डायोप्साइड : पायरोक्सीन गटातील खनिज. स्फटिक एकनताक्ष, आखूड प्रचिन, पुष्कळदा जुळे [⟶ स्फटिकविज्ञान]. कणमय संपुंजित, स्तंभाकार आणि पापुद्र्यांच्या रूपांतही आढळते. ⇨पाटन (110) अस्पष्ट. विभाजनातले असतात. भंजन खडबडीत ते शंखाभ. कठिनता ५–६. वि. गु. ३·२–३·३. रंग पांढरा, करडा, लोहामुळे हिरवट. चमक काचेसारखी. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. CaMgSi2O6. मॅग्नेशियमाच्या जागी फेरस लोह येऊन हेडेनबर्गाइटापर्यंत (CaFeSi2O6) संपूर्ण माला बनते. अग्निज राशीच्या सान्निध्याने खडकांमध्ये बदल होऊन म्हणजे संस्पर्शी रूपांतरणाने डायोप्साइड तयार होते. ते संगमरवर, गॅब्रो, पेरिडोटाइट इ. खडकांमध्ये तोरमल्ली, ट्रेमोलाइट, स्कॅपोलाइट वगैरे खनिजांबरोबर आढळते. रशिया (उरल पर्वत), ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, इटली (पीडमाँट), स्वीडन वगैरे देशांत याचे स्फटिक सापडतात. याचे पारदर्शक स्फटिक रत्न म्हणून वापरतात. विशिष्ट स्थितीतील दिसण्याला उद्देशून दुहेरी आणि दिसणे या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून आर्. जे. हॉय यांनी हे नाव दिले (१८०१).

ठाकूर, अ. ना.