डोमिनिकन प्रजासत्ताक : (रेपूब्लिक डमिनिकान). अटलांटिक आणि कॅरिबियन यांमधील हिस्पॅनीओला बेटाचा पूर्वेकडील ६७% भाग व्यापणारे प्रजासत्ताक. क्षेत्रफळ जवळच्या छोट्या मोठ्या बेटांसह ४८,४४२ चौ. किमी., लोकसंख्या ४४,३१,७०० (१९७३). विस्तार १७° ३६’ उ. ते १९° ५६’ उ. व ६८° १९’ प. ते ७२° प. यांदरम्यान पूर्व-पश्चिम कमाल लांबी सु. ३८२ किमी. व दक्षिण-उत्तर कमाल रुंदी सु. २७० किमी. हैतीशी सरहद्द सु. ३०७ किमी. व समुद्रकिनारा सु. १,३७० किमी. राजधानी सांतो दोमिंगो. याच्या उत्तरेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस कॅरिबियन समुद्र, पूर्वेस मोना पॅसेज व त्यापलीकडे प्वेर्त रीको बेट आणि पश्चिमेस हैती हे निग्रो राष्ट्र आहे. अटलांटिकमधून पनामा कालव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील या देशाचे स्थान मोक्याचे आहे.
भूवर्णन : देशाच्या मध्यातून वायव्य-आग्नेय जाणाऱ्या कॉर्डिलेरा (पर्वतश्रेणी) मधील सेंट्रल पीको द्वार्ते हे ३,१७५ मी. उंचीचे शिखर वेस्ट इंडीजमधील सर्वोच्च शिखर होय. उत्तर किनाऱ्याला समांतर कॉर्डिलेरा सेप्टेंट्रिओनाल रांग असून तिचा चुनखडी व शेलयुक्त दारुण उतार व कॉर्डिलेरा सेंट्रलचा पाइन वृक्षयुक्त उत्तर उतार यांनी बनलेला दरम्यानचा सीबाऊ हा देशाचा सर्वांत महत्त्वाचा सखल,सुपीक भाग आहे. त्यातून याके देल नॉर्ते ही नदी वायव्येकडे वाहत जाऊन मोंटे क्रीस्तीजवळ अटलांटिकला मिळते व यूना ही नदी पूर्वेकडे सामाना उपसागरास मिळते. ओसामा ही पूर्वेकडील नदी दक्षिणेकडे सांतो दोमिंगोजवळ कॅरिबियनला मिळते. ईशान्य भागात कॉर्डिलेरा ओऱ्येंताल ही बेताच्या उंचीची रांग असून आग्नेयीकडील सखल प्रदेश ऊर्मिल आहे. नैर्ऋत्य भागात सिएरा दे नेबा व सिएरा दे बाओरूको या छोट्या रांगा असून त्यांच्या दरम्यान क्यूल दे साक हा अत्यंत सखल वैराण प्रदेश असून त्यात एन्रीकीयो हे ५२० चौ. किमी. विस्ताराचे (वेस्ट इंडीजमधील सर्वांत खोल) समुद्रसपाटीखाली ४५ मी. खोलीचे खारे सरोवर आहे. या प्रदेशाच्या पूर्वेस सेंट्रल कॉर्डिलेराच्या दक्षिण उतारावरून आलेली याके देल सूर ही दक्षिणवाहिनी नदी असून ती नेबा उपसागरास मिळते.
मृदा : उंच प्रदेशातील मृदा रूपांतरित व गाळखडकांपासून बनलेल्या असून सखल भागातील मृदा जलोढनिर्मित आहेत. आग्नेयीकडील सॅव्हाना गवताळ प्रदेशातील मृदा सागरीनिक्षेप निर्मित असून सामान्यतः सर्वत्र मृदा चांगल्या सुपीक आहेत. अगदी नैर्ऋत्येकडील दर्नालेस भागातील मृदा सापेक्षतः उजाड आहेत.
हवामान : डोमिनिकन प्रजासत्ताक संपूर्णतः उष्णकटिबंधात असले, तरी येथील हवामान पर्वतप्रदेश, देशाचे द्वीपस्वरूप व वर्षभर वाहणारे ईशान्य व्यापारी वारे यांमुळे बरेच सौम्य व सुखद झाले आहे. सरासरी तपमान २५° से. असते. तपमान ३२° से. च्या वर क्वचितच जाते. पर्वतावर उंचीबरोबर तपमान कमी होत गेले, तरी पाणी गोठण्याइतके ते सहसा उतरत नाही. सरासरी पाऊस २५० सेंमी. असून ईशान्य भागात तो सर्वांत जास्त व पश्चिमेकडे हैती सरहद्दीजवळ ७५ सेंमी. पर्यंत असतो. अगदी नैर्ऋत्येकडील आणि अगदी आग्नेयीकडील प्रदेश आणि क्यूल दे साक हे सखल प्रदेश कोरडे व रुक्ष, मरूसदृश आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये उद्भवणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा धोका मात्र देशाला नेहमीच असतो. १९३० मध्ये राजधानी सांतो दोमिंगोचा बराच मोठा भाग अशा तुफानांमुळे जमीनदोस्त झाला होता.
वनस्पती : जास्त आर्द्र भागात वर्षावने आणि डोंगरांच्या उतारांवर पाइन व मॉहॉगनी यांची अरण्ये आहेत. सखल मैदानी प्रदेश सॅव्हाना गवताळ प्रकारचे आहेत आणि कोरड्या भागात खुरटी झुडुपे, निवडुंग इ. आढळतात. समुद्रकाठी काही भागात खारफुटी जंगले दिसतात.
प्राणी : डोंगराळ भागात रानडुकरे व जुटिया हा छोटा प्राणी क्वचित आढळतो. मूळचे रानटी प्राणी फारसे नसले, तरी सुरुवातीस स्पॅनिश लोकांनी आणलेली गुरे व शेळ्यामेंढ्या गवताळ भागात व रुक्ष प्रदेशात सुटून जाऊन आता रानटी बनली आहेत. याके देल नॉर्ते व याके देल सूर नद्यांच्या मुखांजवळ आणि एन्रीकीयो सरोवरात सुसरी आहेत. बदके, कबुतरे व हंसक इ. पक्ष्यांचे थवे आढळतात. त्यांतील काही स्थलांतरी असतात. समुद्रात मॅकेरल, मुलेट, बोनिटो, स्नॅपर इ. मासे विपुल आहेत.
इतिहास : या प्रदेशात पूर्वी कॅरिब या भटक्या लढाऊ आदिवासींची वस्ती होती. त्यांच्याकडूनच कॅरिबियन हे नाव पडले. बेटाला कीसकेया हे ‘सर्व भूमीची माता’ या अर्थाचे नाव होते. कॅरिबांनंतर आरावाक हे शांतताप्रेमी, मूर्तिपूजक कृषीवल आले. कोलंबसला हे बेट १४९२ मध्ये आढळले आणि स्पेनच्या नावाने ते ताब्यात घेऊन त्याने त्याला हिस्पॅनीओला नाव दिले. त्यातील या भागाचे नाव सांतो दोमिंगो होते. यूरोपमधील फ्रेंच-स्पॅनिश लढ्यामुळे हा देश काही काळ (१७९५) फ्रेंचांच्या, काही काळ (१८०१–०४) हैतीच्या आणि पुन्हा फ्रेंचांच्या ताब्यात (१८०५–०९) राहिला. १८०९ ते १८२१ पर्यंत पुन्हा स्पेनचे राज्य झाले आणि १८२१ मध्ये त्याने आपले स्वातंत्र्य जाहीर केले परंतु याच्या ११ पट वस्तीच्या हैतीने १८२२ मध्ये जिंकून १८४४ पर्यंत स्वाधीन ठेवला. या काळात हैतीच्या निग्रोंनी सांतो दोमिंगोस ‘आफ्रिकन’ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो असफल झाला. १८४४ नंतरचे स्वातंत्र्यही ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांच्या पाठबळानेच मिळाले, त्या काळात देशाचे भवितव्य मुख्यतः सांताना व बाएस या दोन नेत्यांच्या हाती होते. दोघांनाही देशाच्या सुरक्षिततेची खात्री नसल्याने १८६१ मध्ये सांतानाने पुन्हा स्पेनचे आधिपत्य स्वीकारले. तेही फार काळ टिकले नाही व १८६५ मध्ये ह्वान पाब्लो द्वार्तेच्या नेतृत्वाखाली बंड होऊन देश पुन्हा स्वतंत्र झाला. १८७० मध्ये बाएस अधिकारावर असता सांतो दोमिंगो अ. सं. सं. मध्ये सामील व्हावा असा ठराव त्याने संसदेकडून संमत करून घेतला पण तो अ. सं. सं. ने मान्य केला नाही. यानंतर अराजक सुरू झाले. १८८२ ते १८९९ पर्यंत अरो या बदफैली व क्रूर हुकूमशहाच्या उधळपट्टीने देश अवाढव्य कर्जात बुडला. शेवटी १९०५ मध्ये कर्जफेड व आर्थिक व्यवस्था अ. सं. सं.कडे देण्यात आली. त्याने जकात नाक्यांचे उत्पन्न ताब्यात घेतले. धनकोंचे हितसंबंध राखण्याकरता प्रजासत्ताकाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकारही अ. सं. सं.ला मिळाला. अ. सं. सं.च्या आग्रही व सर्वभक्षी मागण्या राष्ट्रपती कार्व्हाहालने अमान्य केल्यामुळे १९१६ ते १९२४ पर्यंत अ. सं. सं.ने देश आपल्या ताब्यात ठेवला. आर्थिक व राजकीय स्थैर्यांमुळे या काळात रस्ते, शाळा, दवाखाने वाढले व शासन कार्यक्षम झाले परंतु राजकीय गळचेपी झाली. १९२४ मध्ये राजकीय गुलामी संपली पण आर्थिक दास्य राहिले. १९४० पर्यंत जकात नाकी अ. सं. सं.च्याच हाती होता. १९३० मध्ये जनरल राफाएल लेओनीथास त्रूहीयो मोलीना राष्ट्रपती झाला व १९६१ मध्ये त्याचा खून होईपर्यंत निरनिराळे राष्ट्रपती झाले तरी तोच हुकूमशहा होता. त्याच्या कारकीर्दीत राष्ट्राची सांपत्तिक स्थिती सुधारली व किरकोळ सुखसोई वाढल्या पण राजकीय व वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णतया नष्ट झाले. विरोधकांची हकालपट्टी वा हत्या नित्याच्या झाल्या. त्याच्या खुनानंतरही हत्याकांड सुरूच राहिले ते सर्व त्रूहीयो कुटुंब आणि त्यांचे पाठीराखे देशातून परांगदा झाल्यावर अमेरिकन राष्ट्रसंघाने लक्ष घातल्याने थांबले.
यानंतर निवडणुका होईपर्य़ंत सातजणांचे कारभारी मंडळ अधिकारावर होते. डिसेंबर १९६२ मध्ये डोमिनिकन प्रजासत्ताकात पहिली निर्वेध निवडणूक पार पडली व ह्वान बॉस राष्ट्रपती म्हणून निवडून आला परंतु त्याच्या विरुद्ध १९६३ मध्ये बंड झाले. मे १९६५ मध्ये यादवीचा अतिरेक झाला. अखेर अमेरिकन राष्ट्रसंघ आणि संयुक्तराष्ट्र यांच्या मध्यस्थीने जून १९६६ मध्ये निवडणुका होऊन ह्वाकीन बालागेर राष्ट्रपती म्हणून निवडून आला. १९७० मध्ये व १९७४ मध्येही तोच पुन्हा निवडून आला.
१८४४ पासून सतत बंडे व क्रांत्या सुरू असलेल्या या देशाचे आंतरराष्ट्रीय स्थान फारसे कधीच नव्हते. अमेरिकन राष्ट्रसंघाचा सदस्य असूनही त्यातील अनेक राष्ट्रांशी त्याचे वैमनस्य राहिले व काही काळ हे प्रजासत्ताक बहिष्कृतच होते. दुसऱ्या महायुद्धात हा देश मित्र राष्ट्रांच्या बाजूला होता व नाझी छळाला बळी पडलेल्या ज्यूंना त्याने मुक्तद्वार ठेवले. संयुक्त राष्ट्रांचा तो सदस्य आहे.
राज्यव्यवस्था : १९६६ च्या संविधानानुसार राष्ट्रपती हा राष्ट्रशासक असून तोच आपले मंत्रिमंडळ नेमतो. २७ सदस्यांचे राज्यमंडळ व ७४ सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ अशी द्विसदनी संसद आहे आणि राष्ट्रपतीबरोबरच त्यांची निवडणूक सार्वत्रिक प्रौढ मताने चार वर्षांकरता होते. कारभारासाठी देशाचे २५ प्रांत केले असून राजधानी सांतोदोमिंगो समाविष्ट करणारा राष्ट्रीय जिल्हा आहे.
न्याय : राज्यमंडळाने नेमलेल्या ९ न्यायाधिशांचे सर्वोच्च न्यायालय आहे. त्याखाली अपिलाची प्राथमिक, व्यापारी, जमीनबाबींची अशी अनेकविध न्यायालये असतात. त्रूहीयोनंतर अमेरिकेचा हस्तक्षेपही नकोसा वाटतो. स्थानिक स्वराज्य, महापौर वगैरे अधिकारी लोकनियुक्त असतात, परंतु प्रांतीय पातळीवर राज्यपालांची नेमणूक राष्ट्राध्यक्षाच्या हाती असल्यामुळे हा विभागही बहुधा केंद्रसत्तेखालीच राहतो. बालागेरने सर्व राज्यपालपदी स्त्रियांची नेमणूक करून मोठी छाप पाडली.
संरक्षण : संरक्षक दलामध्ये प्रत्येक प्रौढास दोन वर्षे शिक्षण सक्तीचे आहे. ९,००० चे भूदल, ३,१०० चे नौदल व ३,००० वायुदल आहे.
आर्थिक स्थिती : स्पेनपासून स्वतंत्र होऊनही हैतीची २२ वर्षांची हुकमत आणि हुकूमशहांची उधळपट्टी यांमुळे अ. सं. सं. च्या हाती देशाचे आर्थिक जीवन गेले. तृहीयो अधिकारावर आल्यावर स्थिरता मिळाल्यामुळे कुंठित अर्थव्यवस्थेस गती मिळाली. याच वेळी नगदी पिके व निर्वाहपिके यांत समतोल राखल्याने अन्नधान्य व पशुधन या बाबतीत देश स्वावलंबी राहिला.
कृषि : देश मुख्यत्वे कृषिप्रधान असून २५,९४० चौ. किमी. शेतीयोग्य जमिनीपैकी ९,६२० चौ. किमी. च लागवडीखाली आहे. त्यापैकी निम्मी निर्वाहपिकांखाली आहे. तांदूळ , मका, रताळी, कसावा, घेवडा, भुईमूग, टोमॅटो ही प्रमुख निर्वाह पिके असून साखर, कॉफी, तंबाखू, कोको ही प्रमुख नगदी निर्यात पिके आहेत. केळी, मुसुंबी इ. फळे व भाजीपालाही होतो. आग्नेय व पूर्व भागांत मोठाले ऊस मळे आहेत. तेथेच फक्त शेतीची आधुनिक व शास्त्रीय पद्धत वापरली जाते.
पशुधनही महत्त्वाचे असून १९७३ मध्ये देशात १५,००,००० गुरे, ८७,००० मेंढ्या, ४,००,००० डुकरे, १,७०,००० घोडे आणि ७५,००,००० कोंबड्या होत्या.
जंगले : सु. १८·८% जमीन मुख्यत्वे पर्वतप्रदेशात जंगलाखाली असून मॉहॉगनी, पाइन, लॉगवुड इ. उच्च प्रतीच्या लाकडाचे उत्पन्न येते. शासन वनविकासाला उत्तेजन देते.
खनिजे : देशात लोखंड, जिप्सम, निकेल व विशेषतः बॉक्साइट ही प्रमुख खनिजे आहेत. खनिज तेल, चांदी, सोने, युरेनियम, गंधक, कोबाल्ट, मॉलिब्डिनम, शिसे, जस्त व कथिल यांचे संशोधन चालू आहे. ट्रॅव्हर्टीन, संगमरवर व तांबे यांचेही थोडे उत्पादन होते. बाराओनाजवळचा खनिजमिठाचा डोंगर हा जगातील अशा मिठाचा सर्वात मोठा साठा आहे.
शक्तिसाधने : देशात कोळसा नाही, खनिज तेल थोडे व जलविद्युत् उत्पादन अविकसित यांमुळे आयात इंधनांवर अवलंबून रहावे लागते. १९७२ मध्ये १२,०१,००० किवॉ. तास वीज उत्पन्न झाली. ताव्हेरा व व्हाल्डेसिया धरणांमुळे अनुक्रमे सीबाऊ व आग्नेय भाग येथे सिंचन व जलविद्युत् यांचा पुरवठा होईल.
उद्योगधंदे : निर्यातीच्या दृष्टीने साखर कारखाने व बॉक्साइटच्या खाणी हे महत्त्वाचे उद्योग आहेत. स्थानिक गरजा भागविण्यासाठी कापड, काचसामान, धातुसामान, चामड्याच्या वस्तू, साबण, मेणबत्त्या, दोर, लाकटी वस्तू, रंग, मद्ये, अन्नप्रक्रिया, सिमेंट इत्यादींचे कारखाने निघाले आहेत.
एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची वर्गवारी २२% शेती, १८% व्यापार, १७% निर्मितीउद्योग, १२% शासकीय व ३१% इतर अशी आहे. १९६८ मध्ये १४ लक्ष कामगारांपैकी ६१% शेतांवर, ११% विविध सेवांत, ८% निर्मितीउद्योगांत, ५% बांधकाम व वाहतूक आणि १५ % इतर व्यवसायात होते. १९६४ मध्ये १,६०,००० कामगारांच्या चार प्रमुख संघटना होत्या. मालकांच्याही संघटना आहेत. सहा दिवसांचा ४४ तासांचा कामाचा आठवडा आहे.
व्यापार : सीबाऊ विभागातील उत्पादनाच्या विक्रीचे व वितरणाचे केंद्र सँतीएगो आहे. १९७३ ची आयात ४,८५९ लक्ष पेसोंची आणि निर्यात ४,४२१ लक्ष पेसोंची होती. आयातीत अमेरिका ५९%, जपान ९% प. जर्मनी ७% आणि निर्यातीत अमेरिका ६५% अशी वाटणी होती. निर्यातीत साखर ४५%, कॉफी १०%, तंबाखू ७%, कोको ५% होते. यांशिवाय बॉक्साइट, अन्नपदार्थ, साखरेची मळी हेही निर्यात होतात. आयातीत अन्नपदार्थ, यंत्रे व त्यांचे भाग, रासायनिक पदार्थ, इंधने, लोखंड, पोलाद, कापूस व त्याचे पदार्थ, विजेची उपकरणे व उत्पादने, रबराच्या वस्तू, काच, कातडी इ. असतात.
देशाचे पेसो हे मुख्य नाणे असून त्यांचे १०० सेंतावो असतात. पेसो व अमेरिकन डॉलर एकाच किंमतीचे आहेत. १,५,१० व १०० पेसोच्या नोटा, ५०, २५, १० सेंतावोची चांदीची, ५ सेंतावोचे तांबे-निकेलचे व १ सेंतावोचे तांब्याचे अशी नाणी आहेत. १९७४ चा अर्थसंकल्प ३,८३४ लक्ष पेसोंचा संतुलित होता. जीवनमान निर्देशांक १९७० मध्ये १००, मे १९७३–१२२, मे १९७४–१४३ होता.
चलनव्यवहारावर केंद्रीय बँकेचे नियंत्रण आहे. याशिवाय शेतकी उद्योग व इतर बँकाही आहेत. परदेशी बँकांना व्यवहाराची परवानगी आहे.
वाहतूक व दळणवळण : रेल्वेची वाढ फारशी नाही. सर्व देशात फक्त २२० किमी. रेल्वे सार्वजनिक होती, ती आता बंद आहे. मात्र मळेवाल्यांच्या मालकीची १,७०० किमी. (१९७२) होती. १९७० मध्ये ६,२५० किमी. रस्ते होते. सर्व प्रमुख गावांशी बस व विमान वाहतूक आहे. दोन दूरचित्रवाणी व १२० आकाशवाणी केंद्रे असून १९७२ अखेर १,७०,००० रेडिओ, १,५०,००० दूरचित्रवाणी संच १९७४ मध्ये ८३,०६६ दूरध्वनी यंत्रांपैकी ६१,८३६ राजधानीत होती.
लोक व समाजजीवन : स्पॅनिश येण्यापूर्वी या देशात आरावाक या इंडियन जमातीची वस्ती होती. पण जुलुम व रोगराई यांमुळे ती नष्ट झाली. त्यानंतर मजूर म्हणून निग्रो गुलामांची आयात करण्यात आली. स्पॅनिश वसाहत लहान होती व इतर यूरोपीयांस अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बंदीच होती. त्यामुळे अल्पसंख्य स्पॅनिश व बहुसंख्य निग्रो यांच्या मिश्रणाने येथील बहुसंख्य समाज तयार झाला आहे.
बहुतेक लोक शेतावरील घरांतून राहतात. मुख्य आहार कोंबडी व भात हा होय. गावे व शहरे मोठ्या वस्तीची नाहीत. यूरोपीय व निग्रो मिश्रवंशीयांत प्रामुख्याने आढळणाऱ्या नृत्यनाट्यसंगीताच्या आवडीस हे लोकही अपवाद नाहीत. पाण्यातले खेळ व कोंबड्यांची झुंज ही आवडती करमणूक आहे. १९६६ मध्ये ७३ चित्रपटगृहांत ४३,४२७ प्रेक्षकांची सोय होती. २७ फेब्रुवारी ते १३ मार्च १९७४ पर्यंत सांतो दोमिंगोमध्ये बारावी सेंट्रल अमेरिकन अँड कॅरिबियन ऑलिंपिक गेम्स ही क्रीडास्पर्धा भरली होती. त्यावेळी १६ क्रीडाप्रकारांसाठी २३ देशांतील ३,००० खेळाडू आले होते. सॉकर, व्हॉलीबॉल, बॉस्केट बॉल, बेसबॉल हे खेळ लोकप्रिय आहेत.
रोमन कॅथलिक पंथ राजमान्य आहे आणि बहुतेक लोक त्याचेच अनुयायी आहेत. तथापि इतर पंथियांस आचारस्वातंत्र्य आहे.
आरोग्य : आरोग्याच्या सोयी वाढत असल्या तरी अद्याप त्या शहरांतच फक्त उपलब्ध आहेत. इतरत्र बाकीच्या अविकसित देशाप्रमाणेच अनारोग्य, अस्वच्छ राहणी, झोपडपट्ट्या इ. आढळतात. १९६७ मध्ये ४६० रुग्णालये व वैद्यकीय केंद्रे होती. त्यांत ११,३२५ खाटा होत्या. तसेच १,९३५ डॉक्टर व ५०८ प्रशिक्षित परिचारिका होत्या.
समाजकल्याण : आजारीपण, प्रसूती, वार्धक्य, दौर्बल्य इत्यादींसाठी विम्याची सोय असून त्यासाठी कामगार व मालक दोघांकडूनही वर्गणी वसूल केली जाते. अपघात विमा १९३२ पासून अंमलात आहे. नागरीकरणाबरोबरच गृहनिर्माण ही एक समस्या होऊन बसली आहे.
भाषा व साहित्य : या देशाची भाषा स्पॅनिश. त्या भाषेतील काही प्रसिद्ध लेखक डोमिनिकन आहेत त्यांत राजकारणी ह्वान बॉस साहित्यिक असून डेमोरोझी हा इतिहासतज्ञ आहे. मान्वेल दे जीझस काल्व्हान (१८३४–१९११) हा कादंबरीकार व आधुनिक काळात पेद्रो व मॅक्स एन्रीकेस उरेना हे लेखक उल्लेखनीय होत.
शिक्षण : निरक्षरतेचे प्रमाण कमी होत आहे. सात ते चौदा वर्षे वयाच्या मुलांस शिक्षण सक्तीचे व निःशुल्क आहे. तथापि त्याचा अंमल नीट होत नाही. १९७१-७२ मध्ये प्राथमिक शाळांतून ८,२०,२१५ विद्यार्थी व १४,७५२ शिक्षक माध्यमिक शाळांतून १,२२,५६५ विद्यार्थी व २,१३१ शिक्षक व्यावसायिक शाळांतून ६,९२३ विद्यार्थी व ४०९ शिक्षक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांतून ६२१ विद्यार्थी व ५१ शिक्षक आणि १९७०-७१ मध्ये उच्च शिक्षण संस्थांत १९,३३६ विद्यार्थी व १,०३८ शिक्षक होते. राजधानीत युनिवर्सिदाद ऑटोनोमा दे सांतो दोमिंगो हे १५३८ मध्ये स्थापन झालेले अमेरिका खंडातील पहिले विद्यापीठ आहे. तेथे गरीब पण हुशार विद्यार्थ्यांनाही शिक्षण मिळते. तेथेच पेद्रो एन्रीकेस उरेना हे दुसरे व सँतीएगो येथे कॅथलिक विद्यापीठ आहे.
सर्व प्रमुख गावांतून ग्रंथालये आहेत. सांतो दोमिंगोतील प्रसिद्ध ग्रंथालयात पाच लाखांवर ग्रंथ आहेत. शासनातर्फे नृत्यनाट्य, संगीत व चित्रकलेस उत्तेजन देण्याकरिता राजधानीत एक कलाकेंद्र असून त्यात देशीविदेशी कलावंतांस वाव दिला जातो. देशात सात दैनिके असून त्यांत एल् करिब हे प्रमुख आहे.
पर्यटन : सांतो दोमिंगो शहरातील प्राणी संग्रहालय व वनस्पती बगीचा जगप्रसिद्ध आहे. तसेच कोलंबसचा पुनरुद्धारित गडही प्रेक्षणीय आहे. परदेशी पर्यटकांना ३० दिवसांच्या सहलीस प्रवेश परवाना लागत नाही. उत्तर किनाऱ्यावरील प्वेर्तो प्लाता ते सामाना द्वीपकल्प आणि दक्षिणेकडील बोका चीका येथील पुळणी व विश्रामस्थाने प्रवाशांस आकर्षितात. १९७२ मध्ये १,३३,०३६ पर्यटक आले आणि त्यांनी या देशात २७९ लक्ष अमे. डॉ. खर्च केले. सांतो दोमिंगो, सँतीएगो यांखेरीज, सॅन क्रिस्तोबल, ला व्हेगा, आस्वा, बाराओना, द्वार्ते, प्वेर्तो प्लाता, सांचेस, एल् सेबो इ. मोठी आणि प्रसिद्ध शहरे आहेत.
संदर्भ : 1. Fagg. J. E. Cuba Haiti and the Dominican Republic, Englewood Cliffs, 1965.
2. Logan, R. W. Haiti and the Dominican Republic, Oxford, 1967.
शहाणे, मो. ज्ञा.
“