डाक्का : बांगला देशाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९,६१,७०० (१९७२ अंदाज). या भागातील ढाक (पळस) वृक्षाच्या विपुलतेमुळे किंवा ढाकेश्वरी देवीच्या नावावरून या गावाला ढाका (डाक्का) हे नाव पडले असावे. १६०८ ते १६३९ आणि १६६० ते १७०४ डाक्का मोंगलांच्या बंगाल सुभ्याची राजधानी होते. त्या वेळी त्याचा सागरी व्यापार भरभराटलेला असून इंग्रज, फ्रेंच व डच व्यापारी तेथे येत असत. १७६५ मध्ये ते ब्रिटिशांकडे गेले. १७०५ मध्ये राजधानी मुर्शिदाबादला गेल्यामुळे डाक्क्याचे महत्त्व कमी झाले होते परंतु १९०५ ते १९१२ पूर्व बंगाल व आसामची राजधानी येथे आल्याने डाक्क्याचे महत्त्व पुनः वाढले. १९४७ मध्ये पूर्व बंगालची व १९५६ मध्ये पूर्व पाकिस्तानची राजधानी झाल्यामुळे डाक्का शहराचा खूपच विस्तार झाला आहे. १९७१ मध्ये डाक्का बांगला देशाची राजधानी झाली. याचा परिसर सुपीक असल्याने हे तांदूळ, ताग, तेलबिया, ऊस, कापड आदींची मोठी बाजारपेठ आहे. याचे दाट वस्तीचे व अरुंद रस्त्यांचे जुने डाक्का, आधुनिक वस्तीचे रुंद रस्त्यांचे रमणा व फाळणीनंतरच्या वस्तीचा व कारखान्यांचा भाग असे तीन भाग आहेत. येथील शिंपाच्या बांगड्या व अन्य अलंकार तसेच सोन्या-चांदीवरील नाजूक नक्षीकाम विशेष प्रसिद्ध आहे. येथील लहानमोठ्या कारखान्यांतून रसायने, रबर, गुंड्या, काचसामान, आगपेट्या, होजियरी, बर्फ, विजेचे
साहित्य असे विविध उत्पादन होते. तागाच्या व कापसाच्या गासड्या बांधण्याचे कारखाने, अन्नप्रक्रिया, भात आणि तेल गिरण्या, कापड गिरण्या, रेल्वे यंत्रसामग्रीची निर्मिती आणि दुरुस्ती, कातडी कमावणे, कातडी वस्तू, सर्वसामान्य अभियांत्रिकी कर्मशाळा इ. विविध कारखान्यांमुळे डाक्का बांगला देशाचे प्रमुख औद्योगिक केंद्र झाले आहे. जामदानी (उत्तम प्रकारची मलमल), भरतकाम, रेशीम, जडजवाहीर इ. आजही डाक्क्याची वैशिष्ट्ये आहेत. दक्षिणेकडे १६ किमी. वरील नारायणगंज हे डाक्क्याचे आयात-निर्यातीचे बंदर आहे.
ओक, द. ह.
“