डांग : गुजरातमधील मागासलेला जिल्हा आणि द्वैभाषिकाच्या फाळणीच्या वेळी महाराष्ट्राचा गुजरातमध्ये
समाविष्ट केलेला भाग. २०° ३२’ उ. व २१° ३’ उ. व ७३° ३०’ पू. ते ७४° ५’ पू. क्षेत्रफळ १,६८३ चौ. किमी. लोकसंख्या ९४,१८५ (१९७१). दक्षिणेला व पूर्वेला महाराष्ट्राचा भाग, उत्तरेला सुरत जिल्हा व पश्चिमेला बलसाड जिल्हा. जिल्ह्यातील सु. ८५% लोक आदिवासी असून त्यांत भिल्ल ही मुख्य जमात आहे. त्यांशिवाय वारली, काथोडी, कुणबी, कोकणी, इ. लोक आहेत. आहवा हे जिल्ह्याचे ठाणे आहे.
येथील तळखड मुख्यतः बेसाल्ट असून भूस्वरूप डोंगराळ आहे. उंची सु. ५०० ते ६०० मी. असून आग्नेय भागात ती ६०० मी. पेक्षाही अधिक आहे. हा सह्याद्रीचा उत्तर भाग आहे. डांग याचा अर्थ डोंगरमाथा असा आहे.
जिल्ह्याचे हवामान उष्ण, दमट व काहीसे विषम आहे. डोंगराळ भागामुळे पावसाचे प्रमाण १५० सेंमी.हून अधिक आढळते. आग्नेय भागात पाऊस त्याहीपेक्षा जास्त पडतो. पूर्णा, अंबिका, काप्री, कुढा या प्रमुख नद्या आहेत.
हवामान पानझडी वृक्षांच्या जंगलांना पोषक आहे. मात्र पावसाचे प्रमाण मध्यम असल्याने पाने फक्त २–३ महिनेच गळतात. साग आणि बांबू या सर्वांत महत्त्वाच्या वनस्पती होत. ऐन, धावडा, खैर, शिसव इ. इतर वृक्ष आहेत. मोहाच्या झाडापासून दारू करतात. सु. ९५% जंगलक्षेत्र जंगलविभागाच्या नियंत्रणाखाली असल्याने जंगलव्यवसाय बऱ्याच अंशी पद्धतशीर चालतो. मात्र वाहतुकीच्या साधनांच्या कमतरतेमुळे जंगलसंपत्तीचा व्हावा तेवढा उपयोग होत नाही.
जिल्ह्यातील काही मध्यम प्रकारची जमीन सुपीक आहे परंतु एकूण क्षेत्राच्या ७०% भाग जंगलाखाली
असून केवळ २० ते २२% भागच लागवडीखाली आहे. बाकीची जमीन ओसाड आहे. जिल्ह्यात फक्त निर्वाह शेती आढळते. तांदूळ आणि कडधान्ये ही महत्त्वाची उत्पादने होत. त्यांशिवाय नागली, बाजरी, कोद्र यासारखी हलकी पिके होतात. पिकांचा उतारा फार कमी असल्याने उत्पादित अन्न केवळ ५-६ महिनेच पुरते. उर्वरित काळात लोक लाकूडतोड, शिकार इ. करून व मध, लाख, ताडी इ. जंगलपदार्थ गोळा करून शहरात आणून विकण्याचा व्यवसाय करतात.
जिल्ह्यात खजिने सापडत नाहीत थोडे लोखंड सापडण्याचा संभव आहे. मोठे उद्योगधंदे नाहीतच. दर १०० चौ. किमी.ला ३८ किमी. हे रस्त्यांच्या लांबीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असले, तरी पक्के रस्ते थोडे आहेत. लोहमार्गाची लांबी केवळ ५ किमी. आहे.
लोकसंख्येची घनता चौ.किमी.ला ५६ आहे व यावरून या भागाची धारणशक्ती कमी असल्याची कल्पना येते. वस्ती पूर्णपणे ग्रामीण आहे. जिल्ह्यातील लोकजीवन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले असून जुन्या विचारांचा पगडा अधिक आढळतो. आदिवासींना अजूनही झपाट्याने पुढे जाणाऱ्या बाह्य जगाविषयी फारशी जाणीव नाही. तथापी अनेक समाजसेवकांनी शाळा वगैरे चालवून लोकोन्नतीचे प्रयत्न चालविले आहेत.
“