डार्लिंग्टन, सिरिल डीन : (१९ डिसेंबर १९०३ –    ). ब्रिटिश जीववैज्ञानिक. सजीवांतील प्रजोत्पादन, बदल व आनुवंशिकता यांच्या यंत्रणांचे कार्य कसे चालते व त्यांचे क्रमविकासात (उत्क्रांतीत) अनुयोजनेच्या संदर्भात (परिस्थितीशी समरस होण्यामध्ये) परस्परसंबंध काय आहेत यांविषयी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केलेले आहे. त्यांचा जन्म चॉर्ली (लँकाशर, इंग्लंड) येथे झाला. केंट येथील वाय कॉलेजात शेतकी शिक्षण घेतल्यानंतर १९२३ मध्ये ते जॉन इनिस इन्स्टिट्यूटमध्ये विल्यम बेटसन यांच्या मार्गदर्शनाखाली आनुवंशिकी या विषयात संशोधन करण्यासाठी दाखल झाले. डार्लिंग्टन १९३९ मध्ये या संस्थेचे संचालक झाले. १९५३ साली ते ऑक्सफर्डमध्ये वनस्पतिविज्ञानाचे शेरार्दियन प्राध्यापक व तेथील शास्त्रीय उद्यानाचे पालक झाले.

बेटसन यांचे मत ⇨कोशिकेतील (पेशीतील) परिकल तर त्याच संस्थेतील कोशिकावैज्ञानिक फ्रँक न्यूटन यांचे मत रंगसूत्रे (कोशिकेच्या केंद्रकातील सूक्ष्म सुतासारखे घटक) आनुवंशिकतेबद्दल जबाबदार आहेत असे होते. या त्या काळातील वादग्रस्त प्रश्नाला डार्लिंग्टन यांना तोंड द्यावे लागले. पुढे चार वर्षांच्या अवधीत बेटसन व न्यूटन हे दोघेही निवर्तले. परंतु न्यूटन यांनी मरणापूर्वी डार्लिंग्टन यांना रंगसूत्रांचे न्यूनीकरणाच्या (कोशिका विभाजनामध्ये रंगसूत्रांची मूळ दुप्पट असलेली संख्या एकपट होण्याच्या) वेळी काय कार्य असते हे समजून घेण्यासाठी बहुगुणित (रंगसूत्रांचे अनेक संच असलेल्या) वनस्पतींचा अभ्यास करण्याविषयी सुचविले होते. ⇨आनुवंशिकता ही बव्हंशी रंगसूत्रांतील जनुकांद्वारा (सूक्ष्मकणांतून) पिढ्यानुपिढ्या चालू आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे.

टी. एच्. मॉर्गन व एफ्. ए. यानसेन्स यांनी रंगसूत्रांच्या जोडीतील प्रत्येक घटकात व्यत्यसनाच्या (रंगसूत्रे परस्परांवर येऊन जनुक विनिमय होण्याच्या) वेळी फक्त जनुकांचे पुन:संयोजन होते, अशी कल्पना मांडली होती. परंतु डार्लिंग्टन यांनी असे दाखविले की, सर्व लैंगिक प्रक्रियांतील महत्त्वाची घटना म्हणजे व्यत्यसन होय व त्यामुळेच रंगसूत्रांचे साहचर्य, प्रतिकर्षण (प्रभावी लक्षणे अलग होण्याची प्रवृत्ती), विभक्तीकरण व न्यूनीकरण या क्रिया क्रमशः घडून येतात. लैंगिक प्रजोत्पादन घडवून आणणाऱ्या सर्व जातींत व्यत्यसन ही प्रमुख पण अस्थिर बाब आहे. इतकेच नव्हे, तर ती त्या सजीवांइतकीच प्राचीन आहे. सजीवांतील लिंगसूत्रांत आढळणारे काही गुंतागुंतीचे फरक हे रंगसूत्रातील काही भागांत कधीकधी व्यत्यसनाचा लोप झाल्यामुळे घडून येतात, हे इनोथेरासारख्या संकरज जातीवरून आढळून येते तसेच नर माश्यांमध्ये आढळणारा व्यत्यसनाचा अभाव डार्लिंग्टन यांच्या मते क्रमविकासात संपादित झालेला असावा. एका न्यूनीकरणापासून दुसऱ्यापर्यंत अल्पायुषी जातीतील पुन:संयोजन मर्यादित करण्याकरिता त्याची आवश्यकता होता [⟶ आनुवंशिकी कोशिका]. क्रमविकासातील समस्यांचा अभ्यास करताना रंगसूत्रांना क्रियावैज्ञानिक घटक समजून त्यांचा अनुयोजनांच्या दृष्टीने विचार व्हावा असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. कोशिकेतील तर्कुयुजांच्या कार्यासंबंधीही त्यांनी विचार मांडलेले आहेत. तसेच रंगसूत्रांच्या गुणधर्मांचे स्पष्टीकरण आनुवंशिकीच्या भाषेत मांडण्यामध्ये त्यांचा दुहेरी उद्देश होता. एक म्हणजे जीवविज्ञानाकरिता आनुवंशिकीवर आधारलेली एक चौकट निश्चित करणे व दुसरा म्हणजे या चौकटीच्या केंद्रात रंगसूत्रांच्या आचरणाचे नियम निश्चित करणे हा होय. हे नियम असे असावेत की, रासायनिक संरचना व क्रियाशीलता यांच्या साच्यात रंगसूत्रांना बसविता यावे. या साच्याची बैठक पुढे क्रमाने टी. कॅस्पर्सन, जे. ब्राशे, जे. डी. वॉटसन, एफ्. एच्. सी. क्रिक इत्यादींनी मांडली [⟶ आनुवंशिकी].

डार्लिंग्टन यांना १९४६ मध्ये रॉयल सोसायटीच्या रॉयल पदकाचा बहुमान मिळाला. त्यांनी एल्. एफ्. लाकुर यांच्या समवेत द हँडलिंग ऑफ क्रोमोसोम्स (चौथी आवृत्ती. १९६३), ए. पी. वायली यांच्या समवेत द क्रोमोसोम ॲटलास ऑफ फ्लॉवरिंग प्लँट्स  (१९५६) आणि क्रोमोसोम बॉटनी ऑफ द ओरिजिन ऑफ कल्टिव्हेटेड प्लँट्स (दुसरी आवृत्ती. १९६३) हे ग्रंथ लिहिले. आर्. ए. फिशर यांच्या सहकार्याने त्यांनी हेरेडिटी हे नियतकालिक स्थापन (१९४७) व संपादित केले. याखेरीज त्यांनी टीचिंग जेनेटिक्‌स (१९६३), कॉन्फ्लिक्ट ऑफ सायन्स अँड सोसायटी  (१९४८), डार्विन्स प्लेस इन हिस्टरी इ. ग्रंथही लिहिले आहेत.

परांडेकर, शं. आ.