डॅफोडिल : ( लॅ. नार्सिसस स्पूडोनार्सिसस कुल-ॲमारिलिडेसी) नार्सिसस या लॅटिन नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकदलिकित फुलझाडांच्या कुलातील [⟶ ॲमारिलिडेसी = मुसली कुल] एका वंशातील एका गटाचे नाव [⟶ नार्सिसस]. यूरोप आणि अमेरिका येथील बागांत या गटातील वनस्पतींची लागवड केली जाते, तसेच उ. यूरोपातील जंगलातही त्या आढळतात. या वनस्पतींच्या काही जाती भारतातील बागांतही लावतात. त्या सु. ४०–६० सेंमी. उंच वाढतात आणि त्यांना जमिनीत कंद असतात. डोंगराळ भागात जितकी चांगली वाढतात तितकी ही झाडे सखल भागात वाढत नाहीत. त्या वनस्पती ओषधीय [⟶ ओषधि ] असून त्यांना लांबट व अरुंद पानांचा झुबका असतो त्यांमधून फुलोऱ्याचा दांडा येतो. फुले मोठी, पिवळी आणि सुवासिक असून काहीशी लोंबती असतात. पुष्पमुकुटाच्या आत त्यावर आधारलेले तुतारीसारखे व त्याहून मोठे (निदान त्याएवढे) व घड्या पडलेले तोरण असते [⟶ फूल]. मुळच्या पिवळ्या फुलांच्या जातीपासून निरनिराळे सु. चाळीस प्रकार उपलब्ध झाले. त्यांतील काहींच्या पाकळ्या पांढऱ्या व त्यातील तुतारीसारख्या अवयवाचा (तोरणाचा) रंग गुलाबी, तर काहींत पाकळ्या पिवळ्या आणि तुतारी नारिंगी अशा विविध रंगसंगतीची फुले आढळतात. दोन्ही ( पाकळ्या व तुतारी) पांढऱ्या असलेली प्रकारही दिसतात इतर शारीरिक लक्षणे (फुलांची संरचना इ.) मुसली कुळात वर्णील्याप्रमाणे असतात.

डॅफोडिल बागेत खुल्या जमिनीत अगर कुंड्यांतून लावतात. चांगला निचरा होणाऱ्या हलक्या प्रतीच्या जमिनी चालतात. जमिनीत वाढलेल्या कंदांपासून अभिवृद्धी (लागवड) करतात. सपाटीवरील भागांत सप्टेंबर-ऑक्टोबरात आणि डोंगराळ भागांत फेब्रुवारीत हमचौरस १५–२२ सेंमी. अंतरावर अथवा कुंड्यांत प्रत्येकी एक ते तीन कंद याप्रमाणे लावतात लावल्यापासून तीन महिन्यांनी फुले येतात. लावलेले कंद तीन वर्षांपर्यंत त्याच जागी ठेवतात व त्यानंतर ते खणून पुन्हा लावावे लागतात. कुजलेल्या पालापाचोळ्याचे खत अथवा शेणखत देणे चांगले.

पहा : नार्सिसस (आकृती).

जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.