डाका : (कौला क. सुग्निगरी लॅ. प्रूनस सेलॅनिका, पायजियम गार्डनेरी कुल-रोझेसी). सु. ८ ते २५ मी. उंची व १ ते २ मी. घेर असलेला हा सदापर्णी वृक्ष भारतात सह्याद्री, दख्खनचे पठार, मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, ओरिसा, अंदमान बेटे, कोकण, मलबार इ. प्रदेशांत आढळतो. याच्या खोडावरची साल भुरी, पातळ व गुळगुळीत असते. पाने साधी, लहान, एकाआड एक, अखंड, अंडाकृती-आयत अथवा भाल्यासारखी, चिवट, गुळगुळीत व टोकास निमुळती असतात. फुले पिवळसर पांढरी, कक्षास्थ (बगलेतील) मंजरीवर नोव्हेंबरात येतात. फुलांना पाकळ्या नसतात. केसरदले विसापेक्षा अधिक असून दोन मंडलात येतात [⟶ फूल]. द्विखंडी, २·५ सेमी.पेक्षा अधिक रुंद अशी अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे मार्च ते मेमध्ये येतात. आठळीला प्रुसिक अम्लाचा वास येतो. फलावरणाचा (मध्यकवचासह) उपयोग मत्स्यविषाकरीता करतात. मध्यकाष्ठ (खोड व फांद्या यांतील मध्यवर्ती, जून, गर्द रंगी व कठीण लाकडाचा भाग) पांढरे व बाजूचे लालसर व भरड, मध्यम कठीण असून ते पेट्या, फळ्या, तुळया, वासे इत्यादींकरिता वापरतात. चुनखडी किंवा विटा भाजण्यास ते विशेष चांगले असते. साल, पाने आणि फळे चुरगळल्यास कडू बदामाचा उग्रट वास येतो. द. व्हीएटनाममध्ये साल पोटदुखीवर देतात, तसेच तिच्यापासून एक पेय बनवितात.