रणथंभोर : राजस्थान राज्याच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ला. हा किल्ला केव्हा व कोणी बांधला याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. सवाई माधोपूरच्या ईशान्येस सु. १३ किमी.वर सांप्रतच्या सवाई माधोपूर अभयारण्यात हा किल्ला असून वनदुर्ग, रणस्तंभपुर या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. हा किल्ला सस.पासून सु. ४८० मी. उंचीच्या क्वॉर्ट्झाइट खडकाच्या एकाकी पठारावर बांधण्यात आला असून त्याच्या भोवतीचा संपूर्ण प्रदेश दाट जंगलाने व्यापलेला आहे. किल्ल्याभोवती उंच व बळकट तटबंदी असून तिला अनेक बुरूज आहेत. किल्ल्यातील जुन्या अवशेषांत गणपतीचे मंदिर, राजवाडे, प्रचंड प्रवेशद्वार, धारातीर्थी पडलेल्या राजपूत सरदारांच्या स्मरणार्थ बांधलेली छत्री, मशीद इ. प्रमुख वास्तू आहेत. येथे अनेक वेळा झालेले जोहार तसेच याच्या परिसरातील व्याघ्र अभयारण्य यांमुळे अनुक्रमे राजपुतांचे धार्मिक स्थळ व एक पर्यटन केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.

मध्ययुगात (नववे शतक) हा किल्ला जाधोन राजपुतांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख सापडतो. ११९२ मध्ये मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानाचा पराभव केल्याने पृथ्वीराजाचा मुलगा गोविंद याने नव्या राजधानीसाठी हा किल्ला घेतला व एक अवघड वनदुर्ग म्हणून याचा विकास केला. १२२६ मधील गुलाम घराण्यातील अल्तमशचा येथील थोडा अंमल वगळता नंतर वागभट्ट व राजा हमीरदेव यांच्या कारकीर्दीत किल्ल्याला बरेच महत्त्व आले. हमीरदेवने १३०१ पर्यंत हा किल्ला चांगल्या प्रकारे जतन केला. १२९० व १३०० मध्ये अनुक्रमे जलालुद्दीन खल्‌जी व अलाउद्दीन खल्‌जी यांच्या सैन्याने या किल्ल्याला वेढा दिला होता परंतु हमीरदेवाच्या कडव्या प्रतिकारामुळे तो त्यांना जिंकता आला नाही. १३०१ मध्ये अलाउद्दीनाने स्वतः मोहिमेवर जाऊन राजा हमीरदेवकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला दिल्लीच्या सुलतानाकडे होता. १५१६ मध्ये माळव्याच्या राजांनी या किल्ल्यावर ताबा मिळविला परंतु १५२८ मध्ये मेवाडचा राणा संग्रामसिंह या गुहिलोत घराण्यातील राजाने हा किल्ला बाबराला दिला. बाबरानंतर शेरशाह (१५४३), त्याचा मुलगा सलीमशाह, नंतर सैद सुर्ज व त्यानंतर १५६९ मध्ये मोगल सम्राट अकबर यांनी तो घेतला. अकबराच्या सैन्याने येथील राजवाडे व देवळे उद्ध्वस्त केली. १६३१ मध्ये शाहजहानने हा किल्ला विठ्ठलदास गौड याला दिला परंतु औरंगजेबाने पुन्हा घेऊन तो मोगल साम्राज्याला जोडला. अठराव्या शतकात जयपूरचे महाराजा माधोसिंग यांना त्यांच्या कर्तबगारीबद्दल शाह आलमने हा किल्ला बक्षीस दिला होता.

चौंडे, मा. ल.