ट्रोजन युद्ध : ग्रीस व ट्रॉय ( ग्रीक व ट्रोजन) यांत पारंपरिक इतिहासानुसार इ. स. पू. सु. ११९३–११८४ ह्या दरम्यान झालेले युद्ध. ह्या युद्धाचे सविस्तर व मनोरंजक वर्णन होमरच्या इलिअड ह्या महाकाव्यात आलेले असून ग्रीक पौराणिक कथांत ह्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. ह्या युद्धाची सविस्तर कारणे ज्ञात नाहीत पौराणिक कथेनुसार ट्रॉयच्या पॅरिसने (अलेक्झांडरने) मेनलेअसची पत्नी तत्कालीन सुंदरी हेलन हिला पळवून नेले. तिच्या सोडवणुकीची मागणी पॅरिसने धडकावून देताच ॲगमेनॉनच्या नेतृत्वाखाली ऑलीस बंदरात ग्रीकांचे सैन्य युद्धनौकांतून गोळा झाले. ग्रीकांकडून ओडिसस, पट्रोक्लस, नेस्टर, आकिलीझ, डायओमेड इ. नेते होते तर ट्रोजनांकडून प्रायमचा थोरला मुलगा हेक्टर व इतर खंदे पुरुष होते. हेक्टरने नऊ वर्षे खंबीरपणे ट्रॉय लढविले. अखेर दहाव्या वर्षी ग्रीकांनी लाकडी घोडा तयार करून त्यात सैन्य भरले आणि माघार घेण्याचे सोंग केले. ट्रोजनांनी हा लाकडी घोडा ट्रॉयमध्ये नेला. अशा प्रकारे ग्रीकांनी युक्तीने ट्रॉय उद्ध्वस्त केले. हेलन मेनलेअसला मिळाली आणि ट्रोजन युद्ध समाप्त झाले. या युद्धात ग्रीक देवतांपैकी काहींनी पॅरीसला मदत केली, तर काहींनी ग्रीसला मदत दिली, असे पौराणिक कथांतून उल्लेख आहेत.

आधुनिक इतिहासकारांच्या मते काळ्या समुद्रातील व्यापारासाठी ग्रीक व आशिया मायनरमधील ट्रोजन लोक ह्यांमध्ये दार्दानेल्सच्या वर्चस्वासाठी इ. स. पू. सु. १२०० मध्ये दीर्घकाळ झगडा चालू होता. कदाचित आर्थिक क्षेत्रातील हि चढाओढ वरील युद्धाचे कारण असू शकेल. तथापि हे युद्ध अभिजात ललित वाङ्‌मयीन कृतींचे पुढे कित्येक वर्षे एक आवडीचा विषय झाला. यूरोपातील बहुतेक ललितसाहित्यांतूनही यासंबंधी कुठे न कुठे तरी उल्लेख आढळतो.

देशपांडे, सु. र.