डेल, हेन्री हॅलेट : (९ जून १८७५ – २२ जुलै १९६८). ब्रिटिश शारीरक्रियाविज्ञ. तंत्रिका आवेग प्रेषणातील (मज्जेत एका ठिकाणी उत्पन्न झालेली चेतना दुसरीकडे वाहून नेली जाताना होणाऱ्या) रासायनिक कार्यासंबंधीच्या संशोधनाबद्दल वैद्यक किंवा शारीरक्रियाविज्ञानाचे १९३६ चे नोबेल पारितोषिक त्यांना ⇨ ओटो लव्ही यांच्या समवेत विभागून मिळाले.
त्यांचा जन्म लंडन येथे झाला. केंब्रिज विद्यापीठ व सेंट बारथॉलोम्यू रुग्णालयात त्यांचे शिक्षण झाले. ते १८९७ मध्ये एम्.ए. व १९०३ मध्ये एम्.डी. झाले. वेलकम फिजिऑलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये औषधिक्रियातज्ञ म्हणून काम करीत असताना राय धान्यावरील अरगट या कवकाची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीची) रासायनिक संरचना व शरीरावरील परिणाम यासंबंधी संशोधन करीत असताना हिस्टामिनाचा (अरगटाच्या अर्कामधील एक घटक) शस्त्रक्रियेच्या वेळी येणारा अवसाद (तीव्र स्वरूपाच्या दुखापतीनंतर सर्व देहात दिसून येणारी तीव्र अस्वस्था, शॉक) आणि अत्यिधहर्षण (शरीरांतर्गत नसलेल्या एखाद्या प्रथिनासंबंधीने अतिसंवेदनक्षमता असणे) यावरील परिणाम याच्या संशोधनाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. लवकरच त्यांना ‘ॲसिटीलकोलीन’ या नव्या पदार्थाचा शोध लागला आणि हा पदार्थ व तंत्रिका आवेग यांचा संबंधही त्यांच्या लक्षात आला. प्राणेशा तंत्रिकेमधील (मेंदूपासून निघाणाऱ्या दहाव्या मज्जेतील) संवेगामुळे एक रासायनिक पदार्थ उत्पन्न होतो असे ओटो लव्ही यांनी १९२० मध्ये सिद्ध केले. हा पदार्थ ॲसिटीलकोलिनासारखाच असल्याचे डेल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तंत्रिका आवेगामुळे ॲसिटीलकोलिनाचा स्राव होतो व या स्रावामुळे तंत्रिका संयोजनातून (मज्जा यंत्रणेतून) संवेदना पोहोचविल्या जातात, हे सिद्ध केले.
लंडन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी १९२८–४२ मध्ये काम केले. त्याआधी त्यांनी ब्रिटिश मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या जीवरसायनशास्त्र व औषधिक्रियाविज्ञान या विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते (१९१४).
रॉयल सोसायटी, ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन या संस्थांचे ते अध्यक्ष होते. दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे व अणुऊर्जा सल्लागार समितीचे सदस्य होते. १९३२ मध्ये नाइट हा किताब, १९४४ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान, तसेच इतर अनेक बहुमान त्यांना मिळाले. त्यांनी अनेक शास्त्रीय निबंध लिहिले असून ॲडव्हेंचर्स इन फिजिऑलॉजी (१९५३) व ॲन ऑटम ग्लिनींग (१९५४) हे ग्रंथ लिहिले. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.
कानिटकार, बा. मो.