डेली, रेजिनल्ड ऑल्डवर्थ : (१९ मे १८७१–१९ सप्टेंबर १९५७). अमेरिकन भूवैज्ञानिक. अग्निज पिंडांचे आकार आणि अग्निज खडकांची अभिस्थापना (ठराविक स्थितीत ठेवले जाण्याची क्रिया), रासायनिक संघटन व उत्क्रांती यांविषयी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म नॅपनी (कॅनडा) येथे आणि शिक्षण टोराँटो, व्हिक्टोरिया व हार्व्हर्ड विद्यापीठांत झाले. हायड्लबर्ग व पॅरिस येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले (१८९६–९८). त्यांनी कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सर्वेक्षणाचे भूवैज्ञानिक (१९०१–०७), मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भूविज्ञानाचे (१९०७–१२) व हार्व्हर्ड विद्यापीठात भूविज्ञानाचे स्टर्जिस-हूपर प्राध्यापक (१९१२–४२) म्हणून काम केले. ते अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते.
अग्निज खडक कोणत्या प्रकारांनी अभिस्थापित होतात, बॅथोलिथाची (एका अग्निज राशीची) वैशिष्ट्ये, समस्थायित्वाचे [भूखंडे व महासागर तळ हे भूकवचाचे प्रमुख घटक जलस्थैतिक साम्यावस्थेत असण्याच्या आदर्श स्थितीचे ⟶ समस्थायित्व] विवरण, हिमनद्यांची उत्पत्ती तसेच त्यांच्या वितळण्याने समुद्रपातळीत होणारी वाढ आणि त्यामुळे होणारे पोवळ्यांच्या शैलभित्तीचे नियंत्रण व कंकणद्वीपांची निर्मिती भूकवचाचे व पृथ्वीच्या अंतरंगाचे बल, समुद्रातील दऱ्यांची उत्पत्ती इ. विषयांत त्यांनी संशोधन केले. पोकळीमध्ये शिलारस घुसून तयार होणाऱ्या अनियमित अग्निज राशीला त्यांनीच ‘कोनोलिथ’ ही संज्ञा सुचविली आहे.
त्यांनी संशोधनात्मक पुष्कळ लेख व अनेक पुस्तके लिहिली असून त्यांची पुढील पुस्तके महत्त्वाची आहेत : द ओरिजीन ऑफ इग्निअस रॉक्स (१९१४), अवर मोबाइल अर्थ (१९२५), इग्निअस रॉक्स अँड द डेप्थस ऑफ द अर्थ (१९३०), द चेंजिंग वर्ल्ड ऑफ द आइस एज (१९३४), आर्किटेक्चर ऑफ द अर्थ (१९३४), स्ट्रेंग्थ अँड द स्टक्चर ऑफ द अर्थ (१९४०) आणि फ्लोअर ऑफ द ओशन (१९४२). ते केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.