डार्टमथ : इंग्लिश खाडीवरील इंग्लंडचे एक बंदर. हे डार्ट नदीमुखखाडीवर प्लिमथच्या पूर्वेस ४० किमी. आहे. लोकसंख्या ५,६९६ (१९७१). १५७९ मधील हंफ्रे गिल्बर्टचे न्यू फाउंडलंडकडे प्रस्थान, १६२० साली बेअर्डने येथे ठेवलेली ‘ स्पीडवेल’ व ‘मेफ्लॉवर’ ही जहाजे आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याचे नॉर्मंडीवरील हल्ल्यासाठी सागरी कूच ही डार्टमथची ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहेत. येथे जहाज बांधणी व दुरुस्ती, अभियांत्रिकी, मृत्पात्रे, मासेमारी इ. उद्योग चालतात. शीड नौकांच्या शर्यती व विपुल मासे ही पर्यटकांची व कोळ्यांची आकर्षणे आहेत. येथील जुने चर्च, किल्ला, नौसैनिकांचे प्रशिक्षण महाविद्यालय व बरोक वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहेत. सर हंफ्रे गिल्बर्ट आणि जॉन डेव्हिड या खलाशांचे हे जन्मस्थळ होय.