डोग्री साहित्य : डोग्री साहित्यास लोकसाहित्याची दीर्घ परंपरा असली, तरी आधुनिक डोग्री साहित्याची सुरुवात स्वातंत्र्योत्तर काळातीलच आहे. १९४४-४५ च्या सुमारास जम्मू येथील ‘डोग्री संस्थे’ने पुढाकार घेऊन डोग्री साहित्याच्या चळवळीस चालना दिली. डोग्री साहित्यचळवळीने आपल्या समोर पुढील उद्दिष्टे ठेवली होती : डोग्री भाषा लोकप्रिय करणे तिची ऐतिहासिक व साहित्यिक परंपरा निर्माण करून ती दृढ करणे लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन इतर भाषांतील महत्त्वाच्या ग्रंथांचे डोग्री अनुवाद आणि नवीन साहित्यनिर्मिती करणे. सामान्यतः स्वातंत्र्योत्तर काळातील डोग्री साहित्यातील प्रयत्न वरील उद्दिष्टांनी प्रेरित व प्रभावित झालेले आहेत. कविसंमेलन, साहित्यिक गप्पा, चर्चासत्रे, व्याख्याने, परिषदा इ. आयोजित करण्याचे तसेच प्राचीन डोग्री परंपरांचा शोध घेण्याचे प्रयत्न होत आहेत. ऐतिहासिक आख्यायिकांतील डोग्रा वीरांच्या जीवनावर आधारित अशा रचना आरंभीच्या काळात होऊ लागल्या. ह्या वीरांत बाबा जित्तो, दत्त रानू, दीदो, गुलाब सिंग इत्यादींचा समावेश होतो. डोग्री लोकसाहित्याचे खंड प्रकाशित झाल्याने विषय, कथानके, शब्द, भाषाशैली, अभिव्यक्तिपद्धती इत्यादींचा एक समूह स्रोत नव्या लेखकांना उपलब्ध झाला. अनुवादित ग्रंथांनीही हीच कामगिरी बजावली. ह्या प्रयत्नांमुळे डोग्रा लेखकांना विशेष स्फूर्ती मिळाली. 

आरंभीच्या काळातील आधुनिक डोग्री साहित्य म्हणजे दत्तू, लक्खू, गंगाराम, रामधन इत्यादींच्या फुटकळ गीत-काव्यरचना होत. हरदत्त यांची डोग्री भजनमाला (२ खंड) उल्लेखनीय आहे. ह्या भजनमालेमुळे डोग्री साहित्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकापर्यंत मागे नेता येईल. तत्पूर्वीही १८१८ मध्ये सेरामपूर मिशनने नव्या कराराचे तसेच काही ‘गॉस्पेल्स’चे व इतर ख्रिस्ती ग्रंथांचे डोग्रीत अनुवाद केले होते. भगवद्‌गीतेचेही डोग्रीत प्रा. गौरी शंकर तसेच पंडित गौरी शंकर यांनी अनुक्रमे गद्य व पद्य अनुवाद केले होते.

गुत्तलुन हा दिनू भाई पंत यांचा काव्यसंग्रह १९४५ मध्ये प्रसिद्ध झाला, ही डोग्री साहित्येतिहासातील विशेष महत्त्वपूर्ण घटना होय. डोग्री काव्यास त्यामुळे जनमानसात मान्यता तर मिळालीच पण डोग्रीत रचना करण्याची अनेकांना स्फूर्तीही लाभली. ह्या लोकप्रिय संग्रहातील ‘शहर पेहलो गे’ ही पहिली कविता तर जम्मूतील घराघरांत घुमू लागली. दिनू भाईंनी या लहानशा संग्रहात प्रचलित समाजस्थिती आणि लोकांच्या भावभावना शब्दांकित केल्या. स्थानिक बोलींचा वापर, मार्मिक विनोद व सौम्य उपरोध यांनी त्यांची अभिव्यक्ती नटलेली आहे. मंगु दी छबिल हा त्यांचा दुसरा काव्यग्रंथ, एक दीर्घकाव्य आहे. सरंजामदारी पिळवणुकीचे हृद्य चित्रण त्यात आढळते. १९४७ मध्ये त्यांनी वीर गुलाब हे काव्य ‘बार’ म्हणजे पारंपरिक वीरगीताच्या धर्तीवर लिहिले. पहला फुल्ल हा बी. पी. साठे यांचा कथासंग्रह डोग्रीतील पहिलाच कथासंग्रह होय. आपल्या कथांत त्यांनी ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे.

जागो दुग्गर  (१९४९) हा डोग्रीतील बारा कवींच्या निवडक कवितांचा तसेच डोग्री लोकगीतांचा संग्रह आहे. यांपैकी यश शर्मा, परमानंद अलमस्त यांची गीते उत्कृष्ट आहेत. वेद पाल दीप व रामनाथ शास्त्री यांच्या कवितेत संवेदनशीलता व अभिव्यक्तीची परिपक्वता आढळते. एकूण जागो दुग्गरमधील कवितेत आत्मशोधनाचा प्रयत्न दिसत असला, तरी भावविवशता, आलंकारिकता यांचा अतिरेक तसेच विषयांचे वैविध्य, अनुभवाची खोली यांचा अभावच जाणवतो. 

डोग्री साहित्याच्या विस्ताराचा काल म्हणून १९५०–६० ह्या दशकाचा निर्देश करावा लागेल. ‘डोग्री संस्थे’च्या जोडीला ह्या काळात अनेक शासकीय व खाजगी संस्था स्थापन होऊन त्या साहित्यविकासास हातभार लावू लागल्या. नमी चेतना हे डोग्रीतील पहिले मासिकही सुरू झाले. डोग्री कविता तसेच डोग्री लोकसाहित्यावरील लेख विविध संस्थांच्या वार्षिकांतून प्रसिद्ध होऊ लागले. दुनी चंद यांचा डोग्री लोकगीतांवरील दर्जेदार समीक्षापर लेखांचा संग्रह तसेच ब्रह्मानंद संकीर्तन हा ग्रंथ पब्लिकेशन डिपार्टमेंटने प्रसिद्ध केला. जम्मू अँड काश्मीर अकॅडमीने (जे–के अकॅडमीने) डोग्री काव्याचे पाच खंड प्रकाशित करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले. ह्याच काळात गीतेचे आणखी दोन पद्यानुवाद, पाच कथासंग्रह, आठ लोकगीतांचे व लोककथांचे संग्रह, तीन नाटके हे साहित्य प्रकाशित झाले. जम्मू येथून एक हा राजा हा डोग्री लोककथांचा संग्रह तसेच जित्तोची कथा अमर कथा नावाने प्रसिद्ध झाली. १९५६ मध्ये जम्मू व कांग्रा येथून आणखी दोन लोकगीतसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांची नावे अनुक्रमे खारे मिठ्ठे अथ्रूँ (संकलन-संपादन, सुशीला कलाथिआ) आणि फोक साँग्ज ऑफ कांग्रा (संकलन-संपादन, एम्. एस्. रंधावा) ही होत. बन्सीलाल गुप्तांनी संपादित केलेला डोग्री लोककथा हा संग्रहही याच काळात प्रसिद्ध झाला. १९६० मध्ये हिमाचल प्रदेश सरकारने लोकप्रिय अशा निवडक ८७ गीतांचा एक संग्रह प्रसिद्ध केला. 

धार्मिक प्रकारच्या डोग्री साहित्यात गीतेचे आणखी दोन पद्यानुवाद, वेदान्तपर पाच पदसंग्रह, कांग्रा येथील मेजर ब्रिज लाल यांच्या स्तोत्रांचे तीन संग्रह, सत्यनारायण व्रतकथा इत्यादींचा समावेश होतो. यांतील महत्त्वाची रचना स्वामी ब्रह्मानंद यांची आहे. वयाच्या साठाव्या वर्षी पदरचनेस सुरुवात करून त्यांनी पाच-सहा वर्षांत अनेक धार्मिक पदे रचिली. ब्रिज लाल यांच्या स्तोत्रांच्या तीन संग्रहांत राधास्वामी पंथाचे तत्त्वज्ञान साध्या-सरळ पहाडी बोलीत आले आहे.  


स्वातंत्र्योत्तर काळापासून तो १९५९ पर्यंतच्या काळात रचिलेल्या डोग्री काव्याची पाच संकलने जेके अकॅडमीने क्रमशः ‘डोग्री पोएट्स अँड देअर पोएट्री’ ह्या मालेत प्रसिद्ध केली (१९५९). त्यात प्रत्येक कवीचा परिचय, देवनागरी लिपीत त्याची रचना आणि तिचा हिंदी अनुवाद आहे. प्रत्येक संकलनाचे नावही अर्थपूर्ण व प्रतीकात्मक आहे. निहारिका ह्या पहिल्या संकलनात दत्तू, हरदत्त इ. आरंभीच्या नऊ कवींच्या रचना आहेत. दुसरे संकलन अरुणिमा हे असून त्यात रघुनाथ सिंग संन्याल, किशन समैलपुरी व परमानंद अलमस्त ह्या तीन ज्येष्ठ कवींच्या कविता आहेत. डोग्री काव्याचा उषःकाल ह्या तीन कवींच्या रचनांनी होतो तर प्रातःकिरण ह्या संकलनातील दिनू भाई पंत, रामनाथ शास्त्री व शंभूनाथ यांच्य रचनांनी डोग्री काव्याचा सूर्योदय होतो. चौथे संकलन मधुकण असून त्यात केहरी सिंग मधुकर, वेद पाल दीप व पद्मा ह्या तरुण, आशावादी, जोमदार कवींच्या रचना आहेत. शेवटचे संकलन मागधूलि. यात यश शर्मा, ओंकार सिंग आवारा आणि तारा समैलपुरी ह्या नवोदित कवींच्या दर्जेदार रचना आहेत. डोग्री कवींच्या प्रतिभेचा मनोज्ञ आविष्कार त्यांच्या ह्या संकलनांतील रचनेत दिसतो. निसर्गसौंदर्य, समाजजीवनाचे चित्रण, प्रेमसाफल्य, दैनंदिन जीवनातील ताणतणाव, विषमता, पिळवणूक, सामाजिक अधःपात, वंचना इत्यादींचा शोध त्यांनी आपल्या रचनांत शब्दांकित केलेला आहे. काही कवितांत स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचा व भावविवशतेचा अतिरेक तसेच रांगडी उत्स्फूर्तता व घोषणाबाजीही आढळते. उर्दू व हिंदीतील सवंग लोकप्रिय रचनेचेही काहींनी अनुकरण केल्याचे दिसते. ह्या संकलनांतील किशन समैलपुरी, परमानंद अलमस्त, यश शर्मा यांची गीते डोग्री लोकगीतांशी आपले नाते जोडताना आणि त्यांच्या चाली, त्यांतील अवीट गोडी व लय नेमकेपणाने आत्मसात करताना दिसतात. ही गीते स्वच्छंदतावादी वृत्तीने ओतप्रोत भरलेली आहेत. शंभूनाथ यांनी परंपरेच्या व रूढीच्या बंधनांत जखडलेल्या डोग्रा समाजाचे मार्मिक चित्रण केले. तारा समैलपुरी यांनी नेहमी दुष्काळग्रस्त असलेल्या कंडी विभागातील बाराही महिन्यांचे सुंदर चित्रण केले आहे. दुसऱ्या महायुद्धात अतुल पराक्रम गाजवलेल्या एका सेवानिवृत्त सैनिकाची दुर्दशा व दुःख चित्रित करणारी त्यांची कविता परिणामकारक आहे. ओंकार सिंग आवारा यांची कविता भावविवश व स्वच्छंदतावादी आहे पण त्यांची निसर्गकविता मात्र वेधक आहे.

दिनू भाई पंत, रामनाथ शास्त्री, मधुकर, वेद पाल दीप व पद्मा यांच्या रचनेत डोग्री काव्याचे खरे उत्फुल्ल रूप पहावयास मिळते. या सर्वांच्याच काव्यात सखोल सामाजिक जाणीव आणि वैचारिक व कलात्मक परिपक्वता आढळते. वेद पाल दीप व दिनू भाई पंत हे दलितांचे कैवारी कवी असून तशी बांधिलकीही त्यांनी स्वीकारलेली आहे. संवेदनशीलता, अर्थसघन शब्दांची निवड, सौंदर्यदृष्टी, परिणामकारक आशयाभिव्यक्ती इ. त्यांची वैशिष्ट्ये होत. रामनाथ शास्त्री यांची कविता अधिक वैचारिक असून समाजाविषयी त्यांना अपार सहानुभूती आहे. पद्मा ह्यांच्या कवितेत वैचारिक परिपक्वता असून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगावयास हरकत नाही. मधुकर यांची कविता ओसंडून वाहणाऱ्या नदीसारखी भावनेने ओथंबलेली आहे.

डोग्री काव्याचे १९६०–७० ह्या दशकात सु. १०० लहानमोठे काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले. समाजाच्या विविध स्तरांतील कवींनी ह्या कविता लिहिल्या. अर्थातच यांतील बरीच कविता मामुली दर्जाची असून फारच थोडी उच्च प्रतीची आहे. दिनू भाई पंत, यश शर्मा ह्या आधीच्या कवींची निर्मिती या दशकात जवळजवळ थांबली. रामनाथ शास्त्रींची काव्यनिर्मिती मात्र विपुल व गुणवत्तेनेही चांगली आहे. शंभूनाथ, वेद पाल दीप, परमानंद अलमस्त, पद्मा आणि मधुकर यांचा प्रत्येकी एकेक संग्रह या काळात प्रसिद्ध झाला. नव्या कवींत रामलाल शर्मा, चरण सिंग, नरसिंग देव जंवाल, मोहनलाल सपोलिया, शिवदीप, पीयूष गुलेरी आणि गौतम व्यथित यांचा प्रत्येकी एक वा दोन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘गझल’ रचना या दशकात विशेष लोकप्रिय झाली आणि बहुतेक कवींनी गझलप्रकारात आपली रचना केली. वेद पाल आणि नरसिंग देव (एन्. डी.) जंवाल यांनी आपले गझलसंग्रह प्रसिद्ध केले. वेद पाल दीप हे यशस्वी गझलकार असून त्यांना ‘डोग्रीचे गालिब’ म्हटले जाते. शंभूनाथ यांचे डोग्री रामायण ही डोग्री काव्यात पडलेली मोलाची भर आहे. परमानंद अलमस्त यांचे एक बूंदैगी तरसाइं पैंछी (नागरी लिपीत) आणि सुनक (फार्सी लिपीत) हे संग्रह होत. मधुकर यांचा दोला कूं थप्पेआ हा दर्जेदार संग्रह आहे. पद्मा यांच्या मेरी कविता मेरे गीत ह्या संग्रहास १९७१ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला. पीयूष गुलेरी यांचा मेरा देश म्हाचल हा संग्रह आणि गौतम व्यथित यांचा चेते (१९६९) हा संग्रह यांतील प्रेरणा कांग्रा प्रदेशातील लोकगीतांची असून रचनाही त्याच धर्तीवर आहे. शिव दीप, मोहनलाल सपोलिया व चरण सिंग यांची कविताही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आर्. एन्. शास्त्री यांचा धरती दा रिन (१९७१), ओ. पी. शर्मा यांचा तन्दान आणि एन्. डी. जंवाल यांचा कोराज हे अलीकडील दर्जेदार काव्यसंग्रह होत. जयदेव किरण यांचा पथ्थरो-रे-मन्हु, रिखी भरद्वाज यांचा कूंजन दी कूक हे अलीकडील कांग्रा प्रदेशातील कवींचे उल्लेखनीय संग्रह होत. धारें दे अले हा जम्मूच्या डोंगराळ प्रदेशातील दहा कवींच्या व एका कवयित्रीच्या अलीकडील कविता, गीत व गझलरचनांचा संग्रह आहे. यांतील पुरुरवा, बिशन दास दुबे, बाँके बिहारी यांची रचना सरस आहे. मेरियाँ डोग्री गझलाँ हा कृष्ण समैलपुरी यांचा गझलसंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण आहे. जीतेंद्र उधमपुरी यांचा चाननी हा संग्रह हिंदीतील जयशंकर प्रसाद यांच्या आँसूच्या धर्तीवर रचलेल्या कवितांचा प्रयोग आहे. अश्विनी मंगोत्रांचा खुबतियाँ हा गझलसंग्रहही अपेक्षा उंचावणारा आहे. शब्दांची व लयीची चांगली जाण व अभिव्यक्तीतील जोम ही त्यांची वैशिष्ट्ये. 

कथा, कादंबरी, नाटक इत्यादी : डोग्री कथा-कादंबरी-नाटकादींचा हळूहळू विकास होत असल्याचे दिसते. १९५०–६० ह्या दशकात सात कथालेखकांचे पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले. धरम चंद प्रशांत यांनी डोग्री आख्यायिका व लोकसाहित्यातील विषय यांवर आधारित कथा लिहिल्या. ललिता मेहता यांनी ग्रामीण स्त्रियांच्या जीवनावर आदर्शवादी भूमिकेतून कथालेखन केले. कविरत्न यांनीही याच भूमिकेतून कथालेखन केले. रामकुमार अब्रोल, मदन मोहन शर्मा व नरेंद्र खजुरिया ह्यांनीही चांगले कथालेखन केले. सामाजिक सुधारणेची कळकळ त्यांच्या कथांत प्रतिबिंबित झालेली आहे. वेद राही यांच्या कथांत सखोल मानवतावाद, मानसशास्त्रीय दृष्टिकोन व आकर्षक रचनातंत्र यांचा आढळ होतो. मदन मोहन हे डोग्रीतील श्रेष्ठ कथाकार असून दुध, लहु ते जहर हा त्यांच्या पाच उत्कृष्ट कथांचा संग्रह विशेष महत्त्वाचा आहे. त्यांच्या कथांत सामाजिक परिवर्तनातील आवेग आणि त्यात ढासळणारी जीर्ण पारंपरिक जीवनमूल्ये यांचे कलात्मक चित्रण आढळते. व्यक्तींचे सूक्ष्म मनोव्यापारही ते चित्रित करतात. नरेंद्र खजुरियांनी आपल्या कथांत ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण केले. एन्. डी. जंवाल, वत्स विकल, शिवकुमार शर्मा, चंचल शर्मा, ओ. पी. शर्मा, बंधू शर्मा, यांनी नव्या डोग्री कथेचे व नवोदित कथाकारांच्या गटाचे नेतृत्व केले. नरेंद्र खजुरिया व मदन मोहन यांनी आपले प्रत्येकी दोन कथासंग्रह प्रसिद्ध करून डोग्रीतील उत्तम कथांचा आदर्श घालून दिला. ह्या दोघांच्याही कथांत सखोल मानवतावाद, मानसशास्त्रीय दृष्टिकोन, सामाजिक जाणीव तसेच परिणामकारक व काव्यात्म भाषा ही वैशिष्ट्ये आढळतात. नरेंद्र खजुरियांच्या ऐन तारुण्यातील निधनाने डोग्री साहित्याची फार मोठी हानी झाली. त्यांच्या नील अंबर काले बादल ह्या कथासंग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मरणोत्तर लाभला (१९७०). ओ. पी. शर्मा यांचे सुक्का बारुद (१९७१) व लोक गै लोक (१९७१) हे कथासंग्रह आणि ओम् गोस्वामी यांचे नैन्ह ते पोते (१९७१) व हाशिये दे नोट्स हे कथासंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रामनाथ शास्त्री यांचा बदनामी दी छन व बंधू शर्मांचा परशामे हे कथासंग्रहही उल्लेखनीय होत. 


डोग्री कादंबरीलेखनाची सुरुवात साधारणतः एकाच वेळी प्रसिद्ध झालेल्या तीन कादंबरिकांनी झाली. नरेंद्र खजुरियांची शानो, मदन मोहन यांची धाराँ ते धूराँ आणि वेद राही यांची हार देरि ते पत्तन ह्या त्या तीन कादंबरिका होत. ह्या तिन्हींतही ग्रामीण जीवनाचे चित्रण आहे. फूल बिना डाली ही वत्स विकल यांची उत्कृष्ट कादंबरी असून तिला साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला (१९७२). तीत एका लहानशा डोग्रा नगरातील जीवनाचे कलात्मक चित्रण आहे. वत्स विकल यांच्या निधनानेही डोग्री साहित्याची मोठी हानी झाली. पिशोरीलाल गुप्ता यांची जिस ऐल्लइ न्हेरा पेयि गया आणि शकुंतला शर्मांची बद-सीस ह्या अलीकडील कादंबऱ्या होत. यांतील शकुंतला शर्मांची कादंबरी त्यातल्या त्यात बरी आहे. 

जम्मू आकाशवाणीमुळे डोग्री नभोनाट्यलेखनास चांगले उत्तेजन मिळाले. पूर्वी बाबा जित्तोचे रंगभूमीवर यशस्वी प्रयोग झाल्यामुळे नाट्यलेखनासही प्रोत्साहन मिळाले. बारोबारी (रामनाथ शास्त्री) आणि देव जनम  (डी. सी. प्रशांत) ही नभोनाट्ये फार गाजली व ग्रंथरूपाने प्रसिद्धही झाली. रामनाथ शास्त्री, दिनू भाई पंत आणि रामकुमार अब्रोल यांनी संयुक्तपणे नमा ग्रान आणि वेद राही यांनी धारें दे अथ्रूँ  ही स्वतंत्र नाटके लिहिली. पहिल्याचा विषय ग्रामसुधारणा असून ते सपाट व सरळ सरळ बोधवादी आहे. वेद राहींचे नाटक मात्र कलादृष्ट्या अधिक सरस आहे. १९६०–७० ह्या काळातील दिनू भाई पंत यांचे सरपंच आणि रामकुमार अब्रोल यांचे देहरी ही दोन नाटके महत्त्वपूर्ण होत. प्रेमचंद यांच्या मूळ हिंदी कथेचे देहरी हे नाट्यरूपांतर आहे. ह्या दशकात सु. तीस एकांकिका व नभोनाट्ये लिहिली गेली. सरपंचचे रंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग झाले. मधुकर यांनी लेहराँ हे पद्यनाट्य लिहिले असून त्यात आख्यायिकेतील कुंजू आणि चैंचलो यांची प्रेमकथा रंगविली आहे. एक जनम होर हा मदन मोहन यांच्या निवडक पाच एकांकिकांचा संग्रह असून जनावर हे त्यांचे रंगभूमीसाठी लिहिलेले नवे प्रभावी आणि धीट नाटक आहे. एन्. डी. जंवाल यांचे मंडलिक  हे गुग्गा याच्या लोकप्रिय आख्यायिकेस दिलेले नाट्यरूप आहे तथापि ते मनाची पकड घेत नाही. 

डोग्रीतील कथा, कादंबरी, नाट्यादी साहित्यनिर्मितीचा आढावा घेतल्यानंतर इतर प्रकारच्या गद्यलेखनाचा थोडक्यात निर्देश करणे उचित ठरेल. श्याम लाल शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. शक्ती शर्मा यांचा त्रिवेणी हा उत्कृष्ट निबंधसंग्रह १९६१ मध्ये प्रसिद्ध झाला. रेखा, शिराझ  (जे–के अकॅडमीचे त्रैमासिक मुखपत्र), नमी चेतना तसेच महाविद्यालयांची वार्षिके यांनी डोग्री गद्याच्या विकासास चांगला हातभार लावला. नियतकालिकांतील दर्जेदार लेखांचे काही संग्रहही निघाले. त्यांत लक्ष्मीनारायण यांचा कंड्यारी दे फूल्ल आणि विश्वनाथ खजुरिया यांचा दुग्गर दा जीवनदर्शन उल्लेखनीय आहेत. डोग्री साहित्यदर्पण हा १९६७ मध्ये जम्मूस भरलेल्या पहिल्या डोग्री लेखकांच्या परिषदेत वाचलेल्या निबंधांचा (पेपर्स) संग्रह आहे. लक्ष्मीनारायण यांचा साहित्य चर्चा हा ग्रंथही महत्त्वपूर्ण आहे. चंचल शर्मा आणि चंपा शर्मा यांनी डोग्री काव्यचर्चा हा समीक्षाग्रंथ लिहिला. विश्वनाथ खजुरियांचा सप्तक हा दुसरा निबंधसंग्रहही उल्लेखनीय आहे. डोग्री पत्रकार मुल्क राज अरफ यांनी लाला हंसराज यांचे चरित्र लिहून डोग्री चरित्रलेखनाचा पाया घातला. प्रवासवर्णने, आठवणी, चालू घडामोडींवरील स्फुट लेखन इ. प्रकारांतही थोडेफार लेखन झाले आहे. बाल साहित्याच्या दृष्टीने नरेंद्र खजुरिया यांचा रोचक कहानियाँ हा कथासंग्रह आणि अस भाग जगाने आले आन  हा एकांकिकासंग्रह उल्लेखनीय आहे. आधुनिक भारतीय भाषांतील तसेच संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, रशियन इ. भाषांतील काही ग्रंथांचे डोग्रीत अनुवादही झाले आहेत. 

साहित्य अकादेमीने ऑगस्ट १९६९ मध्ये डोग्रीस आधुनिक भारतीय भाषा म्हणून मान्यता दिली आणि त्यामुळे डोग्री साहित्यनिर्मितीस जोराची चालना मिळाली. जे–के अकॅडमीने डोग्री लोकगीतांचे सहा आणि लोककथांचे चार संग्रह प्रसिद्ध केले. डॉ. करण सिंगांनी शॅडो अँड सनलाइट हा डोग्री लोकगीतांचा संग्रह इंग्रजीत प्रसिद्ध केला. जे–के अकॅडमीने ५०० डोग्री म्हणींचा तसेच ६,००० डोग्री वाक्प्रचारांचा कोश प्रकाशित केला आहे. हे दोन्ही कोश तारा समैलपुरींनी संकलित–संपादित केले आहेत. जे–के अकॅडमीने अनुवादासाठीही बरेच आर्थिक साहाय्य देऊन डोग्री साहित्याच्या प्रगतीस हातभार लावला आहे. डोग्रीतील सु. ३५ बोलींचा समन्वय साधणे, पाठ्यपुस्तकांची व संदर्भग्रंथांची निर्मिती करणे, ज्ञानविज्ञानाची परिभाषा तयार करणे इ. प्रश्नही डोग्री लेखकांना सोडवावयाचे आहेत. 

संदर्भ : 1. Sharma, Neelamber Dev, An Introduction to Modern Dogri Literature, Jammu, 1965.

            2. Shivanath, Dogri Language and Literature- a Brief Survey, Jammu.

सुर्वे, भा. ग.