डोळा : प्राणिशरीरातील प्रकाशग्राही कोशिकांच्या (पेशींच्या) समुच्चयाला डोळा म्हणतात. दृष्टिज्ञान हे बहुतेक सर्व प्राण्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अतिशय साध्या संरचनेचे प्राणी सोडून सगळ्यांत ज्याच्या योगाने सर्व वस्तू पाहता येतील, असे ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाल्याचे दिसून येते. प्रस्तुत नोंदीत प्रारंभी मानवी डोळ्यासंबंधी माहिती दिलेली असून नंतर इतर प्राण्यांच्या डोळ्यांचे वर्णन दिले आहे. डोळ्यांच्या विविध विकारांकरिता ‘नेत्रवैद्यक’ ही नोंद पहावी.
मानवी शरीरातील ज्ञानेंद्रियांपैकी डोळा हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. त्यामुळे प्रकाश, वस्तू, त्यांचे रंग, आकार व रूप, दोन वस्तूंमधील अंतर वगैरे गोष्टींचा बोध होतो. ज्ञानार्जन, निसर्गाचे अवलोकन करणे, परिसरात घडोघडी होणाऱ्या बदलांची जाणीव होणे इ. गोष्टी आपणास बहुतांशी डोळ्यांच्या साहाय्याने करता येतात. डोळ्यांची हालचाल, उघडझाप, त्यांचे तेज यांच्या द्वारे विविध मनोभावना व्यक्त होतात. चेहऱ्याचे सौंदर्य पुष्कळ अंशी डोळ्यांवरच अवलंबून असते. डोळा हे उपजीविकेचे एक महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्याची निगा राखणे फार महत्त्वाचे आहे. अंधत्व ही एक भयानक आपत्ती असून अंध माणसास जगामध्ये वावरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्याचे जीवन अत्यंत खडतर होऊन बसते.
भ्रूण विज्ञान : (गर्भाची उत्पत्ती आणि वाढ यांच्या अभ्यासाचे शास्त्र). भ्रूणाच्या अग्रमस्तिष्क (मेंदूच्या पुढच्या) विभागापासून डोळ्यांची आद्यांगे तयार होतात. भ्रूणाच्या पृष्ठावर लंबोत्तर दिशेतील तंत्रिका तंतू (मज्जातंतू) प्रणाली आत दुमडून एक नलिका बनते. या नलिकेपासूनच केंद्रीय तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) उत्पत्ती होते. डोळ्याच्या आद्यांग असलेल्या जागी असणाऱ्या कोशिकांचा अग्रभाग गाठीसारखा घट्ट होतो व त्याला ‘चाक्षुषपट्ट’ म्हणतात. या गाठी मागील बाजूच्या पृष्ठाकडे वाढत जाऊन त्यांच्यापासून अक्षिवृंतकांचा (ज्यांपासून पुढे डोळ्याची तंत्रिका तयार होते त्या भागांचा) विकास होतो. पुढच्या भागी दोन्ही बाजूंस विकसित होणाऱ्या मेंदूच्या या भागापासून व त्यांना लागून असणाऱ्या भ्रूण मध्यस्तरातील रचनेपासून डोळ्यांची उत्पत्ती व विकास होतो. अक्षिवृंतकाची वाढ होत जाऊन तो भ्रूणबाह्यस्तराला भिडल्यानंतर त्याच्या खालच्या भागाचे अंतर्वलन (आत मुडपणे) होते (रबरी चेंडूला भोक पाडून त्यातील हवा काढून त्याचा एक भाग दुसऱ्या मुडपल्यास त्याला असाच वाटीसारखा आकार येतो). अक्षिवृंतकाच्या अंतर्वलनामुळे जो वाटीसारखा भाग बनतो त्याला अक्षिचषक म्हणतात. ज्या ठिकाणी हे अंतर्वलन होते ते स्थान काही काळ उघडेच राहते व त्याला भ्रूणविवर म्हणतात. अक्षिचषकाच्या आतल्या पदरापासून जालपटलाच्या (डोळ्यातील प्रकाशग्राही ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असणारा कोशिकांचा समूह व दृक्तंत्रिकेचा म्हणजे मेंदूकडून डोळ्याकडे येणाऱ्या मुख्य तंत्रिकेचा शेवटचा भाग यांचा मिळून बनलेल्या भागाच्या) मुख्य घटकांचा विकास होतो. अक्षिचषकात विकसित होणारे तंत्रिका तंतू मागे जाऊन मस्तिकात प्रवेश करतात. अक्षिचषकाच्या बाहेरच्या पदरापासून एककोशिकी रंजकयुक्त अधिस्तर (एका शेजारी एक रचलेल्या, रंगीत द्रव्य असलेल्या कोशिकांचा एकपदरी थर) तयार होतो व तो पदर तसाच राहतो. म्हणजेच संपूर्ण वाढीनंतरही जालपटलाचा रंजक थर तोच असतो. चषकाच्या अग्रवर्ती काठापासून लोमशकाय (केसल पिंड) आणि कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेले डोळ्यातील रंगद्रव्ययुक्त वर्तुळाकार पटल) यांचा विकास होतो.
अक्षिवृंतकाच्या पुढील भागाजवळ असलेल्या भ्रूणबाह्यस्तरापासून काचपुटक (ज्यापासून काच किंवा भिंग तयार होते तो भाग) बनतो. काचपुटकाच्या पश्चभित्तीजवळील कोशिकांपासून काच तंतू तयार होतात व अग्रभित्तीजवळील कोशिकांपासून काचेवरील अधिस्तर बनतो. काचाभ रोहिणी (जालपटलाच्या प्रमुख रोहिणीचा पुढचा भाग) गर्भविवरातून अक्षिचषकात शिरते व पुढे सरकत जाऊन काचेच्या पश्चभागावर शाखित होते. या भागातील विकसित होणाऱ्या कोशिकांचे तात्पुरते पोषण या रोहिणीमुळे होते. पुढे ह्या रोहिणीची अपपुष्टी होऊन (पोषणाअभावी रोडावत जाऊन) ती दिसेनाशी होते.
नेत्रगोलाचा ४/५ भाग व्यापणारा गरासारखा पदार्थ असलेला पारदर्शक भाग म्हणजे सांद्रजलपिंड हा काच व अक्षिचषक यांच्या दरम्यान विकसित होतो. काच आणि जालपटल तयार करणारा चषकाचा पडदा एकमेकांपासून अलग होतात परंतु नाजूक जीवद्रव्य प्रवर्धांनी (जिवंत कोशिकेतील चैतन्यमय द्रव्ययुक्त वाढींनी) जोडलेली राहतात. हे प्रवर्ध व जालपटलाच्या काही कोशिका मिळून बनलेल्या जाळीपासून सांद्रजलपिंड बनतो. काच ज्यापासून बनते त्या मध्यस्तराचा काही भाग सांद्रजलपिंडाच्या विकासात भाग घेत असल्यामुळे सांद्रजलपिंडाच्या विकासात भ्रूणीय बाह्यस्तर आणि मध्यस्तर दोन्ही अंशतः भाग घेतात.
श्वेतपटल (नेत्रगोलाचे बाहेरील टणक पांढरे आवरण) आणि वर्णपटल (नेत्रगोलाचे रक्तवाहिन्यायुक्त आवरण) भ्रूणमध्यस्तरापासून तयार होतात. लोमशकाय स्नायू मध्यस्तरापासून तयार होतात, परंतु कनीनिका स्नायू (छिद्र लहान किंवा मोठे करणारे) बाह्यस्तरापासून बनतात. त्वचा तयार होणाऱ्या दुमडलेल्या पडदेवजा भागापासून पापण्या विकसित होतात. त्या गर्भाच्या तिसऱ्या महिन्याच्या मध्यास स्वच्छमंडलासमोर (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागासमोर) वाढून एकमेकींस भिडतात आणि भिडलेल्या अवस्थेतच सहाव्या महिन्याच्या शेवटापर्यंत राहतात.
रचना : (पहा : चित्रपट ४९). चेहऱ्यावरील डोळ्याच्या खाचेत (अक्षिकोटरात) नेत्रगोल, त्याला रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या, तंत्रिका, नेत्रगोलाची हालचाल करणारे स्नायू व काही मेदोतके (स्निग्ध पदार्थयुक्त ऊतके) एवढे भाग असतात. डोळ्याच्या पुढील भागात उघडझाप करणाऱ्या पापण्या व अश्रुस्त्राव यंत्रणा असते [⟶ अश्रु ग्रंथि].
पापण्या (अक्षिपक्ष्म) ह्या उघड-झाप करणारे डोळ्यांचे दरवाजे आहेत. प्रत्येक पापणीत तंतुमय घट्ट ऊतकाचे पातळ पट्ट असतात. या पट्टाला वर्त्मपट्ट म्हणतात. या पट्टांमुळे पापण्यांना टणकपणा व अर्धवर्तुळाकार येतो. वरच्या पापणीतील हा पट्ट मोठा असतो व मध्यभागी त्याची रुंदी १० मिमी. भरते. खालच्या पापणीतील पट्ट लहान असून रुंदी ५ मिमी. असते. पापण्यांच्या मोकळ्या कडांवर वाकलेले केस असून डोळे अर्धवट मिटले असता या केसांमुळे धुरळा, कचरा वगैरे डोळ्यांत जाऊ शकत नाही. पापणीची त्वचा फार पातळ असून तीत पुष्कळ स्पर्शग्राहके असतात. त्यामुळे पापण्यांना तीव्र स्पर्शज्ञान होते. पापणीच्या आतील भागावर नेत्रश्लेष्मकला (नेत्रगोलाच्या पुढील भागावरील बुळबुळीत पातळ पटल) असते. वर्त्मपट्ट आणि ही श्लेष्मकला यांमध्ये लांबट आकाराच्या पुष्कळ ग्रंथी असतात. त्यांना वर्त्म ग्रंथी म्हणतात. या ग्रंथींचा स्निग्ध स्त्राव पापणीच्या कडा ओलसर ठेवून अश्रुद्रव्य गालावर ओघळू देत नाही. पापण्यांच्या भोवती संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकामध्ये परिनेत्र स्नायू आणि पापणी उचलून धरणारा स्नायू असतात. त्यांच्यामुळे पापण्यांची हालचाल होते. या स्नायूंना आननतंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या सातव्या तंत्रिकेच्या) शाखांपासून प्रेरणा मिळते.
अक्षिकोटर : (चेहऱ्यावरील डोळ्याची हाडांनी बनलेली खाच). हे सात अस्थींचे बनलेले असून त्याचा चेहऱ्यावरील अग्रभाग रुंद आणि काहीसा चतुर्भुजाकार (चौकोनी) असतो. कोटराचा मागील भाग निमुळता असून त्याचा एकंदर आकार शंकूसारखा असतो. मागील भाग शरीराच्या मध्यरेषेकडे कललेला असतो. उजव्या आणि डाव्या कोटरांच्या आतील भित्ती जवळजवळ समांतर असतात. बाहेरील बाजू तिरप्या असतात.
नेत्रगोल : डोळ्याचा दृष्टिज्ञान देणारा, चेंडूच्या आकाराचा अक्षिकोटरातील हा भाग तीन थरांचा बनलेला असतो. संबंध नेत्रगोल कोटरातील मेदामध्ये ठेवलेला असून मेद आणि नेत्रगोल यांमध्ये अवकाशी ऊतकाचे (कोशिकांची सैलसर रचना असणाऱ्या व आधार देणाऱ्या ऊतकाचे) आवरण असते. या तीन थरांना अनुक्रमे बाहेरून आत (अ) श्वेतपटल, (आ) वर्णपटल आणि (इ) जालपटल म्हणतात.
(अ) श्वेतपटल : हा सर्वांत बाहेरचा आवरणात्मक थर असून त्यामुळे नेत्रगोलाचा आकार कायम राहण्यास मदत होते व नेत्रातील इतर भागांचे संरक्षणही होते. म्हणून या थराला ‘संरक्षक’ किंवा ‘आधारक’ बाह्य कवच असेही म्हणतात. या थराचा मागील पाचषष्ठांश भाग अपारदर्शक असतो व पुढचा एकषष्ठांश भाग पारदर्शक असतो, या पुढच्या भागास स्वच्छमंडल म्हणतात. श्वेवतपटल शुभ्र तंतूंचे दाट विणलेले असून त्यात पुष्कळ लवचिक तंतू असतात. श्वेतपटलाच्या पुढच्या भागावर नेत्रश्लेष्मकलेचे आच्छादन असते. या आच्छादनाचा स्वच्छमंडलावरील भाग पारदर्शक असतो. पापण्यांच्या आतील बाजूवरही ते पसरलेले असते. पापणी आणि नेत्रगोल यांमधील खोलगट भागास नेत्रश्लेष्म-कोटर म्हणतात.
स्वच्छमंडल नावाप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शक असते. त्याचा पृष्ठभाग अतिशय गुळगुळीत व तेजस्वी असतो. या स्वच्छमंडलातूनच प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो म्हणून त्याला ‘प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. स्वच्छमंडल चार थरांचे बनलेले असते. पुढून मागे (१) अधिस्तर पटल, (२) स्वच्छमंडलाचा प्रमुख भाग (तंतुमय, टणक, न दबणारा आणि पारदर्शक), (३) पश्च प्रत्यास्थ लवचिक) पटल (वरील भागाच्या मागे असलेला पापुद्र्यासारखा ऊतक थर) किंवा दीसेमे पटल (झां दीसेमे या फ्रेंच शारीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे पटल) आणि (४) पूर्वागारातील (स्वच्छमंडल व कनीनिका यांमधील पोकळीतील मध्यस्तरजनित अधिस्तर, असे हे थर असतात.
(१) अधिस्तर पटल हे बहुस्तरीय असून ते नेत्रश्लेष्मकलेचाच पुढील अखंडित भाग असते. अधिस्तर पटल आणि स्वच्छमंडलाचा प्रमुख भाग यांच्या दरम्यानच्या एककोशिकीय पातळ पटलास बोमन पटल (विल्यम बोमन या इंग्लिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावावरून) म्हणतात.
(२) स्वच्छमंडलाचा प्रमुख भाग जवळजवळ साठ चपट्या, एकावर एक रचलेल्या विशिष्ट संयोजी ऊतक कोशिकांचा बनलेला असतो.
(३) पश्च प्रत्यास्थ पटल किंवा दीसेमे पटल हे विरस व लवचिक पटल असून त्याच्या मागील पृष्ठभागावर अंतःस्तर असतो. दीसेमे पटल व हा अंतःस्तर दोन्ही वर्णपटलांशी अखंडित असल्यामुळे रोगावस्थेत हा सबंध रोगनिदानाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरतो. नेत्रश्लेष्मकलेचे विकार अधिस्तर पटलावर पोहोचून वर्णपटलापर्यंत जाण्याचा संभव असतो.
स्वच्छमंडल हे श्वेतपटलाच्या पुढील भागात घड्याळाच्या काचेप्रमाणे बसविलेले असून त्याचा परिघ श्वेतपटलाने व्याप्त असतो. या दोन्हींच्या संधिस्थानाला सीमावलय म्हणतात. स्वच्छमंडलाला मुबलक तंत्रिका पुरवठा असून त्या त्रिमूल तंत्रिकेच्या (मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या तंत्रिकेच्या) उपशाखा असतात. स्वच्छमंडलामध्ये रक्तवाहिन्या नसतात. रक्तवाहिन्या सीमावलयापर्यंतच येतात व तेथे त्यांच्यापासून निघालेल्या अतिसूक्ष्म केशवाहिन्यांचे (बारीक रक्तवाहिन्यांचे) तोरण बनलेले असते. या परिघीय तोरणापासून निघणाऱ्या द्रवापासून आणि नेत्रजलापासून स्वच्छमंडलाचे पोषण होते.
(आ) वर्णपटल : नेत्रगोलाच्या मधल्या थराला वर्णपटल म्हणतात. तो तीन खंडांचा बनलेला असून मागून पुढे त्यांना अनुक्रमे मध्यपटल, लोमशकाय आणि कनीनिका म्हणतात.
मध्यपटल हा पुष्कळ रक्तवाहिन्या असलेला अगदी पातळ पडदेवजा भाग नेत्रगोलाचा मागचा पाचषष्ठांश भाग व्यापतो. श्वेतपटलाला हे अगदी चिकटलेले असूनही दोहोंमध्ये किंचित जागा असते. मध्यपटलाच्या आतील बाजूवर जे विरळ व लवचिक आच्छादन असते त्याला ब्रुख किंवा हेन्ले पत्र (जर्मन शारीरविज्ञ कार्ल ब्रुख आणि फ्रीड्रिख हेन्ले यांच्या नावांवरून) म्हणतात. हे आच्छादन जालपटलाला चिकटलेले असते. मध्यपटलाची मागची बाजू पुढच्या बाजूपेक्षा जाड असते कारण पुढील बाजूच्या केशवाहिन्यांपेक्षा मागील रक्तवाहिन्या मध्यम व मोठ्या आकारमानाच्या असतात. या सर्व रक्तवाहिन्यांना संयोजी ऊतकाचा आधार असतो. या ऊतकातील कोशिका रंगद्रव्ययुक्त असतात व संबंध मध्यपटल गर्द तपकिरी वा चॉकलेटी रंगाचे दिसते. मध्यपटलाला त्रिमूल तंत्रिकेच्या शाखांचा पुरवठा असून अनुकंपी तंत्रिकेच्या [⟶ तंत्रिका तंत्र] शाखांमुळे त्यातील रक्तवाहिन्यांचे नियंत्रण होते. मध्यपटलाचा मागील भेदून दृक्तंत्रिका प्रवेश करते.
लोमशकाय हा वर्णपटलाचा मध्यपटल व कनीनिका यांच्यामधील काहीसा जाड भाग असतो. तो रक्तवाहिन्या व रेखांशिक (नेत्रगोलावर असलेली रेखांश सदृश मांडणी) आणि वर्तुळाकार स्नायूंचा बनलेला असतो. या स्नायूंना मिळून लोमश स्नायू म्हणतात. नेत्र-अनुकूलन यंत्रेणेतील नेत्ररचनेत विशेषकरून काचेच्या बहिर्गोलतेत (जवळ आणि दूर बघताना होणारे बदल घडविण्याचे) महत्त्वाचे कार्य हे स्नायू करतात. डोळ्याच्या आडव्या छेदात लोमशकाय समभुज त्रिकोणी दिसतो. लोमशकाय मुख्यतः अरेखित (अनैच्छिक) लोमश स्नायूंचा बनलेला असतो. या स्नायूचे दोन्ही भाग एकाच ठिकाणी उगम पावलेले असतात. लोमशकायाचा काही भाग कनीनिका-तंतूंचा बनलेला असून हे तंतू कनीनिकेच्या मुळाशी बाहुली विस्तार (प्रसारण) स्नायूशी निगडित असतात.
लोमशकायाचे आतील पृष्ठ दोन भागांचे असून त्यांपैकी अग्रपृष्ठ चुणीदार आणि पश्चपृष्ठ सपाट व गुळगुळीत असते. त्यांना अनुक्रमे चुणीदार आणि सपाट पृष्ठ अथवा पदर म्हणतात. या चुण्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पहिल्यास प्रत्येक चुणी अनेक लहान लहान चुण्यांनी बनलेली दिसते. या छोट्या चुण्यांना लोमश प्रवर्धे असे नाव आहे. ही प्रवर्धे सूक्ष्मरक्तवाहिन्यांचे गुच्छ असतात. हे गुच्छ दोन अधिस्तर पटलांनी आच्छादिलेले असून ते जालपटलाचे घटक असतात. या दोन पटलांपैकी बाहेरचे कनीनिकेचे अग्रपटल असून ते चपट्या कोशिकांचे बनलेले असते. आतले घनाकार कोशिकांचे असून ते रंगद्रव्ययुक्त असते.
लोमशकाय मागे जालपटलाच्या दंतुरिक मुखापर्यंत असून तेथूनच जालपटलाची सुरुवात होते.
वर्णपटलाच्या सर्वांत पुढच्या खंडाला कनीनिका असे म्हणतात. हा एक वर्तुळाकार पडजेवजा भाग असून त्याच्या मध्यभागी असलेल्या गोल छिद्राला बाहुली असे म्हणतात. या बाहुलीच्या आकुंचन-प्रसरणामुळे डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे नियंत्रण होते. कनीनिकेच्या मागे बाहुलीला लागून स्फटिकमय काच भिंग असते. तिला नेत्रस्फटिक असेही म्हणतात.
पुढील बाजूस स्वच्छमंडल व मागील बाजूस असलेली काच या दरम्यानची पोकळी कनीनिकेमुळे दोन भागांत विभागली जाते. स्वच्छमंडल आणि कनिनिका यांमधील पोकळीला पूर्वागार किंवा पुरस्संपुट म्हणतात आणि त्यात नेत्रजल असते. पूर्वागाराचा परिघाकडील भाग अगदी निमुळता होत गेलेला असून तेथे कनीनिका व स्वच्छमंडल एकमेकांस टेकलेली असतात. या ठिकाणी श्वेतपटलाच्या आतल्या भागावरील खाचेत वर्तुळाकार नीलाकोटर (अशुद्ध रक्तवाहिनीचा फुगीर भाग) असते. या कोटराला श्लेम नाल (फ्रीड्रिख एस्. श्लेम या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून) असेही म्हणतात. नेत्रजलाचे निर्गमन याच नालाच्या द्वारे होत असल्यामुळे त्याला महत्त्व आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये पूर्वागाराची खोली मध्यभागी २·५ मिमी. असते. अगदी लहान मुलात तसेच वृद्धावस्थेत ती कमी असल्यामुळे पूर्वागार उथळ असते.
कनीनिका आणि काचेची निलंबी बंध यांमधील पोकळीस पश्चागार म्हणतात व त्यातही नेत्रजल असते. गार्भाच्या सातव्या महिन्यापर्यंत पूर्वागार व पश्चागार एका पातळ पडद्याने विभक्त असतात. त्यानंतर ते एकमेकांशी बाहुलीच्या छिद्रातून जोडले जातात.
कनीनिका व लोमशकाय यांचे संधिस्थान अतिशय विरळ असल्यामुळे कनीनिकेला इजा झाल्यास ती याठिकाणी फाटते. अथवा तुटते. कनीनिका रक्तवाहिन्या आणि अरेखित स्नायूंची बनलेली असून तिला संयोजी ऊचकाचा आधार असतो. या ऊतकातील कोशिकांमध्ये रंगद्रव्य भरपूर असल्यामुळे बाहुलीचा रंग पिंगट वा काळा दिसतो. घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींमध्ये हे रंगद्रव्य अगदी कमी असते. कनीनिकेमध्ये आऱ्याच्या आकाराच्या रक्तवाहिन्या पुष्कळ असून त्यांच्या लोमशकायाजवळच्या भागात पुष्कळ पोकळ जागा (गुहिका) असतात. या गुहिका मार्गानेच कनीनिकेमधील ऊतकातील जलाचे पूर्वागारातील नेत्रजलाशी दळणवळण चालू असते व त्यामुळे या द्रवांची अदलाबदल होऊ शकते. संयोजी ऊतकाच्या पश्चपृष्ठावर रंगद्रव्ययुक्त कोशिकांचे दोन थर असतात आणि ते जालपटलापासून विकसित झालेले असतात व ते बाहुलीच्या कडेवर अखंड असतात. या थरांपैकी पुढचा थर (अग्रथर) सपाट कोशिकांचा असून मागचा (पश्चथर) घनाकार कोशिकांचा असतो.
त्रिमूल तंत्रिकेच्या संवेदनावाहक तंतूंनी कनीनिका संपन्न असल्यामुळे कनीनिकाशोथामध्ये (कनीनिकेला दाहयुक्त सूज आल्यास) फार वेदना होतात. बाहुलीच्या आकुंचक स्नायूंना अक्षिप्रेरणी तंत्रिकांचा पुरवठा असून प्रसारक स्नायूंना मानेतील अनुकंपी तंत्रिका शाखांचा पुरवठा असतो.
(इ) जालपटल : नेत्रगोलाच्या आतल्या थराला जालपटल म्हणतात. जालपटलाचा विस्तार वर्णपटलाच्या मध्यपटलाएवढाच असतो. जालपटल दोन स्तरांचे बनलेले असते. बाह्यस्तर रंगद्रव्ययुक्त षट्कोणी कोशिकांचा असून आतील स्तर तंत्रिका ऊतक स्तर किंवा समुचित जालपटल म्हणून ओळखला जातो.
संबंध जालपटल हा एक नाजूक तंत्रकाजन्य पडदा असून त्याचा बाह्य पृष्ठभाग मध्यपटलाशी संलग्न असतो. आतील पृष्ठभाग सांद्रजलाच्या साठ्याच्या काचाभ पटलांशी संलग्न असतो. जालपटल मागच्या बाजूस दृक्तंत्रिकेशी सलग असते आणि पुढच्या बाजूस, लोमशकायाच्या मागील बाजूस, त्याची झालरीवजा कडा बनते. तिला दंतुरित मुख म्हणतात. या ठिकाणी जालपटलातील तंत्रिका ऊतक संपुष्टात येते. जालपटलाचा जो पुढचा भाग लोमशकाय आणि कनीनिकेशी संलग्न असतो, त्याला अनुक्रमे लोमशकायी जालपटल व कनीनिका जालपटल अशी नावे आहेत. हा भाग रंगद्रव्ययुक्त कोशिकांचा असतो. दृक्तंत्रिका ज्या ठिकाणी जालपटलास भेदून आत शिरते त्यास दृग्बिंब म्हणतात. दृग्बिंबापासून दंतुरित मुखापर्यंतचा जालपटलाचा भाग दृक्-जालपटल म्हणून ओळखला जातो.
जालपटलाच्या मागील भागाच्या मध्यबिंदूपासून जवळच जो लंबवर्तुळाकार पिवळसर भाग दिसतो, त्याला पीतबिंदू म्हणतात. या ठिकाणी दृष्टिसंवेदना अतितीव्र असते. पीतबिंदूच्या मध्यभागी जो खोलगट भाग दिसतो त्याला मध्य गर्तिका म्हणतात. या ठिकाणी जालपटल अगदी पातळ असल्यामुळे त्यामागील मध्यपटलाचा काळपट रंग स्पष्ट दिसतो. पीतबिंदूपासून नाकाच्या बाजूकडे ३ मिमी. अंतरावर दृग्बिंब असते. त्याची कडा इतर भागापेक्षा थोडी उंच दिसते आणि त्याचा व्यास १·५ मिमी. असतो. या ठिकाणी शंकु-शलाका (शंकूच्या व दंडगोलाच्या आकाराच्या तंत्रिका कोशिका) अजिबात नसल्यामुळे दृष्टिसंवेदना नसते व म्हणून त्यास अंधबिंदू असेही म्हणतात. दृग्बिंबाच्या मध्यबिंदूमधून जालपटलाची मध्यवर्ती रोहिणी व नीला प्रवेश करतात. नेत्रपरीक्षकाने तपासणी केल्यास दृग्बिंब त्यावरील कोशवाहिन्यांमुळे गुलाबी रंगाचे दिसते. जालपटलाच्या इतर भागापेक्षा ते फिक्कट दिसते. रोगामुळे दृक्तंत्रिकेची अपपुष्टी झाल्यास अशा तपासणीत दृग्बिंब पांढरे दिसते कारण त्यावरील केशवाहिन्या नाहीशा झालेल्या असतात.
समुचित जालपटलातील तंत्रिका ऊतकाला अ-तंत्रिकाजन्य आधारतंतूंच्या थराचा आधार असतो. समुचित जालपटलामध्ये एकूण सात थर असून बाहेरून आत अशी त्यांची पुढीलप्रमाणे रचना असते : (१) शंकु-शलाका थर, (२) बाह्य केंद्रक थर, (३) बाह्य जालाकार थर, (४) अंतर केंद्रक थर, (५) अंतर जालाकार थर, (६) गंडकोशिका थर आणि (७) दृक्स्तर किंवा तंत्रिका तंतुमय थर.
समुचित जालपटलामध्ये तीन प्रकारची तंत्रिका एकके असतात आणि त्यांना शंकु-शलाका, द्विध्रुवी (दोन प्रवर्ध असलेली) कोशिका व गंडकोशिका म्हणतात. प्रकाशकिरण डोळ्यांत शिरल्यानंतर प्रथम दृक्स्तरापर्यंत पोहोचतात व नंतर सर्व थरांतून जाऊन शेवटी शंकु-शलाका थरातील कोशिकांना पोहोचताच दृष्टिसंवेदना उत्पन्न होते.
वरील सर्व थर संयोजी ऊतकावर आधारलेले असतात. या ऊतकातील अधिक विकसित उभ्या तंतूंना म्यूलर तंतू (हाइन्रिख म्यूलर या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. या तंतूंचे प्रमुख कार्य म्हणजे तंत्रिका कोशिकांना आधार देऊन त्यांना पोषक द्रव्ये पोहोचविण्याचे असते. शंकु-शलाका थर व बाह्य केंद्रक थर यांच्या दरम्यान असलेल्या अतिपातळ कलेला बाह्य मर्यादा कला (आ. १–८) व दृक्स्तराच्या आत असलेल्या कलेला अंतर्मर्यादा कला (आ. १–९) म्हणतात. दृष्टिसंवेदना उत्पन्न होण्यापूर्वी प्रकाशकिरण जालपटलाच्या सर्व थरांतून पलीकडे जाणे आवश्यक असते. ही रचना सकृत्दर्शनी विचित्र वाटते परंतु अशा रचनेमुळे शंकु-शलाका हा प्रकाशाभेद्य (प्रकाशाला अभेद्य) अशा रंगद्रव्ययुक्त पटलाला (आ. १–१०) लागून असल्यामुळे त्या स्तराला रक्तपुरवठा करणाऱ्या केशवाहिन्या शंकु-शलाका थरातील कोशिकांना पुरवठा करून त्यांना अधिक कार्यक्षम बनवितात.
समुचित जालपटलातील तंत्रिका स्तरातील तंतू (अक्षप्रवर्ध) दृग्बिंबात शिरतात. हे सर्व तंतू श्वेतपटलाच्या नलिकाकार भागातून बाहेर पडतात. या ठिकाणी म्हणजे नेत्रगोलाच्या पश्चभागी संयोजी ऊतकाचा जो जाळीदार भाग असतो, त्याला श्वेतपटलाचे सुषिर पत्र म्हणतात. या जाळीमधून दृक्तंत्रिका तंतू बाहेर पडून त्यांची दृक्तंत्रिका बनून ती मस्तिष्काकडे जाते. नेत्रगोलातून बाहेर पडल्यावर या तंत्रिका तंतूंवर मज्जावरणाचा (मायेलीन नावाच्या मेदसदृश पदार्थाच्या आवरणाचा) एक थर दिसून येतो.
काच : डोळ्यात शिरणाऱ्या प्रकाशकिरणांचे योग्य असे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना होणारा दिशाबदल) होण्याकरिता जी यंत्रणा असते, तीमधील काच हा महत्त्वाचा भाग आहे. ती दोन्ही बाजूंनी बहिर्गोल म्हणजे फुगलेल्या पुरीसारखी असते. तिचा व्यास ९ ते १० मिमी. असून अग्रपश्च जाडी मध्यभागी ४ ते ५ मिमी. असते. मागच्या बाजूची बहिर्गोलता पुढच्या बाजूपेक्षा अधिक असते.
काच कनीनिकेच्या मागे अगदी चिकटून असते. काचेची मागील बाजू सांद्रजलपिंडाच्या पुढे असते. काच ज्या पारदर्शक लवचिक आवरणात असते, त्याला काच-कोष असे म्हणतात. ती आहे त्या ठिकाणीच रहावी म्हणून ज्या आधारबंधांनी बांधलेली असते, त्यांना निलंबी बंध किंवा त्सिन मंडल (योहान त्सिन या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून) म्हणतात. या बंधाचे धागे काच-कोषावर काचेच्या पुढच्या व मागच्या दोन्ही भागांवर चिकटलेले असतात. लोमशकाय स्नायूच्या आकुंचनामुळे हे बंध सैल पडून काचेची बहिर्गोलता अधिक वाढविण्यास मदत होते. त्यामुळे प्रकाशकिरणांच्या प्रणमन यंत्रणेतील, क्षणाक्षणाला आकार बदलू शकणारा काच हा एकच भाग, योग्य अशी दृष्टि-तीक्ष्णता ठेवण्यास मदत करतो.
काचेचा मध्यवर्ती भाग इतर भागांपेक्षा अधिक टणक असून त्याला काच-केंद्रक म्हणतात. केंद्रकाबाहेरील मऊ भागास काच-बाह्यक म्हणतात. डोळ्याच्या इतर भागाप्रमाणेच काचही एक सजीव भाग असून त्याला इतर भागांप्रमाणेच पोषणद्रव्यांची गरज असते व थोडीफार चयापचयात्मक (भौतिक-रासायनिक घडामोडींची) क्रियाही तिथे होत असते. रक्तवाहिन्यांमुळे पारदर्शकतेवर परिणाम होईल म्हणून काचेला पोषणद्रव्ये तिच्या आजूबाजूच्या द्रव्यातून नेत्रजल व सांद्रजल यांमधून मिळतात. ही द्रव्ये काच-कोषातून आत शिरावी लागतात व त्यामुळे वरच्या थरातील कोशिकांना भरपूर प्रमाणात मिळतात. नव्या कोशिका जशा जुन्या होतात तसतशा त्या केंद्रकाकडे दाबल्या जातात. त्यांचा मऊपणा नाहीसा होऊन त्यांचाच काच-केंद्रक बनतो.
सांद्रजलपिंड : काचेच्या मागे असलेल्या नेत्रगोलाचा चारपंचमांश भाग व्यापणाऱ्या जेलीसारखा द्रव असलेल्या भागाला सांद्रजलपिंड म्हणतात व द्रवाला सांद्रजल म्हणतात. सांद्रजल रंगहीन, पारदर्शक असून ९९ प्रतिशत पाणी, म्युकोप्रथिन (व्हिट्रिइन), काही लवणे व हायलुरॉनिक अम्ल मिळून बनलेले असते. सांद्रजलपिंडाचा परिघीय भाग इतर भागापेक्षा अधिक घनता असलेला असून या भागाला सांद्रपिंड-पटल म्हणतात. काचेची मागची बाजू सांद्रजलपिंडाच्या ज्या खोलगट भागाशी संलग्न असते, याला काचाभ खाच म्हणतात. या खाचेच्या मध्यवर्ती भागापासून सांद्रजलपिंडातून थेट मागे दृग्बिंबापर्यंत जाणाऱ्या पोकळ नलिकेला काचाभ नलिका म्हणतात. गर्भावस्थेत या नलिकेत काचाभ रोहिणी असते. जन्मापूर्वी ही रोहिणी नाहीशी होऊन फक्त पोकळीच उरते.
सांद्रजलपिंडाला रक्तपुरवठा नसतो. त्याचे पोषण जालपटल आणि लोमशकाय यांच्या रक्तवाहिन्यांतर्फे होते. नेत्रगोलाचा आकार कायम ठेवणे, श्वेतपटलाचा ताठपणा टिकवणे, तसेच काचेचे पोषण करणे ही कार्ये सांद्रजलपिंड करतो.
नेत्रगोलाचा रक्तपुरवठा : नेत्रगोलाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची रचना विशिष्ट प्रकारची असून नेत्रविकारांचे यथार्थ ज्ञान होण्याच्या दृष्टीने तिचे फार महत्त्व आहे.
अंतर्ग्रीवा (मानेतील दोन प्रमुख रोहिण्यांपैकी आतील बाजूस असलेल्या) रोहिणीच्या अक्षिरोहिणी शाखेपासून सर्व नेत्रगोलाला रक्ताचा पुरवठा होतो. अक्षिरोहिणीच्या उपशाखांचा एकमेकींशी फारसा संबंध नसल्यामुळे त्या ‘अंतिम’ रोहिण्या (वाहिनीमीलन न होणाऱ्या) आहेत. अशा प्रकारच्या रोहिण्यांनी होणारा रक्तपुरवठा बंद पडल्यास पुरवठा होणाऱ्या भागाची अपपुष्टी होणे अपरिहार्य असते. नेत्रगोलातील अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या नीलांचा मात्र एकमेकींशी फार संबंध असतो.
जालपटलाला रक्तपुरवठा करणाऱ्या अक्षिरोहिणी शाखेला मध्यवर्ती जालपटल रोहिणी म्हणतात. ती रोहिणी नेत्रगोलाच्या मागे सु. १५ ते २९ मिमी. अंतरावर दृक्तंत्रिकेमध्ये शिरून दृग्बिंबाशी पोहोचताच तिच्या दोन मुख्य उपशाखा होतात. या शाखांच्या उपशाखांद्वारे सर्व जालपटलाला रक्तपुरवठा केला जातो. या उपशाखा अंतिम रोहिण्याच असतात. त्यामुळे मध्यवर्ती जालपटल रोहिणी ही मुख्य रोहिणीच एक अंतिम रोहिणी असते. काही कारणामुळे या रोहिणीतील रक्तप्रवाह बंद पडला, तर संबंध जालपटलाची अपपुष्टी होऊन कायमचे अंधत्व येते. जालपटलातील नील या रोहिणी उपशाखांच्या बरोबर नसतात. दृग्बिंबापाशी दोन्ही बरोबर येतात व तेथून पुढे त्या रोहिणीबरोबरच राहतात.
लोमशरोहिण्यांपासून वर्णपटलास रक्तपुरवठा होतो. या अक्षिरोहिणीच्या उपशाखा असून त्यांचे तीन गट असतात. त्यांच्यापासून श्वेतपटल, सीमावलय क्षेत्र, नेत्रश्लेष्मकला आणि वर्णपटलाचा अग्रभाग यांना रक्तपुरवठा होतो. नेत्रगोलाची हालचाल करणाऱ्या स्नायूंना अक्षिरोहिणीच्या इतर उपशाखांपासून रक्तपुरवठा होतो.
नेत्रगोलाचे स्नायू : भुवया, पापण्या इ. डोळ्याच्या उपांगांमध्ये नेत्रगोलाची हालचाल करणाऱ्या स्नायूंना अधिक महत्त्व आहे. नेत्रगोलाची हालचाल करणारे सहा व वरच्या पापणीची हालचाल करणारा एक मिळून प्रत्यके बाजूच्या या ऐच्छिक स्नायूंना अक्षिकोटर स्नायू म्हणतात. ते सर्व बाहेर असल्यामुळे त्यांना बाह्यागत स्नायू असेही म्हणतात. याउलट नेत्रगोलांतर्गत असलेच्या लोमशकाय स्नायूला अंगभूत स्नायू म्हणतात. नेत्रगोलाच्या पृष्ठभागावर जोडलेल्या सहा स्नायूंना त्यांच्या आकारावरून व जोडलेल्या ठिकाणावरून पुढील नावे देण्यात आली आहेत : (१) ऊर्ध्व (वरचा) सरल स्नायू, (२) अधःस्थ (खालचा) सरल स्नायू, (3) बाह्य सरल स्नायू, (४) अंतःस्थ सरल स्नायू, (५) ऊर्ध्व तिरपा स्नायू व ( ६) अधःस्थ तिरपा स्नायू (चित्रपट ४९), हे सर्व स्नायू नेत्रगोलाच्या पृष्ठभागावर जोडलेले असून जोडीजोडीने कार्य करतात आणि एकमेकांशी सहकार्य करतात. नेत्रगोलाच्या परिभ्रमी हालचाली या स्नायूंमुळे होतात. ज्या वेळी वरचा आकुंचन पावतो त्याच वेळी त्याचा जोडीदार म्हणचे खालचा सैल पडतो. या क्रिया अगदी सम प्रमाणातच होतात म्हणजे आकुंचनामुळे वरचा जेवढा आखूड होतो तेवढाच खालचा लांब होतो. अशीच क्रिया बाह्य व अंतस्थ स्नायूंच्या बाबतीतही घडते. शरीरातील इतर ऐच्छिक स्नायूंपेक्षT अतिजलद क्रियाशील असेच हे स्नायू असतात.
नेत्रगोलाच्या हालचालीमुळे दोन गोष्टी साधल्या जातात : (१) डोके व शरीर हालत असताना परिसरावरील दृष्टी सारखी ठेवणे व (२) जरूर त्याच वस्तूची प्रतिमा जालपटलातील अतितीव्र संवेदना असलेल्या भागावर म्हणजे पीत बिंदूवर पडून ती तेथून हलू न देणे.
दोन्ही नेत्रगोलांची हालचाल नेहमी संयुग्मित (एकत्रितपणे होणारी) असते. नेत्रगोलाच्या स्नायूंवरील नियंत्रण बिघडल्यास हालचाली असंयुग्मित होतात. तिरळेपणT, नेत्रदोल (नेत्रगोलांची लयबद्ध अनैच्छिक आंदोलने) इ. लक्षणे नेत्रगोलांच्या स्नायूंच्या हालचालीतील बिघाड दर्शवितात.
क्रियाविज्ञान : डोळ्यांचे काम सुरळीत होण्यासाठी डोळ्यांत जेथून प्रकाश प्रवेशतो तेथून जालपटलापर्यंतचे सर्व भाग पारदर्शक असावे लागतात. स्वच्छमंडल, नेत्रजल, काच व सांद्रजल ही सर्व पारदर्शक असतात. त्यांमधील दाबही योग्य प्रकारचा असला, तरच डोळ्यांची अTवरणे ताठ व ताणलेल्या स्थितीत राहतात. यांशिवाय या सर्व पारदर्शक साधनांची पृष्ठे एकमेकांसमोर ठराविक अंतरावरच असावी लागतात.
नेत्रजलाचे उत्पादन, निस्यंदन (गाळले जाण्याची क्रिया) आणि स्वरूप, तसेच डोळ्यातील अंतर्दाबाचे नियमन यांनाही डोळ्याच्या कार्यात महत्त्वाचे स्थान आहे.
नेत्रजलाचे उत्पादन, निस्यंदन आणि स्वरूप : नेत्रगोलाच्या पूर्वागार व पश्चागार यांमध्ये अभिसरणाऱ्या पाण्यासारख्या द्रवाला नेत्रजल म्हणतात. सांद्रजलपिंड व काच या दोन्हींना पोषणद्रव्ये नेत्रजलामार्फत मिळतात. नेत्रजलाचे उत्पादन निश्चितणे सांगता येत नाही. टेओडोर लाबर (१८४०–१९१७) या जर्मन नेत्रवैद्यांच्या मते रक्तातील द्रवांचे निस्यंदन होऊन ते तयार होत असावे. अलीकडील संशोधनानुसार ते निस्यंदन आणि स्त्रवण अशा दोन्ही क्रियांनी मिळून बनत असावे. स्वच्छमंडल, लोमशकाय आणि कनीनिका नेत्रजलाच्या उत्पादनात भाग घेतात.
शरीरातील सर्व ऊतकांचे पोषण ऊतकांतील केशवाहिन्यांतून येणाऱ्या रक्तातील पोषकद्रव्यांच्या ऊतकांत होणाऱ्या निर्गमनाने होते. डोळ्यातील इतर ऊतकांना रक्तपुरवठ्याद्वारेच पोषणद्रव्ये मिळतात परंतु लोमशकायातील कोशिकांच्या विशेष रचनेमुळे केशवाहिन्यांतील सर्वच पदार्थांचे निर्गमन होत नाही. कलिल (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेले विशिष्ट प्रकारचे द्रव मिश्रण) पदार्थांचे रक्तद्रवातून निर्गमन रोखले जाते व इतर पदार्थ बाहेर जाऊ शकतात. या अर्धपार्य पटलाला (विद्रावक म्हणजे विरघळविणारा द्रव पार जाऊ देणारे पण विरघळलेला पदार्थ पार जाऊ न देणाऱ्या पटलाला) रूधिर जलावरोधस्थान असे म्हणतात. हे पटल जालपटलातील केशवाहिन्या भित्तीत आणि लोमशकाय परिसरात असते. म्हणून नेत्रजलात रक्तद्रवापेक्षा कमी प्रथिने परंतु अधिक पाणी असते. रक्तद्रवापेक्षा ग्लुकोज, ॲमिनो अम्ले, यूरिया यांचे प्रमाण कमी असते व क्लोराइडे अधिक असतात. त्यामुळे ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड द्रव स्वरूपात असतात. दुग्धाम्लही (लॅक्टिक अम्लही) अधिक असते.
डोळ्यातील केशवाहिन्यांचीही अर्धपार्यता पारदर्शकतेकरिता आवश्यक असते. यामुळे स्थूल आकारमानाचे रेणू डोळ्यातील ऊतकात शिरू शकत नाहीत. याच कारणामुळे आर्सेनिक, पेनिसिलीन वगैरे औषधे रक्तातून डोळ्यात उतरत नाहीत. मेदाभ (चरबीसारखे) पदार्थ मात्र डोळ्याच्या ऊतकात प्रवेश करू शकतात. केशवाहिन्यांच्या पार्यतेवर परिणाम होऊन ती काही कारणांनी वाढल्यास स्थूल आकारमानाचे रेणूही बाहेर पडतात. त्यामुळे नेत्रजल अधिक प्रथिनयुक्त, दूषित व गढूळ बनते. या प्रकाराला प्लाविकाभ नेत्रजल म्हणतात. कनीनिकालोमश -शोथ आणि मध्यपटलशोथ या रोगांत हा प्रकार आढळतो.
नेत्रजलाचे अभिसरण चालू ठेवण्यासाठी व डोळ्याच्या अंतर्दाबाचे नियमन करण्यासाठी विशेष यंत्रणा असते. लोमशीय अधिस्तरातून नेत्रजलाचा स्त्राव होत असतो. या स्त्रावी क्रियेबद्दल अजून संपूर्ण ज्ञान झालेले नाही, तरी लवणयुक्त विद्राव व ॲस्कॉर्बिक अम्ल याच यंत्रणेमुळे पश्चागारातील नेत्रजलात उतरत असावीत. नेत्रजलाचे अभिसरण अतिजलद रीत्या होत असते. नेत्रजल एकसारखे तयार होत असल्यामुळे ते दोन्ही आगारांतून तितक्याच जलद रीतीने अवशोषिले जाणे भाग असते. दिवसातून कित्येक वेळा जुने नेत्रजल बदलून नवे तयार होते. काही शास्त्रज्ञांच्या मते नेत्रजलातील संपूर्ण पाणी दर तीन मिनिटांनी बदलून नवे तयार होते.
नेत्रजलाचे पुष्कळसे उत्पादन लोंमशीय विभागात होते. तेथून ते पश्चागारात जाते आणि पुढे बाहुलीच्या छिद्रातून बाहेर पडून पूर्वागारात येते. कनीनिकेच्या अग्रपृष्ठाकडून स्वच्छमंडलाच्या पश्चभागाकडे उष्णताजन्य प्रवाह वाहतो. कारण स्वच्छमंडलाचे तापमान कनीनिकेपेक्षा ७° से.ने कमी असते. नेत्रजलाचे अवशोषण अत्यल्प प्रमाणात काचाभ-नलिकेद्वारे मागे जाऊन दृक्तंत्रिका आच्छादनाद्वारे होते थोडेसे कनीनिकेच्या अग्रपृष्ठभागावरील खाचांतून होते आणि बरेचसे श्लेम नालामार्फत होते. श्वेतमंडलातील तिरक्या नीलांतील रक्तदाबामुळे डोळ्याच्या अंतर्दाबाचे नियमन होत असते. या नीलांच्या भित्ती दाबक्षम असल्यामुळे तेथील दाबापेक्षा डोळ्यातील अंतर्दाब वाढल्यास नीला आकुंचित होऊन त्यांमधील रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे डोळ्यातील अंतर्दाबाचे नियमन होते.
डोळ्यातील अंतर्दाब : डोळ्यातील केशवाहिन्यांमधील रक्तदाबाची पातळी, नेत्रजल उत्पादनाचे परिमाण व त्यांचे पूर्वागाराच्या परिघीय कोषातून होणारे निष्कासन (रक्त प्रवाहात परतणे, अवशोषण) यांमुळे डोळ्यातील अंतर्दाबाचे नियमन होते. डोळ्यातील प्राकृत (सर्वसाधारण) अंतर्दाब १५ ते २० मिमी. पाऱ्याइतका असतो. वैद्यकीय तपासणीच्या वेळी बंद डोळ्याच्या वरच्या पापणीवर दोन्ही हातांच्या आंगठ्याजवळील बोटांनी दाबून पाहून या अंतर्दाबाचा अंदाज बांधता येतो. श्वेतमंडल लवचिक असून डोळ्यातील अंतर्दाबामुळे ते ताणलेले असते. या श्वेतमंडलावर विशिष्ट वजनाचा भार ठेवल्यास अंतर्दाब मोजता येतो. त्याकरिता शीट्स (हायलमार शीट्स या नॉर्वेजियन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारा) दाबमापक वापरतात. हे उपकरण वापरून अंतर्दाबाची अचूक नोंद करता येते.
सार्वदेहिक रोहिणी रक्तदाब आणि डोळ्यातील अंतर्दाब यांचा निकटचा संबंध आहे. रोहिणी रक्तदाब वाढला, तर अंतर्दाबही वाढतो आणि कमी झाल्यास कमी होते. वर्णपटलातील रक्तवाहिन्यांमधील प्रवाह आणि रक्तदाब यांचा अंतर्दाबावर परिणाम होतो.
डोळ्याच्या प्राकृत अंतर्दाबावर तंत्रिका नियंत्रण असते. मेंदूच्या तळाशी विशिष्ट तंत्रिका केंद्र असून त्या केंद्रामुळे हे नियंत्रण होते. डोळ्याकडून या केंद्राकडे जाणारे अभिवाही तंत्रिका तंतू अनुकंपी असून मानेतील गुच्छिकांमार्गे (तंत्रिकांच्या पुंजांमार्गे) जातात. हे तंतू केशवाहिनीचे आकुंचन करणाऱ्या संवेदना नेतात. त्यामुळे केशवाहिनीतील रक्तदाब वाढतो. परिणामी अंतर्दाब कमी होतो कारण नेत्रजलाचे उत्पादन कमी होते. अपवाही (मेंदूकडून खाली जाणाऱ्या) तंत्रिका मार्गाबद्दल अजून निश्चित पुरावा मिळलेला नसला, तरी त्यांच्या क्रियेमुळे केशवाहिन्यांचे प्रसरण होऊन अधिक नेत्रजलोत्पादनामुळे अंतर्दाब वाढत असावा. हे तंतू त्रिमूल तंत्रिकेतून डोळ्यातील रक्तवाहिन्यांकडे जात असावेत. वरील यंत्रणेद्वारे डोळ्यातील अंतर्दाब प्राकृत राहत असला पाहिजे, असे मानतात.
दिवसाच्या चोवीस तासांत अंतर्दाबात ३ ते ५ मिमी. फरक पडतो. सकाळी तो सायंकाळपेक्षा अधिक असतो. बालवयापासून वृद्धावस्थेपर्यंत अंतर्दाब हळूहळू कमी होत जातो. डोळे मिटले म्हणजे अंतर्दाब १० मिमी. वाढतो.
डोळ्याच्या ⇨ काचबिंदू (किंवा श्यामहरित) रोगात (अंतर्दाब प्रमाणापेक्षा वाढून काच व इतर भागांवर अपकर्षकारक म्हणजे ऱ्हास होण्याचा दुष्परिणाम करणाऱ्या व अंधत्वास कारणीभूत होऊ शकणाऱ्या रोगात) अंतर्दाब पुष्कळच वाढतो.
ॲड्रेनॅलीन वर्गातील उत्तेजक औषधामुळे वाहिन्यांचे आकुंचन होते आणि नेत्रजलोत्पादन कमी होऊन अंतर्दाब कमी होतो. इसेरीन, पायलोकार्पिन वगैरे औषधांमुळे कनीनिकेचे आकुंचन होऊन पूर्वागारातील स्वच्छमंडल कोणामधील नेत्रजलाच्या निष्कासनाचे प्रमाण वाढून अंतर्दाब कमी होतो. याउलट ॲट्रोपीन या औषधामुळे कनीनिकेतील बाहुलीचे विस्फारण (मोठे होणे) होते व कोण बंद होऊन नेत्रजलाचे निष्कासन थांबते, परिणामी अंतर्दाब वाढतो. या कारणाकरिता काचबिंदू रोगात हे औषध वापरणे धोक्याचे असते. ज्या व्यक्तीमध्ये स्वच्छमंडल कोण अरुंद असतो, अशा व्यक्तीमध्ये ॲट्रोपीन वापरल्यास हा रोग उद्भवण्याचीच शक्यता असते.
दृष्टिविज्ञान : जालपटलावर प्रकाश पडला की, तेथील तंत्रिकाग्रांतील ग्राहके (शंकू व शलाका) उत्तेजित होऊन तेथे दृष्टिसंवेदना उत्पन्न होते. बाह्यसुष्टीतील वस्तूपासून निघणारे प्रकाशकिरण या ग्राहकावर पडले म्हणजे त्या वस्तूची उलटी प्रतिमा उत्पन्न होते. डोळ्यातील भागांच्या गुणामुळे त्या प्रकाशकिरणांचे प्रणमन होते व त्यामुळे त्यांचे केंद्रीभवन होते. जालपटलावर प्रकाशकिरण पडले म्हणजे तेथे रासायनिक व विद्युत् अशा दोन प्रकारांच्या प्रतिक्रिया होतात.
शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडले असता त्या रंगद्रव्याचे रासायनिक परिवर्तन होते. या रंगद्रव्याला दृग्नीलारुण किंवा जांभळे रंगद्रव्य (रोडॉप्सीन) म्हणतात. शलाकांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. जालपटलाच्या पीतबिंदूमधील मध्यगर्तिकेतील शंकूमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात, असे मानतात. अलीकडील संशोधनावरून यांपेक्षा अधिक प्रकारची प्रकाशग्राही रंगद्रव्ये असावीत, असे आढळले आहे. शंकूमधील रंगद्रव्याला दृग्जंबू (आयडोप्सीन) असे म्हणतात, परंतु त्याचे अस्तित्व ठामपणे सिद्ध झालेले नाही.
प्रकाशकिरणांमुळे दृग्नीलारुणाचे विघटन (घटक द्रव्ये वेगळे होणे) होते व त्यापासून रिटीनीन नावाचे पिवळे रंगद्रव्य व रंगहीन प्रथिन तयार होते. प्रकाशकिरणांच्या अभावी म्हणजे अंधारात रक्तातील अ जीवनसत्त्व व विघटनजन्य प्रथिन यांपासून पुन्हा दृग्नीलारुण तयार होते या प्रक्रियेला दृग्नीलारुण चक्र म्हणतात.
जालपटलातील या रासायनिक विक्रिया प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. अंधार-अनुकूलनाच्या वेळी (प्रकाशातून अंधारात गेल्यानंतर होणारे डोळ्यातील बदल उदा., बाहुली रंध्र मोठे होणे, जालपटलाची संवेदनक्षमता वाढणे वगैरे) दृग्नीलारुणातील वर दिलेले रासायनिक बदल महत्त्वाचे असतात. अ जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे या रासायनिक बदलाकरिता जरूर असणारे जीवनसत्त्व कमी पडल्यामुळे जो रातांधळेपणा येतो, त्यामागे अंधार-अनुकूलन दोष हे कारण असते.
प्रकाशकिरणामुळे डोळ्यामध्ये विद्युत् प्रतिक्रिया होतात. या प्रतिक्रियी सर्वस्वी जालपटलावर अवलंबून असतात आणि त्यांचे उत्पत्तिस्थान जालपटलच असावे व तेही मुख्यत्वे शंकु-शलाका थरातच असावे. हृदयाच्या विद्युत् प्रतिक्रिया विद्युत् हृद्-लेखाद्वारे (हृदयाच्या आकुंचन-प्रसरणामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत् प्रवाहाच्या आलेखाद्वारे) किंवा मेंदूच्या विद्युत् मस्तिष्कालेखाद्वारे (मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहांच्या आलेखाद्वारे) नोंदता येतातच तशाच जालपटलातीलही नोंदता येतात. या आलेखास विद्युत जालपटलालेख म्हणतात. आधुनिक उपकरणांच्या उपलब्धतेमुळे या विषयावर बरेच संशोधन होत आहे.
जालपटलातील विद्युत् स्थानीय परिवर्तनामुळे तेथील द्विध्रुवी कोशिकांद्वारे पुढे गंडकोशिकांमध्ये विद्युत् आंदोलन उत्पन्न होते. हे आंदोलन दृक्तंत्रिकेच्या शाखांच्या मार्गाने नेत्रगोलातून बाहेर पडून मेंदूतील दृष्टिकेंद्राकडे व जाते त्यामुळे दृष्टीची जाणीव होते. विद्युत् आंदोलनांची तीव्रता प्रकाशकिरणांच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
चाक्षुष संवेदना : प्रकाशकिरणांमुळे जालपटलावर होणाऱ्या संवेदनांना चाक्षुष संवेदना म्हणतात. या संवेदना तीन प्रकारच्या असतात : (१) प्रकाशबोधन, (२) रूपबोधन आणि (३) वर्णबोधन.
प्रकाशबोधन : प्रकाश त्याच्या तीव्रतेनुसार ओळखता येतो. जालपटलावर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता क्रमशः कमी करीत गेल्यास एक क्षण असा येतो की, त्या वेळी प्रकाश असा दिसतच नाही. त्याला प्रकाशाची लघुतम सीमा म्हणतात. ही सीमा कमीजास्त असण्याचा संभव असतो. प्रकाश तीव्रतेप्रमाणे ही सीमा कमीअधिक होऊ शकते. या प्रकाराला प्रकाशाचे अनुकूलन म्हणतात. बाहेरील तीव्र प्रकाशातून मंद प्रकाश असलेल्या जागी गेल्यावर काही वेळ तेथील वस्तू दिसत नाहीत. त्याचे कारण हे अनुकूलन होण्यास लागणारा वेळ हे होय. जालपटलाच्या परिघीय क्षेत्रापेक्षा मध्यगर्तिकेच्या ठिकाणी प्रकाशाची लघुतम सीमा बरीच अधिक असते.
प्रकाशाची लघुतम सीमा एकदा ठरविली म्हणजे मग प्रकाशाची तीव्रता क्रमशः वाढवीत गेले, तर असा एक क्षण येतो की, त्या वेळी प्रकाशाच्या तीव्रतेतील फरक सहज लक्षात येतो . या गोष्टीचा उपयोग प्रकाशमापक उपकरणामध्ये केला जातो. विशिष्ट क्षेत्रातील प्रकाशाच्या तीव्रतेतील फरक ओळखता यावे म्हणून ते वापरतात.
प्रकाशाची तीव्रता जेव्हा फार नसते तेव्हा शंकूपेक्षा शलाकाच अधिक कार्यक्षम असतात. म्हणून संध्याकाळी आपण शलाकांच्या मदतीने पाहू शकतो. यालाच सायंदृष्टी म्हणतात. स्वच्छ प्रकाशात पाहण्याचे कार्य शंकू करतात व त्याला दिवादृष्टी म्हणतात. वटवाघळासारख्या रात्री संचार करणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यात शंकू फारक थोडे किंवा अजिबात नसतात. खारीसारख्या दिवसा संचार करणाऱ्या प्राण्यात शलाका कमी किंवा मुळीच नसतात. मानवी डोळ्यात दोन्ही भरपूर प्रमाणात असतात.
रूपबोधन : बाह्य वस्तूंच्या आकाराच्या ज्ञानाला रूपबोधन असे म्हणतात. हे महत्त्वाचे कार्य शंकूंमुळेच होते. मध्यगर्तिकेत रूपबोधन अतितीव्र असते. याचे कारण त्या जागी शंकूंची संख्या अधिक असते. जसजसे मध्यगर्तिकेपासून परिघाकडे दूर जावे तसतसे रूपबोधन कमी होते कारण शंकूंची संख्या तेथे कमी होत जाते. या मध्यवर्ती दृष्टीलाच दृष्टी-तीव्रता म्हणतात. केवळ डोळ्यांनी बघून वस्तूचा आकार, घाट, रूपरेखा आणि परिसराचा बारीकसारीक तपशील रूपबोधनामुळे होतो.
रूपबोधन हे केवळ जालपटलाचेच कार्य नसून वस्तूंच्या स्पष्ट आकाराचे बरेचसे ज्ञान मेंदूच्या क्रियेवरही अवलंबून असते. डोळा एक प्रकारचे प्रकाशयंत्र असल्यामुळे प्रतिमेचा आकार व रेखीवपणा हे त्या यंत्राच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. प्रकाश तरंगांची लांबी आणि बाहुलीच्या छिद्राचे आकारमान यांमुळे प्रतिमेमध्ये अस्थिरता येते.
रूपबोधनात तीन प्रकारच्या शारीरिक प्रक्रिया असतात : (१) प्रकाशबोधन, (२) स्थानबोधन आणि (३) भेदबोधन. वस्तू व त्यांच्या भोवतीच्या परिसरातील जवळपास असलेल्या पदार्थांच्या आकारामुळे तुलनेने वस्तुंच्या रूपाची संज्ञा होऊ शकते. वस्तुच्या अवकाशातील स्थानाबद्दलचे ज्ञान म्हणजे स्थानबोधन होय. दोन दृश्य वस्तु एकमेकींपासून भिन्न आहेत हे ओळखण्याच्या क्षमतेला भेदबोधन म्हणतात. रूपबोधनाकरिता मेंदूच्या विशिष्ट भागातील केंद्रांचे कार्यही महत्त्वाचे असते.
वर्णबोधन : रंगांच्या वेगळेपणाचे ज्ञान ज्यामुळे होते त्या संज्ञेला वर्णबोधन म्हणतात. दिवादृष्टीतच वर्णबोधन होऊ शकते. रंगांचा वेगळेपणा ओळखण्याकरिता प्रकाश तीव्र वा मध्यम तीव्र असावाच लागतो. शंकूंच्या कार्यक्षमतेवर वर्णबोधन अवलंबून असते.
लाल, हिरवा व निळा या रंगांना प्राथमिक रंग म्हणतात. इतर सर्व रंग या तीन रंगांच्या कमीअधिक मिश्रणाने तयार होतात. या प्रत्येक रंगामुळे जालपटलातील शंकूंमध्ये विशिष्ट संवेदना उत्पन्न होतात आणि त्यांपासून त्या त्या रंगाची संज्ञा मेंदूमध्ये उत्पन्न होते. तिन्ही प्राथमिक रंगांचे वर्णबोधन जालपटलाच्या मध्यगर्तिका भागाशिवाय इतरत्र म्हणजे परिघीय भागातही होते.
दृष्टिक्षेत्र आणि द्विनेत्री दृष्टी : जालपचटलाच्या संवेदनाक्षम क्षेत्राचे बाह्य सृष्टीत उमटलेले प्रक्षेपण म्हणजे दृष्टिक्षेत्र, प्रत्येक डोळ्याचे स्वतंत्र दृष्टिक्षेत्र असते व त्यात डोळा न हलविता दिसू शकणाऱ्या परिसराचा समावेश असतो. मध्येरेषेत नाकाचा उंचवटा, वरच्या बाजूस भुवईचा उंचवटा दृष्टिक्षेत्र कमी करतात. दोन्ही डोळ्यांच्या मिळून बनणाऱ्या दृष्टिक्षेत्राला द्विनेत्री दृष्टिक्षेत्र म्हणतात.
दृष्टिक्षेत्रातील प्रत्येक वस्तूची प्रतिमा जालपटलावर उमटते. उजव्या बाजूच्या वस्तूंच्या प्रतिमा जालपटलाच्या डाव्या भागावर, डाव्या बाजूच्या उजव्या भागावर, वरच्या बाजूच्या खालाच्या भागावर आणि खालच्या वरच्या भागावर उमटतात. जालपटलाचा उजवा अर्धा भाग निकामी बनल्यास त्या डोळ्याच्या दृष्टिक्षेत्रातील डावा भाग नाहीसा होईल.
आपण जेव्हा दूरच्या वस्तूवर दृष्टी केंद्रित करतो तेव्हा त्या वस्तूच्या भोवती असलेल्या वस्तूंच्या प्रतिमाही जालपटलावर उमटतात, मात्र त्या अस्पष्ट दिसतात. दृष्टिक्षेत्रमापनाकरिता दृष्टिक्षेत्रमापक नावाची उपकरणे वापरतात. त्यांपैकी एक साधे व दुसरे विशिष्ट सोयींनी युक्त असते. या दुसऱ्या उपकरणास लिस्टर (जोझेफ जॅकसन लिस्टर या इंग्लिश प्रकाशकीविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारा) दृष्टिक्षेत्रमापक म्हणतात. विशिष्ट छपाईच्या तक्त्यावर दृष्टिक्षेत्रमापनाची नोंद ठेवतात. दृष्टिक्षेत्राचे बाहेरचा किंवा कानशिलाकडचा आणि आतला किंवा नाकाकडील असे दोन भाग ओळखले जातात. नाकाकडील भागाचा व्यास ६०° असतो, तर कानशिलाकडील १००° असतो. काचबिंदू रोगात किंवा दृक्तंत्रिकेची अपपुष्टी झाल्यास दृष्टिक्षेत्रात होणारे बदल निदानाकरिता किंवा रोगाच्या प्रगतीच्या अंदाजाकरिता नोंदवून ठेवतात. या नोंदतक्त्यावर चाचणीकरिता वापरलेल्या वस्तूचा आकार व रंग, प्रकाशयोजना, तपासणीची तारीख आणि रोग्याचे नाव लिहून ठेवणे जरूर असते.
बहुसंख्य प्राण्यांमध्ये दोन्ही डोळ्यांची दृष्टिक्षेत्रे एकमेकांत मिसळतात. म्हणजे बाहेरील दृश्यापैकी काही भाग दोन्ही डोळ्यांना एकाच वेळी दिसत असतो, यालाच द्विनेत्री दृष्टी म्हणतात. ज्या प्राण्यांचे डोळे डोक्याच्या अगदी बाजूस असतात (उदा., ससा) त्यांच्या डोळ्यांची दृष्टिक्षेत्र अत्यल्प प्रमाणात एकमेकांत मिसळतात किंवा मिसळतही नाहीत याला एकनेत्री दृष्टी म्हणतात.
ज्या वेळी बाह्यवस्तूची प्रतिमा दोन्ही जालपटलांच्या सारख्याच जागी पडत नाही त्या वेळी एकाऐवजी दोन वस्तू असल्यासारखे दिसते. याला दुहेरी दृष्टी म्हणतात. वस्तूला खोली, उंची व रुंदी असल्याची जाणीव द्विनेत्री दृष्टीमुळेच होते. दोन्ही जालपटलांवर उमटणाऱ्या प्रतिमा हुबेहूब सारख्या नसतात व दोन्हींमध्ये किंचित फरक असतो. या फरकामधूनच मेंदूमध्ये त्रिमितीची जाणीव होते. याला त्रिमितीय दृष्टी म्हणतात. मात्र ही जाणीव ठराविक अंतरापर्यंतच मिळू शकते. चांगली दृष्टी असलेल्या (दूरदर्शकासारखे साधन न वापरता) डोळ्यांच्या बाबतीत ही मर्यादा काही शेकडो मीटर असते. या अंतरापलीकडे उठावाची जाणीव होण्याकरिता एखादे उंच झाड किंवा इमारत यांची मदत घ्यावी लागते. अशा तऱ्हेचे साधन उपलब्ध नसल्यास खूप दूरच्या पदार्थांच्या अंतराचे अनुमान बांधणे अशक्य असते. उदा., सर्व तारे एकाच अंतरावर असल्याप्रमाणे भासतात.
कार्य : मानवी डोळा हे एक अनन्य प्रकाशकीय तंत्र आहे. कधीकधी त्यांची व कॅमेऱ्याची तुलना करतात, परंतु डोळ्याची क्रिया कॅमेऱ्याएवढी खासच सोपी नाही. काही कॅमेऱ्यांमध्ये डोळ्यातील प्रकाशनियंत्रक बाहुलीप्रमाणे उत्तम यंत्रणा असतातही, परंतु कोणत्याही कॅमेऱ्यात स्वयंचलित केंद्रीकरण आणि लक्ष्यशोधक योजना नसतात. यांशिवाय लक्षावधी कोशिका असलेल्या मेंदूसारखे साधन कोणत्याही कॅमेऱ्याला जोडलेले नसते. डोळा आणि कॅमेरा यांमधील अनेक फरक सहज लक्षात येतात. एकतर डोळा सजीव ऊतकापासून बनलेला असून पोषणद्रव्ये मिळवून त्याला प्रकाशकीय गुणधर्म सतत संभाळावे लागतात. बाह्यवस्तूची नुसती प्रतिमा उमटवून त्याचे कार्य संपत नाही. आत शिरणाऱ्या प्रकाशकिरणामुळे त्याच्या ऊतक कोशिकांत होणारे रासायनिक व विद्युत् बदल थेट मेंदूतील विशिष्ट भागापर्यंत पोहोचणे जरूरीचे असते.
डोळ्याचे केंद्रांतर (बाह्यवस्तूपासून येणारे समांतर किरण जेथे मिळतात तो बिंदू व काचेचा म्हणजे भिंगाचा मध्य यांतील अंतर) अतिशय लहान असते व म्हणून तो एक शक्तिमान केंद्रीकारक आहे. किरणांचे प्रणमन करण्याच्या काचेच्या शक्तीच्या एककास डायॉप्टर म्हणतात. एक डायॉप्टरचे भिंग म्हणजे दूर अंतरावरील प्रकाशकिरणांचे प्रणमन होऊन त्यांचे केंद्रीभवन १ मी. अंतरावर ते भिंग करते. डोळ्याची ही शक्ती ५८ डायॉप्टर असते.
सहा मी. किंवा त्याहून अधिक अंतरावरून येणारे प्रकाशकिरण साधारणपणे समांतर असतात. याहून कमी अंतरावरून येणारे किरण अपसारी (समांतर नसलेले, विखुरणारे) असतात. बाह्यवस्तूपासून निघणारे प्रकाशकिरण स्वच्छमंडलाच्या पृष्टभागी पोहोचल्यानंतर त्याच्या बहिर्गोलाकारामुळे ते आत शिरताना त्यांचे प्रणमन होते. स्वच्छमंडलाची प्रणमन शक्ती ४३ डायॉप्टर असते. पुढे हे किरण नेत्रजलातून जाताना त्याचे आणखी प्रणमन होते व पुन्हा काचेतून जाताना प्रणमनामुळे त्यांचे केंद्रीभवन होते. यामुळे बाह्यपदार्थाची प्रतिमा जालपटलावरच उमटते. काचेची प्रणमन शक्ती जवळजवळ १५ डायॉप्टर एवढी असते. काचेची बहिर्गोलता कमीजास्त होऊ शकते आणि त्यामुळे प्रणमनात बदल होऊ शकतो. डोळ्यातील या यंत्रणेला नेत्र-अनुकूलन म्हणतात. कनीनिका लहानमोठी होणे व काचेच्या बहिलार्गोची वक्रता कमीजास्त होणे, या प्रतिक्षेपी क्रिया असून डोळ्यातील अंतस्थ स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे होतात. प्रकाशाची तीव्रता व बाह्यवस्तूंचे अंतर या क्रिया घडविण्यास कारणीभूत असतात.
डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशमानाप्रमाणे कनीनिका आकुंचन किंवा प्रसरण पावते व बाहुलीचे छिद्र लहानमोठे होते. जवळची वस्तू बघत असताना छिद्र लहान होते व त्यामुळे किरणांचे केंद्रीभवन सुलभ होते. म्हणून सु. ३५ सेंमी. अंतरावरील पदार्थ बघताना ( उदा., वाचताना) काचेच्या केंद्रांतरात भराभर फरक घडवून आणण्याची जरूर नसते.
जालपटलातील तंत्रिका कोशिकांवर प्रकाशकिरणांचे केंद्रीभवन होताच त्या प्रकाशग्राही असल्यामुळे रासायनिक व विद्युत प्रक्रिया होऊन आवेग उत्पन्न होतात व ते दृक्तंत्रिकेच्या मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचून प्रकाशाची जाणीव होते.
दृष्टिभ्रम : दृष्टीला जसे दिसते तशी वस्तुस्थिती नसणे याला दृष्टिभ्रम म्हणतात. उदा., सरळ रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून दूरवर नजर टाकल्यास दुतर्फा लावलेली झाडे किंवा विजेच्यातारांचे खांब एकापेक्षा एक लहान होत गेल्याचे दिसते. वस्तुतः झाडे जवळजवळ सारख्याच उंचीची असतात, तर खांब अगदी सारख्या उंचीचेच असतात. जाड माणसाने उभे पट्टे असलेला पोषाख चढविल्यास तो कृश भासतो किंवा कृश माणसाने आडवे पट्टे असलेला पोषाख घातल्यास तो जाड भासतो.
वरील उदाहरणातील दृष्टिभ्रम प्राकृत दृष्टी असलेल्या सर्वच व्यक्तींना होतो. दैनंदिन जीवनातील दृष्टिभ्रमाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चंद्रबिंब जेव्हा क्षितिजाजवळ असते. तेव्हा ते मध्यावर चंद्र असताना दिसणाऱ्या बिंबापेक्षा जवळजवळ अडीचपटीने मोठे दिसते. या दृष्टिभ्रमाबद्दल टॉलेमी या ग्रीक शास्त्रज्ञांच्या काळापासून अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत परंतु आजपावेतो एकही सिद्ध झालेला नाही.
आ. ३ मध्ये म्यूलर-लिअर दृष्टिभ्रम या नावाने (एफ्. सी. म्यूलर-लिअर यांच्या नावाने) ओळखला जाणारा दृष्टिभ्रम दाखविला आहे. या आकृतीतील वरची आडवी रेषा खालच्या आडव्या रेषेएवढीच असूनही वरची लहान, तर खालची लांब भासते. या दृष्टिभ्रमाबद्दलही अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यांपैकी एक असा : वरच्या आकृतीकडे बघताना डोळ्याची हालचाल कमी होते, तर खालचीकडे बघताना अधिक होते. वरच्या रेषेच्या टोकाकडील दोन्ही बाजूंच्या रेषा हालचाल रोखतात. याउलट खालच्या रेषेच्या टोकाकडील दोन्ही बाजूंच्या रेषा हालचाल चालू ठेवतात. या कारणांमुळे वरची लहान व खालची लांब भासते.
रंगांधत्व : निरनिराळे रंग एकमेकांपासून भिन्न आहेत हे न ओळखणे म्हणजे रंगांधत्व होय. यात कोणताही प्राथमिक रंग न ओळखता येण्यापासून एखादाच रंग न ओळखणे या अवस्थांचा समावेश असतो. कोणताही रंग न ओळखणे म्हणजे सर्वच वस्तू काळ्या किंवा पांढऱ्या दिसणे याला बिनरंगी रंगांधत्व म्हणतात. हा प्रकार फार क्वचित आढळतो व त्याबरोबर इतर दृष्टिदोषही असतात. बहुधा एखाद्या रंगापुरतेच मर्यादित रंगांधत्व अधिक आढळते. प्राकृत दृष्टीला तिन्ही प्राथमिक रंग ओळखता येतात म्हणून तिला तीनरंगी दृष्टी म्हणतात. ज्या वेळी फक्त दोनच प्राथमिक रंग हिरवा आणि निळा किंवा लाल आणि निळा ओळखता येतात तेव्हा त्या दृष्टीला दुरंगी दृष्टी म्हणतात. ज्या वेळी फक्त लाल रंग ओळखता येत नाही त्या वेळी पहिले रंगांधत्व म्हणजे पहिला रंग न ओळखणे असे म्हणतात. हिरवा रंग दुसऱ्या क्रमांकाचा रंग असून तो न ओळखण्यास दुसरे रंगांधत्व म्हणतात. तिसरा रंग (निळा) न ओळखण्यास तिसरे रंगांधत्व म्हणतात.
रंगांधत्व बहुधा आंशिक असते. म्हणजे तिन्ही प्राथमिक रंग दिसतात, मात्र त्यापैकी लाल किंवा हिरव्याचे चटकन आकलन होत नाही. याला रंग-दौर्बल्य असेही म्हणतात. रंगांधत्वाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांत अधिक असते. १०० रंगांधांमध्ये ९५ पुरूष, तर फक्त पाचच स्त्रिया आढळतात. रंगांधत्व आनुवंशिक असते. रंगांध बापाकडून ते फक्त मुलीच्या प्रजेतच पसरते.
रंगांधत्व काही व्यवसायांमध्ये महत्त्वाचे असते. रेल्वे एंजिन चालक, नौदल व लष्करातील जवान, तसेच वैमानिकांना रंगांधत्व असणे अनेकांच्या प्राणास धोकादायक ठरण्याची शक्यता असते, रंगांधत्व ओळखण्यासाठी निरनिराळी साधने उपलब्ध आहेत. त्यांपैकी सर्वांत जुने व उपयुक्त साधन म्हणजे निरनिराळ्या रंगांचे लोकरीचे धागे एकत्र मिसळवून त्यांमधून गुलाबी रंगाच्या धाग्यासारखे धागे निवडावयास सांगणे हे आहे. निवडलेल्या धाग्यांत जर जांभळा किंवा निळा धागा निवडला, निवडणारास पहिले रंगांधत्व असते. त्याने जर हिरवा, लाल किंवा तपकिरी धागा निवडला तर त्यास दुसरे रंगांधत्व असते. निरनिराळे रंग दाखविणारे दिवे काही साधनांत वापरतात. शिनोबू इशिहारा नावाच्या जपानी नेत्रवैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या इशिहारा चाचणी परीक्षेत निरनिराळ्या रंगीत ठिपक्यांच्या पार्श्वभूमीवर आकडे दडविलेले असतात. (चित्रपत्र ४९). प्राकृत डोळ्यांना हे आकडे सहज ओळखता येतात. रंगांधत्व असणाऱ्यांना ते ओळखता येत नाहीत. निरनिराळे रंग वापरून काढलेल्या आकड्यांची पृष्ठे असलेले पुस्तक मिळते व ते कसे वापरावयाचे याविषयी सूचनाही सोबत दिलेल्या असतात. बेनेडिक्ट स्टिलिंग यांनी याच पद्धतीची फक्त रंग बदललेली एक परीक्षा शोधली आहे.
रंगांधत्वाच्या कारणांविषयी अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. एका सिद्धांताप्रमाणे जालपटलामध्ये तीन निरनिराळी प्रकाशग्राही रंगद्रव्ये असलेले शंकू असून ते तीन प्राथमिक रंगांमुळे संवेदित होतात. ज्या प्रकारचे शंकू नसतात किंवा असून कार्यहीन असतात, त्या प्रकारचे रंगांधत्व येते.
पहा : अंधत्व चष्मा नेत्रवैद्यक.
चिटणीस, व. के. भालेराव, य. त्र्यं. ढमढेरे, वा. रा. भावे, श्री. द.
प्राण्यांचे डोळे
पृष्ठवंशी प्राणी : सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांना दोन डोळे असतात परंतु बिळे करून राहणारे प्राणी, गुहावासी प्राणी आणि खोल समुद्रात राहणारे काही मासे यांच्यात ते अल्पविकसित असू शकतात. लँपी व कित्येक सरडे यांच्यासारख्या काही प्राण्यांत डोळ्यासारखी संरचना असलेली एक किंवा दोन इंद्रिये (पिनियल इंद्रिय) डोक्यावर असतात यांचे कार्य काय असावे ते नक्की कळलेले नाही.
निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या दृष्टीच्या तीक्ष्णतेत बराच फरक दिसून येतो. सर्वसाधारणपणे शिकारी पक्षी व मार्जार कुलातील प्राणी यांच्यासारखे मांसाहारी प्राणी, माकडे व माणूस यांच्यासारखे प्रायमेट्स (नरवानर गणातील प्राणी ) आणि सरडगुहिऱ्यांसारखे वृक्षवासी प्राणी यांच्यात ही तीव्रता सगळ्यांत जास्त असते. अशा प्राण्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टिक्षेत्र एकमेकांवर आल्यामुळे ‘द्विनेत्री दृष्टी’ उत्पन्न होते व तिच्या मदतीने त्यांना वस्तूच्या अंतराची कल्पना येते. अस्थिमत्स्य (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो असे मासे), सरडे, कूर्म, पक्षी आणि प्रायमेट्स यांच्यासारख्या पुष्कळ पृष्ठवंशी प्राण्यांच्या अंगी रंग ओळखण्याची शक्ती असते, परंतु पुष्कळ सस्तन प्राण्यांत तिचे प्रमाण फारच थोडे असते.
सगळ्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांचा भ्रूणीय विकास आणि त्यांची मूलभूत संरचना ही सारखीच असतात. त्यांत विशिष्ट प्रकाशसंवेदी कोशिकांचे बनलेले जालपटल असते या कोशिकांना शलका आणि शंकू म्हणतात. जालपटलापासून दृक्तंत्रिका निघते. शलाकांचा उपयोग मुख्यतः रात्री पाहण्याकरिता व शंकूंचा दिवसा पाहण्याकरिता होतो. जालपटलाचा अगदी बाहेरचा स्तर वर्णकित (रंगद्रव्ययुक्त) असतो आणि त्याच्याभोवती काळ्या रंगद्रव्याचे आवरण–वर्णपटल–असते. डोळ्यात एक भिंग (काच) असून त्याचा उपयोग प्रकाशकिरणांचे जालपटलावर केंद्रीकरण करण्याकरिता होतो. सामान्यतः जवळचे किंवा दूरचे पाहण्याकरिता डोळ्याच्या अंगी अनुकूलनाची थोडीफार शक्ती असते. सस्तन प्राण्यांमध्ये जवळची वस्तू पाहण्याकरिता लोमश स्नायूंच्या आकुंचनाने भिंगाची वक्रता वाढवून हे अनुकूलन घडवून आणले जाते. प्राण्यांच्या कित्येक गटांमध्ये इतर प्रकारच्या अनुकूलन यंत्रणा आढळतात. उदा., पुष्कळ माशांमध्ये भिंगाचा आकार बदलण्याऐवजी ते जरूरीप्रमाणे पुढे किंवा मागे सरकविले जाते. डोळ्यात शिरणाऱ्या प्रकाशाच्या परिमाणावर कनीनिकेने नियंत्रण ठेवता येते. तिच्या छिद्राला बाहुली म्हणतात. नेत्रगोलाच्या बहुतेक भागाभोवती एक कणखर आवरण–श्वेतमंडल–असते पुष्कळ पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये–पक्षी आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी )–ते उपास्थींचे (कूर्चांचे) बनलेले असून त्यात अस्थिमय तकटेदेखील असतात. भिंगाच्या पुढच्या बाजूला श्वेतमंडल एका पारदर्शक संरचनेशी-स्वच्छमंडलाशी-अखंड असते भिंगाच्या मागे असलेली डोळ्याची पोकळी एका श्लेषी (जेलीसारख्या दाट) पदार्थाने (काचाभ द्रवाने) भरलेली असते पण भिंगाच्या पुढील लहान पोकळी पाण्यासारख्या नेत्रजलाने भरलेली असते.
भूचर पृष्ठवंशी प्राणी व काही मासे यांच्या डोळ्यांचे दोन पापण्यांनी –वरची व खालची–रक्षण केले जाते कधीकधी तिसरी पापणीदेखील असते, तिला निमेषक पटल म्हणतात. माणसात या पापणीचा केवळ अवशेष असतो, पण पक्षी आणि पुष्कळ सरीसृपांत तिची चांगली वाढ झालेली असते. सापांत निमेषक पटल नसते आणि दोन्ही पापण्यांचे सायुज्यन (एकत्रीकरण) होऊन स्वच्छमंडलावर एक पारदर्शक आवरण तयार होते. पापण्यांचे आतले पृष्ठ पातळ कलेने आच्छादिलेले असते या कलेला नेत्रश्लेष्मकला म्हणतात ही दुमडून डोळ्याच्या पुढच्या भागावर आलेली असते. अश्रू ग्रंथी व उपाश्रू ग्रंथी यांच्या स्रावाने ही कला नेहमी स्वच्छ आणि ओलसर राहते. हा स्राव किंवा ‘अश्रू’ एका विशिष्ट वाहिनीमधून नाकात किंवा मुखात जातात. पापण्या व संबंध नेत्रगोल यांची हालचाल बाह्यागत स्नायूंच्या एका श्रेणीने होते.
पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणाचा विकास होत असताना जालपटल अग्र मस्तिष्कापासून एका उद्वर्धाच्या (पुढे आलेल्या वाढीच्या) स्वरूपात उत्पन्न होते या उद्वर्धाला अक्षिचषक म्हणतात. भिंगाची उत्पत्ती वर असलेल्या त्वचेच्या अंतर्वर्धापासून होते. जालपटल आणि भिंग ही दोन्हीही भ्रूणाच्या बाह्यस्तरीय जननस्तरापासून उत्पन्न होतात आणि मध्यस्तरापासून उत्पन्न झालेल्या भोवतालच्या ऊतकांमध्ये श्वेतमंडल, स्वच्छमंडल व नेत्रस्नायू उत्पन्न होतात.
अपृष्ठवंशी प्राणी : अपृष्ठवंशी प्राण्यांचे डोळे बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेले असतात. अगदी साधे अपृष्ठवंशी डोळे म्हणजे प्रकाशग्राही कोशिकांचे समूह असून ते शरीराच्या पृष्ठावर असतात. पुष्कळदा प्रकाशग्राही कोशिकांच्या मधूनमधून रंगद्रव्ययुक्त कोशिका असतात व त्यांच्यामुळे डोळा लाल किंवा काळ्या रंगाचा दिसतो. भिंग आणि स्वच्छमंडल यांच्यासारख्या साहाय्यक संरचना डोळ्यात नसतात. अशा साध्या डोळ्यांना रंगद्रव्य-बिंदू अक्षिका म्हणतात. जेलीफिश, चापट कृमी, तारामीन इत्यादींमध्ये असे नेत्रबिंदू आढळतात.
यापेक्षा सामान्यतः आढळणारा अपृष्ठवंशी डोळ्याचा प्रकार प्रकाशग्राही कोशिकांच्या अशा समूहांपासूनच संवेदी उपकला पृष्ठाच्या खाली गेल्यामुळे वाटीसारखी संरचना तयार होऊन बहुधा उत्पन्न झाला असावा, असे दिसते. ही वाटी जालपटल दर्शविते. ही पृष्ठावर उघड्या खळग्याच्या स्वरूपात असते किंवा पृष्ठभागाच्या खाली गेलेली असते अथवा स्वच्छ मंडळ व भिंग यांच्या उत्पत्तीमुळे बंद झालेली असते. पुष्कळ अपृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणविज्ञानाच्या आणि तुलनात्मक शारीराच्या (शरीररचनेच्या) अभ्यासावरून अशा तऱ्हेचा क्रमविकास (उत्क्रांती) घडला असावा, असे स्पष्ट दिसून येते. उदा., गोगलगायीसारख्या उदरपाद मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांमध्ये रंगद्रव्य-चषक अक्षिकांपासून मोठ्या जटिल डोळ्यांपर्यंत सर्व प्रकार आढळतात. मुक्तजीवी चापट कृमी आणि समुद्री ॲनेलिड (वलयी) प्राणी यांतदेखील डोळ्यांचा वरीलप्रमाणेच क्रमविकास दिसून येतो.
वाटीच्या भित्तीमधील प्रकाशग्राही कोशिका शलाकेसारख्या असून त्यांचे अक्ष-तंतू मेंदूकडे वळलेले असतात. प्रकाशग्राही कोशिका प्रकाशाच्या स्थानाकडे अथवा त्याच्या विरुद्ध दिशेला वळलेल्या असू शकतील पहिल्या प्रकारच्या डोळ्याला प्रत्यक्ष आणि दुसऱ्या प्रकाराला अप्रत्यक्ष डोळा म्हणतात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष डोळ्यांची वाटणी बदलणारी असते. मृदुकायांचे डोळे प्रत्यक्ष असतात पुष्कळ चापट कृमींचे डोळे पृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांप्रमाणे अप्रत्यक्ष असतात. कोळ्यांना आठ डोळे असतात त्यांपैकी दोन प्रत्यक्ष आणि सहा अप्रत्यक्ष असतात.
शीर्ष (डोके) असणाऱ्या द्विपार्श्व सममित (शरीराचे दोन सारखे भाग होणाऱ्या) अपृष्ठवंशींमध्ये प्रारूपिकतेने (नमुनेदारपणे) डोळ्यांच्या जोड्या असून त्या शरीराच्या अग्र टोकाशी असतात. मृदुकाय प्राणी आणि पुष्कळ संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेले प्राणी, आर्थोपॉड) यांच्यातल्याप्रमाणे जरी सामान्यतः प्रत्येक प्राण्यात डोळ्यांची एकच जोडी आढळत असली, तरी एकीपेक्षा जास्त जोड्या आढळणे ही काही असामान्य गोष्ट नव्हे. काही पॉलिकीट प्राण्यांना चार आणि विंचवाला बारा डोळे असतात. डोळ्यांची सर्वांत जास्त संख्या समुद्री चापट कृमींमध्ये आढळते यांना शंभर किंवा त्यापेक्षाही जास्त अक्षिका असून त्या अग्र भागाच्या उत्तर (वरच्या) पृष्ठावर आणि शरीराच्या दोन्ही बाजूंवर असतात.
डोक्याखेरीज शरीराच्या इतर भागांवरील डोळ्यांच्या अस्तित्वाचा संबंध अरीय सममिती (ज्या स्थितीत प्राण्याचे शरीर मध्यभागातून जाणाऱ्या कोणत्याही एका उभ्या पातळीतून विभागले असता त्याचे दोन सारखे अर्धे भाग पडतात ती स्थिती ) अथवा अनियमित जीवनक्रमाशी असतो म्हणूनच जेलीफिशांच्या घंटेच्या काठाभोवती व काही समुद्री तारामिनांच्या बाहूंच्या टोकावर डोळे आढळतात. कंबुकाच्या (द्विपुटी मृदुकाय) प्रावाराच्या (कवचाच्या लगेच खाली असणाऱ्या त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीच्या) काठावर पुष्कळ डोळे असतात. नळीत राहणाऱ्या काही व्यजनकृमींच्या (पंख्यासारख्या कृमींच्या) डोक्यावरील नळीच्या द्वारातून पुढे आलेल्या पिच्छसदृश उपांगांवर (पिसासारख्या अवयवांवर) डोळे असतात.
परिसरातील प्रकाशाची तीव्रता किती आहे याची माहिती मिळवणे एवढेच काय ते डोळ्यांचे आद्य कार्य होते. प्राण्याच्या जीवनाची जी रीत असेल तीप्रमाणे तो सुलट (पॉझिटिव्ह) अथवा उलट (निगेटिव्ह) प्रतिक्रिया व्यक्त करीत असे. प्रकाशाचा शोध घेणे हे आजदेखील बहुसंख्य अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांचे (स्वच्छमंडल व भिंग असलेल्या डोळ्यांचे देखील) एकमेव कार्य आहे. स्वच्छमंडल आणि भिंग यांचा डोळ्याला संरक्षण आच्छादनासारखा उपयोग होतो व त्यांच्यामुळे प्रकाश जालपटलाच्या पृष्ठावर केंद्रित होतो. वस्तूंचे ज्ञान होणे हे जालपटलातील प्रकाशग्राही कोशिकांची संख्या, केंद्रीकरणाच्या यंत्रणा आणि अर्थबोधन या गोष्टींवर अवलंबून असते.
काही अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये प्रतिमेची उत्पत्ती हे डोळ्यांचे एक जादा कार्य म्हणून उत्पन्न झाल्याचे दिसून येते. जालपटलाचे पृष्ठ किती प्रकाशग्राही कोशिकांचे बनलेले आहे ही गोष्ट प्राथमिक महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक प्रकाशग्राही कोशिका अथवा त्यांचा गट प्रकाशाच्या एका बिंदूचा वाहक असतो. वेगवेगळ्या तीव्रतेच्या
प्रकाशाच्या बिंदूंच्या संयोगामुळे जालपटल प्रतिमा बनवू शकते, म्हणून प्रतिमा तयार करण्याची डोळ्याची क्षमता आणि प्रतिमेचा ओबडधोबडपणा अथवा उत्कृष्टपणा पोहोचविल्या जाणाऱ्या बिंदूंच्या संख्येवर अवलंबून आहे आणि पोहोचविलेल्या बिंदूंची संख्या जालपटलातील प्रकाशग्राही कोशिकांच्या संख्येवर अवलंबून असते. केवळ ओबडधोबड प्रतिमा उत्पन्न करण्याकरिता देखील प्रकाशग्राही कोशिकांची संख्या बरीच जास्त असावी लागते. बहुसंख्य अपृष्ठवंशी प्राण्यांचे डोळे प्रतिमा उत्पन्न करू शकत नाहीत कारण त्यांच्या जालपटलात प्रकाशग्राही कोशिकांची संख्या पुरेशी नसते. एखाद्या वस्तूची हालचाल जाणण्यापुरती प्रकाशग्राही कोशिकांची संख्या असेल, परंतु त्या वस्तूचे रूप जाणण्यापुरती प्रकाशग्राही कोशिकांची संख्या असेल, परंतु त्या वस्तूचे रूप जाणण्याकरिता ही संख्या अपुरी असते.
अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांच्या केंद्रीकरणाच्या यंत्रणांत पुष्कळच फरक दिसून येतो. संधिपाद प्राण्यांच्या डोळ्यांच्या केंद्राचा स्थिर राहण्याकडे कल असतो म्हणजेच स्वच्छमंडल-भिंग व जालपटल यांमधील अंतर बदलू शकत नाही, म्हणून डोळ्यापासून फक्त ठराविक अंतरावर असणाऱ्या वस्तूच दृष्टिकेंद्रात येतात. असे असताही डोळा एखाद्या केंद्राकरिता भिंग आणि जालपटल यांमधील अंतराकडून संरचनेच्या दृष्टीने अनुकूलित होणे शक्य असते, उदा., उड्या मारणारे कोळी ३० सेंमी. अंतरावरची वस्तू पाहू शकतात यांना अग्रभागी नळीसारखे मध्य नेत्र असतात डोळ्याचा आकार नळीसारखा असल्यामुळे भिंग आणि जालपटल यांमधील अंतर वाढून दूरचा पदार्थ पाहण्याकरिता केंद्राचे अनुकूलन होते.
समुद्रात राहणाऱ्या पॉलिकीट कृमींच्या ॲल्सिओपिडी कुलातील कृमींचे डोळे इतर कोणत्याही सखंड कृमींच्या डोळ्यांपेक्षा अतिशय विकसित असतात. या कृमींच्या डोळ्यांचे केंद्रीकरण पुढील प्रकारे होते : डोळ्यांच्या एका बाजूला असलेला एक फुगा जालपटल आणि भिंग यांच्या मध्ये असणाऱ्या जागेत द्रवाचे अंतःक्षेपण (आत सोडण्याची क्रिया) करतो, त्यामुळे भिंग बाहेरच्या बाजूकडे ढकलले जाते. अष्टपादांमध्ये (उदा., ऑक्टोपस) या कामी वेगळी यंत्रणा उपयोगात आणली जाते. भिंगाला जोडलेल्या लोमश स्नायूंनी भिंगाची हालचाल करता येते.
डोळ्याच्या संरचनेला कितीही जरी महत्त्व दिले, तरी अखेरीस प्रतिमा ही प्रकाशग्राही कोशिकांकडून मिळालेल्या संदेशांचे केंद्रीय तंत्रिका तंत्राकडून होणारे स्पष्टीकरण होय. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या दृष्टीविषयी विशेषसा उलगडा अद्याप झालेला नाही. जी काही थोडी माहिती मिळलेली आहे ती ऑक्टोपसासारख्या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांद्वारे मिळालेली आहे.
पुष्कळ अपृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्तनावरून त्यांच्या अंगी रंग ओळखण्याची शक्ती असते, असे निःशंकपणे समजावयास हरकत नाही. रंग-दृष्टी असल्यामुळेच कित्येक अपृष्ठवंशी प्राणी त्यांच्या पार्श्वभूमीच्या रंगाप्रमाणे आपल्या शरीराचे रंग बदलतात परंतु फक्त शंखवासी खेकड्यांसारखे कवचधारी (क्रस्टेशियन) प्राणी आणि मध्यमाश्यांसारखे कीटक यांना रंग ओळखता येतात, एवढेच प्रयोगाने सिद्ध झालेले आहे.
संयुक्त डोळा : कवचधारी प्राणी, कीटक, गोम इ. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांची रचना इतर अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डोळ्यांच्या रचनेपेक्षा अगदी भिन्न असते. या डोळ्यांना संयुक्त डोळे म्हणतात. संयुक्त डोळ्याच्या रचनात्मक एककाला नेत्रिक म्हणतात. निरनिराळ्या प्राण्यांच्या संयुक्त डोळ्यांत नेत्रिकांची संख्या कमी-जास्त असते. काष्ठयूकेत नेत्रिका २५ पेक्षा जास्त नसतात, तर शेवंड्यात त्या १४,००० आणि चतुर या कीटकात ३०,००० असतात.
नेत्रिका नळीसारखी लांबट असून तिच्या बाहेरच्या टोकावर स्वच्छमंडल-फलक असतो त्याच्या खाली दोन स्वच्छमंडलजन कोशिका असतात या कोशिकांच्या खाली एक लांबट, निमुळता, पारदर्शक, स्फटिकरूप शंकू असतो. हा नेत्रिकेचा केंद्रीकरण-स्तर होय. स्वच्छमंडलफलक आणि शंकू हे दोन्ही मिळून भिंगाचे कार्य करतात. शंकूच्या भोवती चार स्फटिकसर्गी कोशिका असून त्यांच्या स्रावापासून शंकू तयार होतो. शंकूच्या सभोवती रंगद्रव्ययुक्त कोशिकांचा एक थर असून त्यांच्या योगाने शंकू शेजारच्या नेत्रिकेतील शंकूपासून अलग केला जातो. स्फटिकसर्गी कोशिका आतल्या बाजूला निमुळत्या होत जातात आणि त्यांची आतली टोके सामान्यतः सात रेटिन्यूला कोशिकांच्या समूहाने वेढलेली असतात. या कोशिकांच्या आतल्या पृष्ठावर त्यांच्या स्रावाने शलाकांसारख्या संरचना तयार होतात. या एकत्रित होऊन त्यांच्यापासून एक चातीच्या आकाराचा पारभासी प्रणमन-काय तयार होता, याला वेतसिका म्हणतात. प्रत्येक रेटिन्यूला कोशिकेचे आतले टोक दृक्तंत्रिकेच्या एका संवेदी तंत्रिका तंतूला जोडलेले असते. रेटिन्यूला कोशिका रंगद्रव्ययुक्त कोशिकांनी वेढलेल्या असतात. नेत्रिकेचा दूरस्थ आणि समीपस्थ भाग रंगद्रव्याच्या कणांनी वेढलेला असल्यामुळे शेजारच्या दोन नेत्रिकांमध्ये एक पडदा तयार होतो आणि तो त्या नेत्रिकांना एकमेकींपासून अलग करतो.
संयुक्त डोळ्यात प्रतिमा दोन तऱ्हांनी उत्पन्न होते. प्रकाश भरपूर आणि तेजस्वी असला म्हणजे रंगद्रव्ययुक्त कोशिकांच्या दोन गटांतील रंगद्रव्य पसरते आणि शेजारच्या नेत्रिका एकमेकींपासून अलग होतात. अशा वेळी प्रत्येक नेत्रिकेच्या समोर वस्तूचा जेवढा भाग असेल, तेवढ्याच भागाची प्रतिमा ती नेत्रिका उत्पन्न करू शकते. तिरकस किरण रंगद्रव्याने शोषले जातात. अशा प्रकारे वस्तूच्या तुकड्यांच्या प्रतिमा एके ठिकाणी येऊन सबंध वस्तूची प्रतिमा तयार होते. अशी प्रतिमा सुलटी असते आणि तिला कुट्टिमचित्र-प्रतिमा (मोझाइक प्रतिमा) म्हणतात. प्रकाश अंधुक असला म्हणजे रंगद्रव्ययुक्त कोशिकांतील रंगद्रव्य आखडून घेतले जाते आणि एका नेत्रिकेतून आत येणारे प्रकाशकिरण शेजारच्या नेत्रिकांमध्ये शिरू शकतात व तेथे त्यांचे केंद्रीकरण होऊ शकते. अशा परिस्थितीत एका प्रतिमेवर दुसऱ्या प्रतिमांचे तुकडे तयार होऊ शकतात. अशा प्रकारे तयार झालेल्या पुसट प्रतिमेला अध्यारोपण प्रतिमा म्हणतात. अशी प्रतिमा अस्पष्ट असली, तरी अगदी कमी उजेडात देखील प्राण्याला दिसू शकते.
संयुक्त नेत्रांचा एक फायदा असा आहे की, त्यांच्यामुळे अपृष्टवंशी प्राण्यांना सूक्ष्म हालचालीदेखील समजू शकतात. पुष्कळ संधिपादांच्या संयुक्त डोळ्यांचा आणखी एक फायदा दिसून येतो, सबंध डोळ्यावरील स्वच्छमंडलाचे सगळे पृष्ठ अतिशय बहिर्गोल असल्यामुळे त्यांचे दृष्टिक्षेत्र बरेच विस्तृत असते.
पुष्कळ रात्रिंचर अपृष्ठवंशी प्राण्यांचे डोळे अंधुक प्रकाशात पाहण्याकरिता अनुकूलित असतात. रात्री जमिनीवर हिंडून शिकार करणाऱ्या लांडगा-कोळ्याचे डोळे अशा प्रकारचे असतात. याच्या आठ डोळ्यांपैकी सहा डोळ्यांत परावर्ती रंगद्रव्याचा स्तर असतो त्याला चकासस्तर म्हणतात आणि तो परावर्तनाने प्रकाशग्राहींवर प्रकाश पाडतो. प्रकाशाच्या झोताकडे याचे डोळे असले, तर मांजराच्या डोळ्यांप्रमाणे या कोळ्याचे डोळे अंधारात चमकतात. काही रात्रिंचर कीटक व कवचधारी प्राणी यांच्या संयुक्त डोळ्यांत सुद्धा परावर्ती रंगद्रव्य आढळते.
कर्वे, ज. नी.
संदर्भ :1. Best, C. H. Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961.
2. Davies, D. V. Davies, F., Eds. Gray’s Anatomy, London, 1962.
3. Gregg, J. R. Heath, G. G. The Eye and Sight, Boston, 1964.
4. Grollman, S. The Human Body, New York, 1964.
5. Hickman, C. P. Integrated principles of Zoology, Saint Louise, 1966.
6. Houssay, B. A. and others, Human Physiology, New York, 1955.
7. Lyle, T. K. Cruss, A. G. Eds. May and Worth’s Manual of Diseases of the Eye, London, 1959.
8. Marshall, A. J. Williams, W. D. Textbook of Zoology : Invertebrates, London, 1972.
9. Marshall, A. M. Hurst, C. H. A Junior Course of Practical Zoology, London, 1956.
10. Mathews, L. H. Knight, M. The Senses of Animals, London, 1963.
“