डिस्प्रोशियम : विरल मृत्तिका गटातील एक धातुरूप मूलद्रव्य [⟶ विरल मृत्तिका]. चिन्ह Dy अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६६ ⇨ आवर्त सारणी गट ३ अणुभार १६२·५० विद्युत् विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, २८, ८, २ समस्थानिक (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) एकूण ७, त्यांचे अणुभार व शेकडा प्रमाण : १५६ (०·०५२), १५८ (०·०९०), १६० (२·२९४), १६१ (१८·८८), १६२ (२५·५३), १६३ (२४·९७), १६४ (२८·१८). वि. गु. [घन संकुलित षट्‌कोणी प्रकाराचे ⟶ स्फटिकविज्ञान] ८·५३६ वितळबिंदू १,४०७° से. उकळबिंदू (सु.) २,६००° से. संयुजा (इतर अणूंशी व अणुगटांशी संयोग होण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३ पाणी व हवा यांच्यामुळे ⇨ ऑक्सिडीभवन होते भूकवचातील प्रमाण ७ X १०–५% सामान्य तापमानाला समचुंबकीय, तापमान कमी करीत नेल्यास १७८° के. ला (नील बिंदूला) प्रतिलोहचुंबकीय व ८५° के. ला (क्यूरी बिंदूला) लोहचुंबकीय होते [⟶ चुंबकत्व] अतिनीच तापमानास (विद्युत्) अतिसंवाहक [⟶ अतिसंवाहकता].

 लकॉक ब्वाबोदाँ पॉल एमील या शास्त्रज्ञांनी या धातूचा १८८६साली शोध लावला परंतु ती काहीशा शुद्ध स्वरूपात १९०६ मध्ये जी. अर्बेन यांनी मिळविली. डिस्प्रोशिटॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘मिळण्यास कठीण’ असा असून त्यावरून या धातूस डिस्प्रोशियम हे नाव देण्यात आले. मोलॅझाइट, गॅडोलिनाइट, यूक्झेनाइट, झेनोटाइम व समर्स्काइट ही या धातूची महत्त्वाची खनिजे होत. अणुकेंद्रीय भंजनातही (जड मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रांचे तुकडे होतानाही) ही धातू तयार होते. १९४५ च्या पूर्वी ती भागशः स्फटिकीकरण पद्धतीने (विद्रावात विरघळलेल्या मिश्रणातील पदार्थांचे पुनःपुन्हा स्फटिकीकरण करून पदार्थ अलग करण्याच्या पद्धतीने) निराळी केली जात असे. त्यानंतर ⇨ आयन-विनिमय पद्धती वापरात आली. आता क्षारीय मृत्तिका धातूंच्या (बेरियम, स्ट्राँशियम व कॅल्शियम यांच्या) साहाय्याने या धातूच्या निर्जल हॅलाइडांचे ऊष्मीय ⇨ क्षपण करून ती मिळविली जाते. 

उच्च तापमानास या धातूवर हवेचा तात्काळ परिणाम होतो व तिचे ऑक्साइड Dy2O3 बनते, पण सामान्य तापमानास ठोकळ्यांच्या स्वरूपात तिची चकाकी बराच काळपर्यंत टिकते. हे ऑक्साइड पांढरे असते पण त्याचा अम्लातील विद्राव पिवळट हिरवा असतो. डिस्प्रोशियम ऑक्साइड व होल्मियम ऑक्साइड हे सर्वांत तीव्र समचुंबकीय पदार्थ आहेत, असे आढळून आले आहे. डिस्प्रोशियमाच्या या गुणधर्माचा चुंबकीय शीतनासाठी उपयोग करण्यात येतो.

या धातूच्या उच्च वितळबिंदूमुळे व तिचा न्यूट्रॉन काटछेद (प्रक्षेपित न्यूट्रॉनला लक्ष्य म्हणून उपलब्ध असलेले अणुकेंद्राचे परिणामी क्षेत्रफळ) उच्च (सु. १,००० वार्न) असल्यामुळे अणुभट्टीमधील नियंत्रक रुळांत मंद न्यूट्रॉनांचे शोषण करण्यासाठी तिचा उपयोग करतात. डिस्प्रोशियमाच्या संयुगांचा उपयोग खनिज तेल शुद्धीकरणात उत्प्रेरक (रासायनिक विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणारा वा ती कमी तापमानास घडवून आणण्यास मदत करणारा पदार्थ) म्हणून होतो. काही इलेक्ट्रॉनीय उपकरणांत एक घटक म्हणून तसेच ⇨ ऋण किरण नलिकेतील पडद्यावरील अनुस्फुरक (विशिष्ट तरंगलांबीच्या किरणांचे शोषण करून मोठ्या तरंगलांबीच्या किरणांचे उत्सर्जन करणाऱ्या) द्रव्याची क्रिया चालू होण्यास मदत करणारे पदार्थ म्हणून डिस्प्रोशियमाची संयुगे वापरण्यात येतात. कार्बन प्रज्योतीत (कार्बनाच्या दोन विद्युत् अग्रांमध्ये विद्युत् विसर्जन होऊन अतिशय तेजस्वी प्रकाश निर्माण करणाऱ्या साधनात) तसेच मिश्रधातूंत डिस्प्रोशियम वापरतात.        

               

      ठाकूर, अ. ना.