून वाळवितात. कोरड्या पद्धतीमध्ये पानांमधून ३ ते ३·५% वाख मिळतो. तो ओल्या पद्धतीमुळे सु. ४·६% मिळतो. ओल्या पद्धतीने काढलेल्या वाखातील धागे कोरड्या पद्धतीने काढलेल्या वाखातील धाग्यांपेक्षा जास्त लांब असतात. कोरड्या पद्धतीपेक्षा ओली पद्धत कमी खर्चाची असते. परंतु कोरड्या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे त्या पद्धतीने काढलेला वाख पांढरा व तेजदार असतो. ओल्या पद्धतीने काढलेला वाख निस्तेज आणि कमी मजबूत असतो. शिवाय तो काढण्यास बराच कालावधी लागतो.
उत्पन्न : अगेव्ह सिसालाना जातीची पद्धतशीरपणे लागवड केल्यास दर हेक्टरी सु. १,३०० किग्रॅ. वाख मिळतो. हलक्या प्रतीच्या जमिनीत व फार कोरड्या (रुक्ष) भागांत लागवड केल्यास हेक्टरी सु. ४५० किग्रॅ. एवढाच वाख मिळतो.
भारतातील घायपाताच्या प्रमुख जाती : (१) अगेव्ह अंगुस्तिफोलिया, (२) अगेव्ह कँटाला, (३) अगेव्ह सिसालाना, (४) अगेव्ह व्हेराक्रूझ व (५) अगेव्ह अमेरिकाना.
अगेव्ह अंगुस्तिफोलिया : (इं. ड्वार्फ ॲलो म. छोटा घायाळ). ही जात मूळची अमेरिकेतील असून भारतात हिमालयाचा खालचा भाग, बाह्य हिमालय आणि इतरत्र आढळते. सपाट प्रदेशांत रेल्वेमार्गाच्या दुतर्फा लावलेली आढळते. खोड आखूड आणि भक्कम, पाने आखूड (४०—६० × ७·५० सेंमी.), करडी हिरवी असतात. पानाच्या टोकास चपटा काटा व कडांवर बारीक काटे असतात. वाख हलक्या प्रतीचा असतो. धागा आखूड असल्यामुळे तो पायपोस, कुंचले इत्यादींसाठी वापरतात.
अगेव्हा कँटाला : (इं. बाँबे ॲलो). ही जात मूळची मध्य अमेरिकेतील असून जावा व फिलिपीन्समध्ये लागवडीखाली आहे. भारतात बाहेरील देशांतून घायपाताच्या जातींची आयात झाली, त्यांत ही जात सर्वप्रथम आली असावी असे मानतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांत ही आढळते. कुंपणासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपयुक्त, मध्यम सुपीक जमिनीत आणि १,००० ते २,५०० मिमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या प्रदेशांत ह्या जातीची चांगली वाढ होते. आरोही मूलक्षोडावर लांब रेषाकृती पाने (१२० × ७·६ सेंमी.) येतात. वाखाचा उपयोग दोर, दोरखंड, कटाचा दोरा, जाळी तयार करण्यासाठी आणि केरळात चटया विणण्यासाठी करतात. यंत्राच्या साहाय्याने काढलेला वाख बारीक असतो परंतु सिसाल वाखाएवढा मजबूत नसतो.
अगेव्ह सिसालाना : (इं. सिसाल अथवा सिसाल अगेव्ह हिं. बनकेवडा). मूलस्थान मध्य अमेरिका. पूर्व आफ्रिका, जावा, फ्लॉरिडा, वेस्ट इंडीज या भागांत मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली. भारतात प. बंगाल, आसाम, तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांत तिची लागवड केली जाते. या जातीपासून तयार होणारा वाख सिसाल हेंप या नावाने ओळखला जातो दोर आणि तत्सम वस्तू तयार करण्यासाठी हा वाख सर्व जगात प्रसिद्ध आहे. भारतात ही जात प्रथम १८९० च्या सुमारास लागवडीसाठी आणली गेली. ही अतिशय रुक्षता विरोधक जात आहे. कोरड्या हवेत दुमट जमिनीत या जातीची वाढ चांगली होते. खोड भक्कम व आखूड, सु. ३८ सेंमी. जाड पाने गर्द हिरवी, मांसल, १·५० मी. × १० सेंमी. टोकाच्या काट्यांवर उथळ खाच असते. पानाच्या कडांवर बहुधा काटे नसतात. वाख मजबूत, भरभरीत, पांढरा अगर फिकट पिवळा असतो. धाग्याची लांबी १ ते १·७ मी. असते.
अगेव्ह व्हेराक्रूझ : (इं. ब्ल्यू एलीफंट ॲलो म. लतिया घायाळ). ही जात मूळची मेक्सिकोमधील. भारतात सर्वत्र (विशेषेकरून आसाम, बंगाल, बिहार, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात) कुंपणासाठी लावलेली आढळते. जास्त पावसाच्या दमट हवामानात ही जात इतर जातींपेक्षा चांगली वाढते. पानात वाखाचे प्रमाण १·५ ते २·५% असते. धागा (वाख) भरभरीत परंतु कँटाला जातीच्या धाग्यापेक्षा मजबूत असतो. दोर, दोरखंड आणि चटयासाठी त्याचा उपयोग करतात.
अगेव्ह अमेरिकाना : (इं. अमेरिकन ॲलो, सेंच्युरी प्लँट). या जातीची भारतात फक्त बागांतून शोभेचे झाड म्हणून लागवड करण्यात येते. पानांपासून वाख काढता येत असला, तरी वाखासाठी ही जात मुळीच महत्त्वाची नाही आणि भारतात ती कोठेही मोठ्या संख्येने आढळून येत नाही.
रोग : घायपाताच्या पानांवर करपा रोग पडतो. तो कोलेटॉट्रिकम अगेव्हिज कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) उद्भवतो. रोगामुळे पानांवर वाटोळे काळे ठिपके पडतात. त्यामुळे पान वाळते. रोग नियंत्रणासाठी रोगट पाने गोळा करून जाळतात. रोगाचे प्रमाण फार असल्यास पिकावर ५ : ५ : ५० कसाचे बोर्डो मिश्रण फवारतात.
संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Field Crops of India, Bangalore, 1958.
2. Watt, G. Commercial Products of India, New Delhi, 1966.
जगताप, अहिल्या पां. गोखले, वा. पु.
चौधरी, रा. मो. कुलकर्णी, य. स.
“