डायॉस्कोरिएसी : (आलुक कुल). एकदलिकित फुलझाडांच्या लिलिएलीझ अथवा पलांडू गणातील एक कुल. ह्यामध्ये एकूण दहा वंश व सु. ६५० जाती (विलिस : ५ वंश व ७५० जाती) असून त्या पृथ्वीवरच्या सर्व उष्ण भागांत सर्वत्र पसरल्या आहेत. त्या सर्व आरोही (आधारावर चढणाऱ्या) वेली असून त्यांना जमिनीत सतत राहणारे ग्रंथिक्षोड किंवा मूलक्षोडे [⟶ खोड] व जमिनीवर पानांच्या बगलेत कंदिका (लहान कंद) येतात. ह्यांतील पिठूळ पदार्थांचा अनेक वेळा अन्नासारखा उपयोग होतो. काही जाती औषधी आहेत. यांची पाने साधी किंवा संयुक्त, एकाआड एक किंवा समोरासमोर, हृदयाकृती असून पात्यात शिरांचे जाळे असते [⟶ पान]. फुले लहान, बहुधा एकलिंगी, त्रिभागी व विभक्त झाडांवर असतात. परिदले सहा व जुळलेली, जननक्षम केसरदले तीन किंवा सहा, क्वचित एकसंध (जुळलेली) किंजपुट अधःस्थ आणि त्यात एक किंवा दोन कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यात दोन किंवा अधिक अक्षलग्न बीजके असतात [⟶ फूल]. फळ मांसल (मृदूफळ) अथवा खोलगट रेषा असलेले तीन शकलांचे बोंड असते. बिया चापट किंवा सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेल्या) आणि गोलसर व लहान असतात. कारंदा, गोराडू, कोनफळ इ. सामान्य उपयुक्त वनस्पती यातील आहेत.

पहा : लिलिएलीझ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग.

परांडेकर, शं. आ.