डेन्व्हर : अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्याची राजधानी. कॅनझस सिटीच्या वायव्येस ८९१ किमी. अंतरावर दक्षिण प्लेट व चेरी क्रीक यांच्या संगमावर १,६१० मी. उंचीवर वसले आहे. लोकसंख्या उपनगरांसह १०,४७,३११ (१९७०). याच्या परिसरात सोने आणि चांदीच्या खाणी आहेत. धातू शुद्ध करण्याच्या भट्ट्या, यंत्रे, रबरी वस्तू इत्यादींचे कारखाने आहेत. गुरे, मेंढ्या आणि शेतमालाची ही मोठी बाजारपेठ आहे. दळणवळण, उद्योगधंदे व व्यापार यांचे हे केंद्र आहे. डेन्व्हर विश्वविद्यालय, इलिफ धर्मशास्त्र विद्यालय, स्त्रियांचे पदवीपूर्व महाविद्यालय, डेन्व्हर कला संग्रहालय, राज्य ऐतिहासिक संग्रहालय, सार्वजनिक ग्रंथालय, नाट्यगृह, प्राणिसंग्रहालय, नाविक तळ, लौरी विमानतळ, खाणकाम विद्यालय इ. शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहेत.
लिमये, दि. ह.