डॉस्टोव्हस्की, फ्यॉडर : (११ नोव्हेंबर १८२१ – ९ फेब्रुवारी १८८१). एकोणिसाव्या शतकातील अग्रगण्य वास्तववादी रशियन साहित्यिक. मूळ रशियन उच्चार दस्तयेव्स्की. मॉस्को येथे जन्मला. तेथील सैनिकी अभियांत्रिकी प्रशालेत त्याने १८४३ मध्ये आपला अभ्यासक्रम पुरा केला व सैन्यात नोकरी धरली. पुढल्याच वर्षी त्याने सैनिकी पेशा सोडला आणि ते वाङ्मयीन कृतींची भाषांतरे प्रसिद्ध करू लागला. त्याची पहिली स्वतंत्र लेखनकृती बेद्निये ल्यूदिं (इ. शी. पूअर फोक) १८४६ मध्ये बाहेर पडली. १८४७ मध्ये डॉस्टोव्हस्की ‘पित्रशेव्स्की’ पक्षात सामील झाला. २३ एप्रिल १८४९ रोजी तो पकडला गेला आणि त्याला देहान्ताची सजा फर्माविली गेली. पण क्षमादानाच्या एका नाट्यपूर्ण घटनेनंतर त्याला सायबीरियात सक्त मजुरीसाठी हद्दपार करण्यात आले. तेथे त्याने आठ वर्षांपेक्षा अधिक काळ घालविला आणि १८५९ मध्ये पीटर्झबर्गला परत आल्यावर आपले साहित्यिक जीवन पुन्हा सुरू केले.
द्वइनीक (१८४६, इं. शी. द डबल), बेलिये नोचि (१८४८, इं. शी. व्हाइट नाइट्स) आदी त्याच्या सुरुवातीच्या लेखनकृतींत मानवतावादी व लोकशाहीवादी विचार आहेत ‘सामान्य माणसा’च्या कष्टांचे चित्रण असून गोगोल, ब्यिल्यीन्स्कई आदी लेखकांचीच परंपरा तो पुढे चालविताना दिसतो. १८६१–६२ मध्ये आपल्या झापिस्की इझ् म्योर्तवव दोमा (इं. शी. मेम्वार्स ऑफ द हाउस ऑफ डेड) या लेखनकृतीत डॉस्टोव्हस्की तुरुंगातील जीवन, तेथील कैद्यांची दुःखे यांबाबत लिहिताना दिसतो. १८६१ मध्येच उनिझेन्निये इ अस्कब्र्ल्योन्निये (इं. शी. ह्यूमिलिएटेड अँड इन्सल्टेड) ही आपली कादंबरी त्याने प्रसिद्ध केली. तीत त्याच्या पूर्वीच्याच लेखनकृतींतील विषय आलेले आहेत. मात्र त्याची पुढील मोठी लेखनकृती झापिस्की इझ पद्पोल्या (१८६४, इं.शी. मेम्वार्स फ्रॉम अंडरग्राउंड) त्याच्या लेखनपद्धतीत बदल झाल्याचे दाखविते आणि ‘व्यक्तीचा समाजाविरुद्ध झगडा’ हा विषय प्रथमच सुरू करते.
प्रिस्तुप्लेनिये इ नकझानिये (१८६६, इं. भा. क्राइम अँड पनिशमेंट १९५१) या कादंबरीने डॉस्टोव्हस्कीला जगप्रसिद्धी मिळवून दिली. या सामाजिक-तत्त्वचिंतनात्मक कांदबरीने अनेक प्रश्न उपस्थित केले. डॉस्टोव्हस्कीच्या नंतरच्या लेखनकृतींतही त्याचे लक्ष ह्या प्रश्नांत गुंतून राहिले. त्याच्या अन्य उल्लेखनीय लेखनकृतींत इदिओत् (१८६८, इं. शी. द इडिअट) या कादंबरीचाही अंतर्भाव होतो. तिच्यात एक क्रियाशील नायक निर्मिण्याचा प्रयत्न आहे आणि मुख्य कथाविषय आहे प्रेमिकांच्या वेदनांचा ! तसेच, बेसी (१८७१–७२, इं. शी. द पझेस्ड) ही शून्यवादी आणि अराजकी दहशतवादी यांच्याबद्दलची कादंबरी पद्रोस्तक (१८७५, इं. शी. जूव्हेनिल) मध्ये समकालीन समाजाच्या दिवाळखोरीचे चित्रण आहे. ब्रात्या कारामाझवि (१८७९–८०, इं. शी. ब्रदर्स करमझोव) ही त्याची शेवटची कादंबरी. ही एक बहुढंगी व समस्यात्मक कादंबरी आहे. त्याच्या आणखी दोन महत्त्वाच्या लेखनकृती म्हणजे त्याची कादंबरी इग्रोक (१८६६, इं. शी. द गँब्लर) आणि कथा ‘व्हेच्निय मुश्’ (१८७०, इं. शी. द. इटर्नल हझबंड) ह्या होत. या सर्वच लेखनकृतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील घटनांचे आगळेपण व त्यांमधील नाट्यांतील तीव्र संघर्ष!
डॉस्टोव्हस्कीच्या बहुतांश लेखनकृतीचा मूलभूत विषय म्हणजे रशियन माणसाच्या जीवनातील करुण अंतर्विरोध होय. गरीब लोकांची दुःखे, गुलामांची असहायता व धनिकांचा जुलूम यांमुळे होणारी मानवी मूल्यांची गळचेपी आणि यातून सामाजिक अन्यायंविरुद्ध होणारा नाडलेल्या व्यक्तींचा उठाव वगैरे. डॉस्टोव्हस्कीच्या लिखाणात मनोविश्लेषणाची खोली, अद्भुताचे भरीव आणि प्रवाही चित्रण, मानवी मनाची चांगली जाण आणि मनुष्यस्वभावातील द्वंद्वाची पक्की उमज या गोष्टी विलक्षणपणे जाणवतात. पाप आणि पुण्य, व्यष्टी व समष्टी आदी द्वंद्वांचे प्रश्न उपस्थित करून डॉस्टोव्हस्की हे दाखवून देतो, की माणसाचा अधःपात कोणत्या पातळीपर्यंत होऊ शकेल याला मर्यादा नाही. मानवी जीवनात, मनाची शुद्धी करण्यात दुःखांचे महत्त्व, पापक्षालन आणि धार्मिक विनम्रता यांवरही डॉस्टोव्हस्की भर देतो.
डॉस्टोव्हस्कीने काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले व १८६१–६३ या काळात व्ह्रेम्या (इं. शी. टाइम) आणि १८६४–६५ या काळात इपोखा (इं. शी. एपोक) ही पत्रे चालविली परंतु ज्याने मानवी जीवनाचे गूढ नियम समजण्याचा आणि मानवी विकासातील चालू प्रश्नांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, असा एक थोर साहित्यिक-विचारवंत म्हणूनच तो अधिक चांगला ओळखला जातो. मालकी हक्काधिष्ठित समाजातील नैतिक अधःपात, ऱ्हास व असह्य अंतर्विरोध यांचे भयानक चित्र उभे करून डॉस्टोव्हस्कीने एक नवीन प्रकारची कादंबरी निर्माण केली. ती म्हणजे शोकात्मिका-कादंबरी ! म्हणून टॉलस्टॉय-टुर्ग्येन्येव्हप्रमाणेच त्यालाही जागतिक कांदबरीचा जनक मानले जाते ते योग्यच होय. डॉस्टोव्हस्कीचा अंत पीटर्झबर्ग येथे झाला.
संदर्भ : 1. Berdyaev, Nikolai Trans. Attwater, Donald, Dostoievsky, an Interpretation, London, 1934.
2. Carr, E. H. Dostoevsky, New York, 1931.
3. Gide, Andre Trans, Bennett, Arnold, Dostoevsky, New York, 1926.
4. Lavrin, Janko, Dostoevsky, a study, London, 1934.
5. Murry, J. M. Fyodor Dostoevsky, a Critical Study, London, 1916.
6. Porrys, J. C. Dostoevsky, London, 1947.
7. Troyat, Henri Trans. Guterman Norbert, Firebrand the Life of Dostoevsky, New York, 1946.
8. Yarmolinsky, Avrahm, Dostoevsky, a Life, Toronto, 1957.
पांडे, म. प. (इं.) राजाध्यक्ष, द. य. (म.)
“