डफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन : (२१ जून १८२६–१२ फेब्रुवारी १९०२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८८४–८८ या काळातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल. फ्लॉरेन्स (इटली) येथे जन्म. लहानपणापासून डफरिनवर त्याच्या हुशार आईचा (हेलनचा) प्रभाव होता. ईटन आणि क्राइस्टचर्च (ऑक्सफर्ड) येथे शिक्षण झाल्यानंतर काही वर्षांतच त्यास डफरिनची सरदारकी (अर्ल) मिळाली. साहजिकच तो हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये बसू लागला व तेथे विविध विषयांवर भाषणेही देऊ लागला. तत्पूर्वी म्हणजे १८६२ मध्ये त्याचे हॅरिअट रोअन या युवतीशी लग्न झाले. १८४६–६०च्या दरम्यान त्याने आयर्लंडमधील दुष्काळ निवारण, व्हिएन्ना परिषद, सिरियातील ख्रिस्ती लोकांची कत्तल–तिची चौकशी वगैरेंमध्ये भाग घेतला. या विविध घटनांमध्ये त्याने केलेले कार्य लक्षात घेऊन त्याची हिंदुस्तानात दुय्यम चिटणीसपदावर नियुक्ती झाली (१८६४). त्यानंतर त्याला तुर्कस्तानात राजदूत म्हणून पाठविले. तुर्कस्तानच्या सुलतानाकडील मुत्सद्देगिरीबद्दल त्याची राजकीय पुढाऱ्यांत प्रशंसा झाली. त्यानंतर रशियात तो राजदूत म्हणून गेला व पुढे १८७२ मध्ये कॅनडाचा गव्हर्नर झाला. दरम्यान त्याने ईजिप्तमधील राज्यव्यवस्थेची घडी नीट बसविली. १८८४ मध्ये डफरिन हिंदुस्थानात व्हाइसरॉय म्हणून आला. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सामोपचाराच्या धोरणामुळे तो तत्काळ लोकप्रिय झाला. या वेळी अफगाणिस्तानच्या अंमलाखाली असलेले पांजदे हे ठिकाण रशियाने बळकाविल्यामुळे इंग्रजांना रशियाशी युद्ध करण्याची वेळ आली होती पण डफरिनने अब्दुर रहमानची रावळपिंडी येथे भेट घेऊन त्याची मैत्री संपादिली आणि हा प्रश्न समझोत्याने सोडविला. याच सुमारास ब्रह्मदेशातील फ्रेंचांच्या वाढत्या सत्तेला आळा घालण्यासाठी इंग्रजांनी लादलेल्या अटी ब्रह्मदेशाच्या थिबा राजाने धुडकावून लावल्या. तेव्हा डफरिनने ९ नोव्हेंबर १८८५ रोजी ब्रह्मदेशाबरोबर तिसरे ब्रह्मी युद्ध जाहीर केले व ब्रह्मदेशाचा पराभव करून उत्तर ब्रह्मदेश प्रदेश ब्रिटीश साम्राज्यात सामील करून घेतला. डफरिनच्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसची (राष्ट्रीय सभा) स्थापन होऊन तिचे पहिले अधिवेशन १८८५ मध्ये मुंबईस झाले. याच काळात डफरिनने १८८५ चा बंगाल कुळकायदा संमत करून अनेक शेतकऱ्यांचा दुवा घेतला. अशाच प्रकारचे कुळकायदे अयोध्या व पंजाब या परदेशांतही करण्यात आले. १८८६ मध्ये डफरिनने शिंद्यांना झांशीच्या बदल्यात ग्वाल्हेरचा किल्ला परत दिला. डफरीन स्वतः होऊन १८८८ मध्ये व्हाइसरॉयच्या जबाबदारीतून निवृत्त झाला. हिंदुस्थानातील त्याच्या कार्याबद्दल त्यास डफरिनचा मार्क्विस व आव्ह या सरदारक्या मिळाल्या (१८८८). पुढे त्याने १८८८–९१ पर्यंत इटलीत व १८९१–९५ पर्यंत फ्रान्समध्ये ब्रिटीश राजदूताचे काम केले. या काळात फ्रान्सशी बिघडलेले संबंध त्याने पुन्हा सुधारले. उर्वरित जीवन त्याच्या मुलाच्या मृत्यूमुळे आणि धंद्यातील कटकटीमुळे धाकधुकीचे गेले. बेलफास्ट (आयर्लंड) येथे तो मरण पावला.
संदर्भ : Lyalla, Sir Alfred, Life of the Marquess of Dufferin and Ava, 2 Vols, London, 1905.