डब्लिन : आयरिश प्रजासत्ताकाची राजधानी आणि प्रख्यात ऐतिहासिक शहर. डब्लिन उपसागरावर लिफी नदीच्या मुखाजवळ ते वसले असून त्याची लोकसंख्या ६,५०,००० (१९७१) आहे. आयरिश प्रजासत्ताकातील हे सर्वात मोठे बंदर असल्याने येथील मालधक्के, गोद्या नेहमीच गजबजलेल्या असतात. बंदराच्या परिसरातच जहाजबांधणीच्या गोद्या व नाविक जीवनाशी निगडित अनेक व्यवसाय केंद्रे असल्याने डब्लिन हे मोठे व्यापारी शहरही झाले आहे. दक्षिण वेल्स व इंग्लंडमधून येथे कोळशाची आयात होते आणि शेतमालाची निर्यात केली जाते. पूर्वी रॉयल व ग्रँड कालव्यांनी डब्लिनचे पृष्ठप्रदेशाशी दळणवळण चाले. हल्ली लोहमार्गानेही बरीच वाहतूक होते.
डब्लिन महत्त्वाचे औद्योगिक शहर असून मद्याच्या आसवन्या व उर्ध्वपतन भट्ट्या, बिस्किटे व अन्य खाद्य पदार्थ, तंबाखूचे विविध पदार्थ, कागद इत्यादींचे अनेक कारखाने येथे आहेत. सतराव्या शतकात फ्रान्समधील ह्युगनॉल्स लोकांना आयर्लंड मध्ये आश्रय मिळविल्यापासून येथील लिनन कापडाच्या व्यवसायास उर्जितावस्था आली. हल्ली येथे उत्तमपैकी पॉप्लीन व अन्य कापड तयार होते.
विस्तृत चौक, रुंद राजरस्ते, तेराव्या शतकातील डब्लिन कॅसल, लीन्स्टर हाउस, अठराव्या शतकातील ८,५०,००० ग्रंथ आणि दुर्मिळ हस्तलिखिते असलेले ग्रंथालय, किल्मेनहॅम रुग्णालय, सु. १०३० मधील क्राइस्टचर्च कॅथीड्रल, तेराव्या शतकातील सेंट पॅट्रिकचे राष्ट्रीय कॅथीड्रल यांसारख्या प्रसिद्ध ऐतिहासिक इमारती, सुंदर उद्याने इत्यादींमुळे डब्लिनच्या सौंदर्यात व भव्यतेत भर पडली आहे. येथील ओकोनेल पाथ ४५·५० मी. रुंद असून याच्या मध्यभागी इंग्रज आरमारी वीर नेल्सन आणि आयरिश इतिहासातील प्रसिद्ध पुरुषांचे पुतळे आहेत. येथील फिनिक्स पार्क या इतिहासप्रसिद्ध उद्यानाचे क्षेत्रफळ सु. ७ चौ. किमी. असून जगातील प्रसिद्ध उद्यानांपैकी ते एक आहे.
प्रजासत्ताकाचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणूनही डब्लिनला आयरिश जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिने १५९१ मध्ये स्थापन केलेल्या ट्रिनिटी कॉलेजचे रूपांतर कालांतराने डब्लिन विद्यापीठात झाले. येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये (राष्ट्रीय विद्यापीठाची एक शाखा) गेलिक भाषेचा सखोल अभ्यास होतो. येथील राष्ट्रीय संग्रहालयातील प्राचीन आयरिश वस्तूंचा संग्रह विख्यात असून राष्ट्रीय कलावीथीत प्रसिद्ध आयरिश चित्रकारांच्या प्रख्यात कृती पहावयास मिळतात.
दोन हजार वर्षांपूर्वी येथे आयरिश लोकांची वसाहत नव्हती, तर नॉर्स लोकांची होती. नवव्या शतकात व्हायकिंग लोकांनी तेथे वसाहत केली. या शहराने आयरिश इतिहासातील अनेक भलेबुरे प्रसंग आणि चित्तथरारक घटना अनुभविल्या आहेत. १०१४ मधील क्लॉनटार्फचा संग्राम डब्लिन परिसरातच झाला. ११७२ मध्ये दुसऱ्या हेन्रीने आयर्लंडमधील इंग्रजी शासनाचे मुख्य ठाणे येथेच ठेवले होते. १२०९ मधील इंग्लिश नागरिकांची कत्तल, १६८९ मधील दुसऱ्या जेम्सचे शेवटचे पार्लमेंट, १७७२ ते १८०० दरम्यानची आयरिश पार्लमेंटची अधिवेशने, एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय लढ्यातील अनेक संघर्ष, बंडे व फिनियन आंदोलन तसेच १९१६ चे बंड इ. महत्त्वाच्या घटना येथेच झाल्याने आयरिश प्रजासत्ताकाचा इतिहासच डब्लिनच्या रूपाने साकार झाल्यासारखा वाटतो.