डेसाइट : (क्वॉर्ट्‌झ अँडेसाइट). ज्वालामुखी खडकांच्या एका गटाचे नाव. डेसाइट घट्ट असून त्यांचे संघटन ⇨ रायोलाइट आणि ⇨ अँडेसाइट या खडकांच्या मधले असते. यात प्रमुख्याने फेल्स्पार हे खनिज असून ऑर्थोक्लेजापेक्षा प्लॅजिओक्लेज फेल्स्पार जास्त असते. यातील प्लॅजिओक्लेज बहुधा सोडायुक्त असते. मुक्त सिलिका, हॉर्नब्लेंड, ऑजाइट, कृष्णाभ्रक ही गौण खनिजे यात असतात. फेल्स्पार व क्वॉर्ट्‌झ यांचे मोठे स्फटिक सूक्ष्मकणी वा काचमय आधारकात असतात म्हणजे याचे वयन (पोत) पृषयुक्त असते. त्याशिवाय यामध्ये प्रवाही, मौक्तिक (मोत्यासारखे) अथवा फेल्साइटासारखे वयनही आढळते. क्वचितच डेसाइट पूर्णपणे काचमय (डेसाइट पिचस्टोन) असतो. अरुंद भित्ती, शिलापट्ट, लाव्हा प्रवाह व क्वचित मोठी अंतर्वेशने (इतर खडकांत घुसलेल्या राशी) या रूपांत डेसाइट आढळतो. त्याच्या जोडीने ऑलिव्हीन बेसाल्ट, अँडेसाइट, रायोलाइट, ट्रॅकाइट इ. खडक आढळतात. तो रूमानिया, स्कॉटलंड, स्पेन, ग्रीस, हंगेरी इ. देशांत आणि भारतात पावागड व गिरनार टेकड्यांत आढळतो. यातील क्षार (अल्कली) फेल्स्पार ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास क्वॉर्ट्‌झ लॅटाइट, क्वॉर्ट्‌झ कमी झाल्यास अँडेसाइट व बृहत्स्फट (मोठे स्फटिक) विपुल असल्यास डेसाइट पॉर्फिरी हे खडक बनतात. डेसिया नावाच्या रोमन (हल्ली हंगेरीत) परगण्यातील लाव्ह्यासाठी जी. स्टाची यांनी ही संज्ञा वापरली (१८६३).

पहा : अग्निज खडक.

ठाकूर, अ. ना.