व्हीलांट, क्रिस्टोफ मार्टीन : (५ सप्टेंबर १७३३–२० जानेवारी १८१३). जर्मन कवी, कादंबरीकार, नाटककार. जन्म जर्मनीतील ओबरहोल्ट्‌सहाइम येथे. त्याचे वडील पास्टर (चर्चमधील एक पद) होते. व्हीलांटचे कायद्याचे शिक्षण एर्फुर्ट आणि ट्यूबिंगेन विद्यापीठांत झाले. ट्यूबिंगेन विद्यापीठात शिकत असतानाच त्याने प्रॉटेस्टंट पंथांतर्गत पायटिस्ट चळवळीच्या प्रभावाखाली काही लेखन केले होते. तथापि हळूहळू तो इहवादाकहे, बुद्धिवादी विचारसरणीकहे झुकला. ह्या काळातील त्याच्या काही कविता शृंगारिक, कामभावनेचा आविष्कार करणाऱ्या आहेत. व्हीलांटच्या परिपक्व सर्जनशीलतेचा प्रत्यय देणाऱ्या आगाथोन (२ खंड, १७६६-६७) ह्या कादंबरीत बुद्धी आणि इंद्रिये ह्यांच्यातील संघर्ष हा विषय आहे. प्राचीन ग्रीसच्या पार्श्वभूमीवरील या कादंबरीत प्रतीकात्मकरीत्या व्हीलांटने स्वतःच्याच कलात्मक आणि आध्यात्मिक विकासाचे दर्शन घडविले आहे. मुसारिओन ओडर दी फिलासोफी देअर ग्रात्सिएन (१७६८) ह्या त्याच्या काव्यात इंद्रियसुखे आणि चारित्र्यातील शुद्धता यांतील संघर्ष दाखविला आहे.

एर्फुर्ट विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या अध्यासनपदी १७६९ साली व्हीलांटची नेमणूक झाली. देऽर गोल्डनऽश्पीगेल ओडर दी क्योनिगऽ फोन शेशिआन (लघुरूप, इं. शी. द गोल्डन मिरर) ही त्याची राजकीय कादंबरी (१७७२). तीत निरंकुश, परंतु विवेकशील व प्रजाहितदक्ष अशा राजसत्तेचा त्याने पुरस्कार केला. या कादंबरीमुळे सॅक्स वायमारच्या राजपुत्रांचा शिक्षक म्हणून व्हीलांटची नेमणूक झाली. वायमार येथेच तो अखेरपर्यंत राहिला. १७७३मध्ये त्याने देऽर दॉईचऽ मेर्‌क्यूर (इं.शी. द जर्मन मर्क्यूरी) हे एक वाङ्‌मयीन नियतकालिक सुरू केले. त्याच्या डी आबडेरिटेन (१७७४, इं. शी. द पीपल ऑफ ऑब्डिरा) या कादंबरीत ग्रीसमधील कथावस्तूच्या मिषाने त्याने समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे. ही एक प्रभावी राजकीय उपरोधिका आहे.

व्हीलांटची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती म्हणजे ओबेरोन (१७८०) हे महाकाव्य. परीकथेचे वातावरण असलेल्या ह्या काव्यावर शेक्सपिअरच्या अ मिडसमर्स नाइट्‌स ड्रीम ह्या नाटकाचा, तसेच इटालियन महाकवी ⇨ लोदोव्हीको आरिऑस्तो ह्याच्या ओरलांदो फ्यूरिओसो ह्या महाकाव्याचा प्रभाव जाणवतो. दोन प्रेमिकांचे मीलन हा ह्या महाकाव्याचा विषय असून स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचे पूर्वसूचन त्यातून होते.

व्हीलांटने काही नाटकेही लिहिली. तसेच शेक्सपिअरच्या बावीस नाटकांचा जर्मन अनुवाद १७६२ ते १७६६ ह्या कालखंडात पूर्ण केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन साहित्यात प्रभावी ठरलेल्या ‘स्टुर्म उंड ड्रांग’ (इं. अर्थ, स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या चळवळीला हे अनुवाद उपकारक ठरले. प्राचीन ग्रीक नाटककार ॲरिस्टोफेनीस आणि युरिपिडीझ ह्यांच्या काही नाट्यकृतींचे जर्मन अनुवादही त्याने केले.

व्हीलांटच्या साहित्यात त्याच्या काळातील बुद्धिवादापासून स्वच्छंदतावादापर्यंत विविध प्रवृत्तींचे प्रतिबिंब पडलेले दिसते. तसेच त्याच्या लेखनशैलीवर रोकोको कलासंप्रदायाचा प्रभाव जाणवतो.

सॅक्स-वायमार (वायमार) येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Abbe, Derek M. Van, Christopher Martin Wieland, A Literary Biography, 1961.             2. Bruford, W. H. Culture and Society in Classical Weimar, 1775-1806, Cambridge, 1962.             3. Elson, Charles, Wieland and Shaftsbury, 1913.

कुलकर्णी, अ. र.