डिप्टेरोकार्पेसी : (शाल कुल). फुलझाडांपैकी (आवृत्तबीज, द्विदलिकित) ह्या कुलाचा अंतर्भाव गटिफेरेलीझ [ कोकम गण, → गटिफेरी] मध्ये करतात, तर एंग्लर व प्रांट्ल यांच्या पद्धतीत परायटेलीझ ह्या गणात केलेला आढळतो. या कुलाला सर्ज (साल–राळ वृक्ष) कुल असेही म्हणतात. कारण यातील कित्येक झाडांतून राळमिश्रित स्राव येतो तो सुगंधी आणि औषधी असतो. या कुलाचे परुषक कुलाशी [→ टिलिएसी ] आप्तभाव आहेत. यामध्ये एकूण सु. पंचवीस वंश व साडेतीनशे जाती आहेत. (विलिस : पंधरा वंश व पाचशे ऐंशी जाती). त्यांचा प्रसार अमेरिकेशिवाय इतर देशांतील उष्ण प्रदेश, विशेषतः मलाया, फिलिपीन्स येथे आहे. सर्व जाती लहानमोठे वृक्ष किंवा क्वचित झुडपासारख्या आहेत. पाने साधी, एकाआड एक, चिरहरित (सदैव हिरवी दिसणारी), चिवट असून त्यांना उपपर्णे असतात. फुले सुगंधी, आखूड देठाची किंवा बिनदेठाची व फुलोरा पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास असून तो मंजरी किंवा कणिश प्रकारचा असतो. फुले द्विलिंगी, पंचभागी, पूर्ण व अवकिंज पुष्पस्थली रुंद बशीसारखी किंवा खोलगट संवर्त (सर्वांत बाहेरच्या पुष्पदलांचे मंडल) पंचभागी व फळावर पंखासारखा कमी-जास्त वाढून सतत टिकून राहतो. पाकळ्या पाच, सुट्या, केसरदले पाच किंवा पाचाच्या अनेक मंडलांत किंजदले बहुधा तीन व जुळलेली ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे, क्वचित एक बीजुके प्रत्येकात दोन किंवा अधिक बीजके अक्षलग्न (मधल्या अक्षास चिकटलेली) [→ फूल]. फळ विविध प्रकारचे व बहुधा पक्षधारी बीजांत गर्भाबाहेर अन्नसाठा (पुष्क) असतो. भेंडात किंवा काष्ठात राळनलिका किंवा तैल-कोशिका (पेशी) बहुधा आढळतात. धूप, साल, कल्होणी, कापूर, चालन इ. शाल कुलातील उपयुक्त वनस्पती सामान्यपणे आढळतात. परुषक कुलाशी याचे आप्तभाव असल्याचे आढळते.